रत्नागिरी जिल्ह्यात वणंद या गावी रखमा आणि भिकू धोत्रे यांच्या घरी रमाईचा जन्म झाला.भिकू धोत्रे यांना चार अपत्ये होती.रमाई सात वर्षाची असतांनाच तिच्यावरची मातृछाया हरवली.अगदी लहान वयातच तिच्यावर घरकामाची जबाबदारी पडली.आईच्या निधनानंतर दोन वर्षाच्या आतच भिकू धोत्रे यांनी जगाचा निरोप घेतला.वडिलांच्या निधनाने रमाईच्या मनावर मोठा आघात झाला.आई-वडिलांचे छत्र हरवल्यावर काका वलंगकर आणि मामा गोंविंदपूरकर या भावडांना मुंबई येथे घेउन आले.त्यावेळी बालवयातच लग्न करायची प्रथा होती म्हणून सुभेदार रामजी हे भीमरावासाठी योग्य स्थळाच्या शोधात होते.अत्यंत चुणचुणीत आणि दिसायला सुंदर असल्यामुळे सुभेदार रामजी यांनी रमाईला आपली सून म्हणून पसंद केले.त्यावेळी रमा केवळ ९वर्षाची तर भीमराव१४वर्षाचे होते.४एप्रिल १९०५रोजी मुंबइच्या भायखळाच्या बाजारात रिमझिम पावसात रमाई आणि भीमराव यांचा विवाह पार पडला.त्यांनी आपल्या संसारात कर्तृत्व,सहनशीलता,हिम्मत,एकनिष्ठता आणि प्रचंड मेहनतीने दारिद्रयाशी लढा देत भीमरावाच्या जीवनात यशाचा मार्ग सुखकर केला.त्यांच्या वाट्याला अपार दु:ख आले पण,त्यांनी कधीच या गोष्टीचे प्रदर्शन इतरांसमोर केले नाही.आलेल्या संकटांना धैर्याने सामना करत त्या भीमराव यांच्या भक्कम आधारस्तंभ झाल्या.डाॅ.भीमरावांच्या शिक्षणासाठी रमाई ने आपले सर्वस्व पणाला लावले.आणि त्या एका प्रखर क्रांतिसूर्याच्या सावली झाल्या.
सुभेदार रामजी आंबेडकर २ फेब्रुवारी १९१३रोजी काळाच्या पडद्याआड गेले.मृत्यूसमयी रामजीने भीमराव यांच्या डोक्यावर हात ठेवून म्हटले होते…’भिवा खूप शिक,मोठा हो…समाजाची सेवा कर,रमाईची साथ तुला असेलच…’हे रामजी बाबाचे शेवटचे शब्द रमाईच्या काळजाला भिडले.तेव्हाच रमाईने मनाशी पक्का निर्धार केला,काही झाले तरी आपल्या पतीला खूप शिकवायचे…आणि रामजी बाबाचे स्वप्न पूर्ण करायचे.वडिलांच्या निधनानंतर पाच महिन्यांनी जूलै १९१३ मध्ये भीमराव रामजी आंबेडकर उच्च शिक्षणासाठी कोलंबिया विद्यापीठ,न्यूयाॅर्क या ठिकाणी गेले.या काळात रमाईचे खूप हाल झाले.गरिबीमूळे औषधोपचाराअभावी त्यांची मुले मृत्यू पावली.पण…काळजावर दगड ठेवून रमाईने एवढे मोठ्ठे दु:ख एकटीने पचवले.पतीच्या शिक्षणात कुठलाही व्यत्यय येणार नाही याची काळजी रमाईने घेतली.दु:खद क्षणांना नजरेआड करुन ही मायमाऊली संघर्षयात्री बनली.संसाराचा गाडा चालविण्यासाठी स्वाभिमानी बाण्याच्या रमाईने शेणाच्या गोव-या थापल्या पण,कधी कुणापुढे मदतीचा हात पसरला नाही.१९२३साली साहेब बॅरिस्टर होऊन भारतात आले.तेव्हा हजारो लोक त्यांच्या स्वागताला गेले.माता रमाईला देखील साहेबांच्या स्वागताला जाण्याची फार इच्छा होती,पण…त्यांच्याकडे एकच लुगडं होत आणि तेही फाटकं.ते लुगडं घालून जायाचे कसे?हा प्रश्न त्यांना पडला होता.तेव्हा त्यांना एक कल्पना सुचली शाहू महाराजांनी सत्कारात भीमरावांना एक जरीचा फेटा दिला होता.तो फेटा घालूनच रमाई स्वागताला हजर झाल्या.खरचं…किती दयनीय अवस्था आहे ना.युगपुरुषाच्या अर्धांगिनीला साधं लुगडंही नशिबात असू नये.रमाईकडे पाहून आंबेडकरांना खूप वाईट वाटले.अक्षरक्षा:त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले पण,रमाई आपली पत्नि असल्याचा खुप अभिमान वाटला.आपल्या उजाडलेल्या रानात रमाईने अथक परिश्रमाने बहारआणली होती याची जाणीव भीमरावांना होती.ते लाडाने रमाईला रामू म्हणत आणि रमाई त्यांचा प्रेमपूर्वक ‘साहेब’असा उल्लेख करायच्या.त्यांच्या प्रत्येक निर्णयाला रमाईचा पाठिंबा असायचा.अहोरात्र त्या बाबासाहेबांची खूप काळजी घ्यायच्या…तळहाताच्या फोडाप्रमाणे जपायच्या.१९२७साली आंबेडकरांनी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह केला.त्यावेळी सत्याग्रहात सहभागी व्हायची रमाईची फार इच्छा होती.पण,रमाईची तब्येत ठीक नसल्यामूळे बाबासाहेबांनी त्यांना येण्यास स्पष्ट नकार दिला.त्यामूळे त्या खूप नाराज झाल्या.तसे पाहिले तर रमाई या धार्मिक वृत्तीच्या होत्या.पण…अंधश्रध्दाळू नव्हत्या.त्यांची पंढरपूरच्या विठ्ठलावर अमाप श्रध्दा होती.एकदा का होईना पंढरपूरच्या विठ्ठलाचे डोळेभरुन दर्शन घ्यायचे अशी त्यांची इच्छा होती.पण…त्यावेळची सामाजिक स्थिती पाहाता अस्पृश्यांना कोणत्याही मंदिरात प्रवेश नव्हता त्यामूळे रमाईची इच्छा पूर्ण करणे आंबेडकरांना शक्य नव्हते.रमाईला समजावतांना बाबासाहेब म्हणाले होते,ज्या पंढरीच्या पांडुरंगाने आपल्या चोखोबाला मंदिराबाहेर ठेवून अस्पृश्यता टिकवली.आम्हाला अस्पृश्य समजून मंदिरप्रवेश नाकारला.अशा निष्ठूर पांडुरंगाचे दर्शन तुला घ्यायचे आहे.आपल्या पतीचे शब्द ऐकूण त्यांनी आपला हट्ट सोडला.पती आज्ञेचे पालन त्या काटेकोर पणे करत
तसे पाहाता रमाईचे मन खुप मोठे होते.त्या करुणेचा सागर होत्या.आयुष्यभर प्रचंड कष्ट केल्यामूळे त्यांची प्रकृती वरचेवर खालावतच चालली होती.प्रकृतीत सुधारणा व्हावी आणि हवाबदल म्हणून त्या धारवडला वरळेकडे गेल्या होत्या…त्यावेळी त्यांच्या असे लक्षात आले की,वसतिगृहातील मूले तीन दिवसांपासून उपाशी आहेत,तेव्हा रमाईने हातातील सोन्याच्या पाटल्या विकून स्वत:च्या हाताने स्वयंपाक बनवून विद्यार्थ्यांना जेऊ घातले.रमाईचे त्यागी व्यक्तिमत्व,समाजाविषयी असलेली आत्मियता या प्रसंगावरुन स्पष्ट होते.
अशी ही वात्सल्याची त्याग मूर्ती,क्रांतीसूर्याची सावली,बहुजनांची माता असलेल्या रमाईची प्राणज्योत २७ मे १९३५रोजी मुंबईतील राजगृह येथे मालवली,एका अविरत संघर्षाचा अस्त झाला.बाबासाहेबांचा भक्कमआधारस्तंभ हरवला…”थाॅट्स आॅफ पाकिस्तान”हा ग्रंथ बाबासाहेबांनी आपल्या प्राणप्रिय “रामू”ला अर्पण केला.त्यांनी यात लिहिले आहे की,”तिच्या हृदयाचा चांगुलपणा,मनाची कुलीनता आणि शालिनता,मनोर्धेर्य नि माझ्याबरोबर दू:ख भोगण्याची तिची तयारी अशा दिवसात दाखवली जेव्हा मी नशिबाने लादलेला मित्रविरहित काळ कंठीत होतो.या बिकट परिस्थित साथ देणा-या रामूच्या आठवणीत कोरलेले हे प्रतिक…या ओंथबलेल्या अन हळव्या भावना बाबासाहेबांनी आपल्या पत्निसाठी व्यक्त केल्या.खरचं…रमाई नसत्या तर,बाबासाहेब उच्चविभूषित झालेच नसते.बाबासाहेबांच्या यशस्वी कारकीर्दित वडिल रामजी आणि रमाईचा फार मोठा वाटा आहे.आज २७ मे माता रमाईच्या स्मृतिदिनानिम्मित कोटी कोटी प्रणाम…!!
रुपाली वागरे/वैद्य
नांदेड
९८६०२७६२४१