( दि.०३ जून २०२१ स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा पुण्यस्मरण दिन.त्यानिमित्त त्यांच्या जीवन कार्यावर टाकलेला हा अल्पसा शब्दप्रकाश.)
मानवी जीवनाचे अंतिम सत्य जर काय असेल तर ते आहे मृत्यू. तो कुणाला चुकला नाही. एवढेच की सामान्य माणसे एकदाच मरतात तर मोठी माणसे ही दोनदा मारतात. एकदा ते शरीराने मरतात तर दुसऱ्यांदा जेंव्हा त्यांचे अनुयायी त्यांच्या विचारानुसार वर्तन न करता उलट दिशेने वर्तन करतात तेंव्हा खऱ्या अर्थाने त्या महामानवाचा मृत्यू होतो. त्यांच्या जगण्याबद्दल ही असेच आहे.ते शरीरासह जगतात तेवढेच त्यांचे आयुष्य नसते तर त्यांच्या शरीर त्यागा नंतर ही जर त्यांचे अनुयायी त्यांच्या विचारांनुरुप वर्तन करू लागले तर ते तेवढे दिवस जगत आहेत असाच अर्थ घ्यावा लागतो. मुळात जन्म या शब्दाच्या विग्रहातूनच आपल्या जीवनाचे नश्वरत्व लक्षात येते. जसे ज म्हणजे जन्मने व न्म मधील म म्हणजे मरणे.याचा अर्थ ज्याचा जन्म झाला आहे त्याला एक ना एक दिवस जावेच लागणार आहे.
कुठल्याही माणसाचं मूल्यमापन करताना आपण काही मोजपट्या वापरून ते मूल्यमापन करत असतो. त्यातील पहिली मोजपट्टी ही असते की हा माणूस जन्मलाच नसता तर काय झाले असते?या प्रश्नाचे उत्तर शोधल्यास आपणास गोपीनाथराव यांचे महत्त्व आपल्या लक्षात येते. गोपीनाथराव जन्माला आले नसते तर राजकीय,शैक्षणिक,सामाजिक, आर्थिक आणि सहकार क्षेत्रामध्ये जे त्यांच्या कार्यामुळे घडलेले परिवर्तन आहे ते घडू शकलं नसतं म्हणजेच ऊसतोड कामगार,भटके विमुक्त, इतर मागासवर्गीय,दलित बांधव,शेतकरी, पोलीस या व समाजातील अनेक घटकांचे आजचे उन्नत रूप आपणास पहावयास मिळाले नसते. आज बहुजन समाज नेतृत्वाविना भांबावला आहे. अनेक वेळा या लोकनेत्याची आठवण येते आहे,यावरूनच त्यांच्या असण्याचे किती महत्व होते हे लक्षात येते. तसेच एखादे व्यक्तिमत्व मोठे होते त्याचे नवल तेंव्हाच असते जेंव्हा ते प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मोठे झालेले असते.मग ती प्रतिकुल परिस्थीती कुठल्या ही प्रकारची असो. अनुकुल परिस्थीतीतून केलेले कौतूक तेवढे असत नाही.पण जेंव्हा एखादे व्यक्तिमत्व शून्यातून विश्व निर्माण करते ते खरे कौतुकास्पद व अनुकरणीय असते.गोपीनाथरावांच्या जीवनाचा धांडोळा घेतला तर लक्षात येते की एका शेतमजुराच्या पोटी जन्माला आलेले हे व्यक्तिमत्व देशाच्या सर्वोच्च सभागृहात उपनेता पदापर्यंत पोहोचते तो ही आयुष्यभर संघर्ष करत,हे विशेष. साहेबांचे नेतृत्व म्हणजे पाला पासून महाला पर्यंत व गोधडी पासून गालीछा पर्यंतचे नेतृत्व. पण जी माणसे शून्यातून विश्व निर्माण करतात ती सगळीच कौतुकास पात्र ठरतील असे ही नाही तर बरीच मंडळी यशाचे शिखर गाठले म्हणजेच पालातून महालात गेले की आपल्या पालाला विसरतात पण गोपीनाथरावांच्या बाबतीत त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत असे कधीही घडले नाही, ‘जिथे कमी तिथे आम्ही’ अशी वृत्ती साहेबांची राहिली आहे.नेतृत्व निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणजे साहेब होत. दिलेला शब्द पाळणे त्यासाठी कितीही कष्ट उपसावे लागले तरी चालतील असी वृत्ती त्यांची होती.त्यांनी ज्या ज्या क्षेत्राला हात लावला त्या त्या क्षेत्राचे सोने केले मग ते गृहमंत्रीपद असो की सहकार क्षेत्रात केलेले काम असो. स्पष्टवक्तेपणा,मित्रत्व जोडणे व ते शेवटपर्यंत टिकून ठेवणे, बहुजनां विषयीची,शेतकरी, शेतमजूर, दलित भटके, इतर मागास वर्ग, ऊसतोड कामगार व अन्य वंचित घटकांबद्द आत्यंतीक कणव अशी काही गुणवैशिष्ट्ये त्यांच्याकडे दिसून येतात. साहेब उजव्या विचारसरणीच्या पक्षात असले तरी विचार व कृतीत उजव्या व डाव्यांचा समन्वय करून चालत असत म्हणूनच मुख्यमंत्र्यांचा गणपती दूध पितो पण साहेबांचा गणपती दूध पिताना दिसत नाही. मुलीच आहेत मुलगा नाही हा अट्टहास त्यांच्या काळात या पेक्षा जास्त असतानाही तसा विचार त्यांनी केल्याचे दिसत नाही.जमिनीवरील नेतृत्व असेही त्यांचे वर्णन करता येईल कारण गारपीट असो अतिवृष्टी असो या अनावृष्टि असो शेतकऱ्यांच्या बांधावर कधी पायी तर कधी बैलगाडीने जसे जमेल तसे जाऊन, आहे ती चटणी भाकर खाऊन प्रश्न सोडवणारा हा लोकनेता होता.सर्वधर्मसमभाव ही भावनाही त्यांच्या ठायी दिसते म्हणून सत्तेचा वापर त्यांनी सर्व घटकांच्या विकासासाठी केला.तरी परंतु वंजारी समाजावर त्यांचे कासवीगत प्रेम होते. म्हणूनच कि काय समाजही त्यांच्यावर जीवापाड प्रेम करायचा. देव न मानणारा माणूस समाजात सापडेल परंतु गोपीनाथरावांना न मानणारा माणूस सापडणे कठीण आहे. साहेबांची सभा आहे म्हटले की किती ही किलोमीटर वरून लोक धावत सुटायचे. भाजप पक्षाला भटा बामणांच्या पक्ष म्हणून ओळख प्राप्त होती ती पुसून बहुजनांचा पक्ष ही ओळख निर्माण करून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.त्यासाठी त्यांनी माधवचा मंत्र अंमलात आणला हे आपण जाणताच. आयुष्यात संघर्ष हा त्यांच्या पाचवीलाच पुजलेला होता पण संघर्षाला शरण जाणे, संघर्षाने पराभूत होणे हे मात्र कधी घडले नाही,म्हणूनच म्हणतात की संघर्षाचे दुसरे नाव म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब. फुले,शाहू,आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी केलं.
राजकारणासाठी राजकारण कमी करून समाजकारणासाठी राजकारण जास्त केल्याचं आपल्या लक्षात येतं. साहेबांकडे हजरजबाबीपणा लाजवाब होता म्हणूनच
” ची वक्तृत्व शैली ही गाडगे महाराजां सारखी प्रश्नोत्तर शैली होती.अफाट स्मरणशक्ति ही त्यांच्या ठिकाणी पहायला मिळते. सुडाचे राजकारण त्यांनी कधी केले नाही.मोठे मन असणारा हा नेता होता. उपेक्षितांसाठी, वंचितांसाठीचा कळवळा त्यांच्या अंतकरणात सतत तेवत असल्याचा आपणास अनेक प्रसंगातून पहावयास मिळतो.संवेदनशील मन घेऊन जगणारे हे नेतृत्व होतं.पक्षाच्या पातळीवर ही त्यांनी अनेक जबाबदाऱ्या उत्कृष्टपणे पार पाडल्याचे आपण पाहिले.असे हे नेतृत्व ज्यांनी आयुष्यभर संघर्ष केला पण त्यांना सत्तेची उब फार कमी काळ घेता आली. पण या सत्तेच्या उबेने त्यांनी अनेकांना आपल्या परीने उब देण्याचा प्रयत्न केला कुणालाही समस्यांच्या थंडीत कुडकुडत राहू दिले नाही. शेवटी देशाच्या ग्रामविकास मंत्रीपदाची शपथ घेऊन एक आठवडा उलटतोय न उलटतोय तेवढ्यातच काळाने घाला घातला व आजच्या दिवशीच ०३जून २०१४ रोजी साहेब आपल्यातून निघून गेले.आणि फार मोठी पोकळी निर्माण झाली. तदनंतर महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाचे सरकार अस्तित्वात आले याचे सर्वाधिक श्रेय गोपीनाथरावांना द्यावे लागेल.
साहेबांच्या जाण्यानंतरची महाराष्ट्रातील जनतेची अवस्था आपण अनुभवली आपला बाप गेल्यावर ही जी माणसे रडली नसतील ती माणसे साहेब गेल्यावर धाय मोकलून रडली. ज्या बहुजनाच्या उत्थानासाठी त्यांनी सतत कार्य केले त्यांना त्यांची सतत आठवण येत राहील. त्यांच्या जाण्यानंतर कितीतरी तेरवीचे कार्यक्रम महाराष्ट्रात झाले, काहींनी मुंडन करून घेतले, अनेक ठिकाणी भंडारे (अन्नदानाचे) कार्यक्रम घडले. प्रिंट मीडिया व इलेक्ट्रानिक मीडियातून त्यांच्या जाण्याबद्दल सर्वाधिक शोक व्यक्त झाल्याचे पहावयास मिळाले. आज तर ज्या गावात साहेबांना मानणारे अनुयायी सर्वाधिक आहेत त्या गावातील मंदिरात मुंडे साहेबांचे फोटो लावलेले दिसतील. लग्नपत्रिकेवर देवाच्या सोबत त्यांचा फोटो छापला जातोय, अखंड हरिनाम सप्ताहाच्या पत्रिकांवर संतांच्या पंक्तित त्यांना बसविले जाते आहे. हे उगीच घडते का ? नाही, कारण त्यांनी आयुष्यभर संघर्षाचे विष प्राशन करून वंचितांना न्याय रुपी अमृत दिले म्हणून हे घडले.
महाराष्ट्रात असा एखादा तरी नेता आपणास दिसतो का की ज्याच्यावर एवढं भरभरून प्रेम करावं. मला तर असे वाटते की हे प्रेम आणखीनच वाढत जाणार आहे.त्यासाठी त्यांच्या नावाचे चौक,नगरे,पुतळे,रस्त्यांना नावे,त्यांच्यावरील पोवाडे, विविध पुस्तके,सी.डी.,सिनेमा, शासकिय योजनांना नावे, गोपीनाथगडाची स्थापना, त्यांच्या नावाचे विचारमंच, त्यांच्या जयंती व पुण्यतिथीला अन्य समाज उपयोगी कार्यक्रम त्यांच्यावर लेखन,प्रींट मिडीया व इलेक्ट्रिक मिडीयातून त्यांच्या कार्याचा प्रचार व प्रसार या व या सारख्या अनेक माध्यमांचा वापर करून आपणास जागरूक अनुयायी म्हणुन हे कार्य विस्तारीत करावे लागणार आहे.या सर्व बाबी या साठी करायच्या असतात की ज्यामुळे पुढच्या पीढींना त्यांच्या कार्याचे महत्व लक्षात यावे.त्यांच्या कार्याला संपवणा -या काही प्रवृत्ती ही समाजात आहेत ज्यांना आपण वेळीच ओळखले पाहिजे.आपले कोण आहेत व संधीसाधु कोण आहेत हे आपणास त्यांच्या एकूण वर्तना वरून लक्षात येतेच. ते लक्षात घेऊनच आपण पुढील पावले उचलली पाहिजेत. त्यांच्या जाण्यानंतर मागील बर्याच घटना आहेत ज्या घटनेतुन गोपीनाथरावांची उपेक्षा करण्याचे काम काही प्रवृत्ती करताना दिसून येतात.
ह्या प्रवृत्ती कोणत्या आहेत व या प्रवृत्तीचे मोरके कोण आहेत?हे न पाहता अशा प्रवृत्तींना जर आपण पाठबळ देत राहिलो तर एक दिवस आपल्या नेत्याचा खऱ्या अर्थाने मृत्यू घडेल आणि त्या दिवशी त्या नेतृत्वा बरोबरच आपले ही अस्तित्व संपून जाईल. ते अस्तित्व संपणार नाही यासाठी ‘आम्हास आम्ही पुन्हा पाहावे l काढुनी चष्मा डोळ्यांवरचा ‘ या पद्धतीने आपण सतत साहेबांच्या विचारांशी प्रामाणिक असणाऱ्यांच्या सोबत असणे गरजेचे आहे.त्यासाठी आपण सर्व सुज्ञ आहातच. हे नेतृत्व आपल्या ह्यद्य सिंहासनावर विराजमान आहेच. अपेक्षा एवढीच की त्यांच्या कार्याला उणेपणा येणार नाही याची काळजी आपण सतत घेतली पाहिजे आणि त्यांची पुजा केवळ प्रतिमा व पुतळ्या पुरती भाविकतेने न करता त्यांच्या कार्याचा वसा आणि वारसा आपण चालवला पाहिजे. हा वसा आणि वारसा अनेकजण अगदी प्रामाणिकपणे चालवताना ही दिसताहेत.त्यांच्या कन्या तर तो मोठ्या अट्टाहासाने चालवीत आहेत. गोपीनाथगड व गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानकडून हे विचार सर्वदुर पोहचवण्याचे काम होते आहे.मा.माजी मंत्री पंकजाताई मुंडे तर नेहमी त्यांच्या भाषणाचा शेवट करताना सांगतात उतणार नाही, मातणार नाही,मुंडे साहेबांचा घेतलेला वसा टाकणार नाही. मी माझ्या बाबांचे नाव या जगाला विसरु देणार नाही. तसेच बीड जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष खासदार डॉ. प्रीतम ताई मुंडे या ही प्रत्येकाच्या सुखदुःखात,विकासकामात तितक्याच तत्परतेने धावून जाताना आपण पाहतो आहोत. आपणही हे नाव जगाला न विसरू देण्यासाठी सतत कार्यशील व प्रयत्नशील असले पाहिजे हीच त्यांना आजच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त खरी आदरांजली ठरेल. एवढेच सांगून मी साहेबांप्रती ही शब्दांजली अर्पीत करून थांबतो.
प्रा. डॉ. रामकृष्ण दत्तात्रय बदने ग्रामीण महाविद्यालय, वसंतनगर
ता. मुखेड जि. नांदेड.
भ्रमणध्वनी -९४२३४३७२१५