कृषी विभागाचे आवाहन ; शेतकऱ्यांनी 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये

नांदेड दि. 13 :- गेल्या आठ दिवसांपासून राज्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे, परंतु तो सर्वदूर सारख्या प्रमाणात नसून कोकण सोडून इतर ठिकाणी तुरळक पाऊस पडत आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे.

सोयाबीन, तूर, भुईमूग व मका या पिकांच्या नियोजनासाठी पेरणीच्या पूर्वतयारीची कामे करावीत. विदर्भामध्ये भात पिकासाठी रोपवाटिकाची पूर्वतयारी चालू ठेवावी. खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन या पिकांसाठी जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीची निवड पूर्व मशागतीची कामे करावीत. सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, मका या खरीप पीक पेरणीसाठी शेतजमीन नांगरणी व वाखराच्या पाळ्या देऊन तयार करावी.
राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी किमान 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. किमान 80-100 मि.मी. पाऊस झाल्यास पुरेशा खोलीवर ओलावा जातो व खंड पडल्यास पीक तग धरू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असेही आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *