आदरणीय विजय वाकडे काका प्रसिद्ध लेखक कवि कळमनुरी , हिंगोली यांच्या अध्यक्षते खाली काल माझं पुस्तकाचं प्रकाशन झाले . काकांनी अध्यक्ष या नात्याने पुस्तकाची केलेली समिक्षा वाचकासमोर ठेवत आहे
… . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
दि.१५ जून २०२१ रोजी नांदेड येथे निवृत्त गटशिक्षण अधिकारी मोतीराम रुपसिंग राठोड यांच्या “आठवणीचे गाठोडं “आत्मकथनात्मक ग्रंथाचे विमोचन आमचे अध्यक्षतेखाली जेष्ठ कथाकार प्रा.जगदीश कदम यांचे हस्ते व श्री.गोविंद नांदेडे निवृत शिक्षण संचालक म.रा.,शिवाजीराव कपाळे ,शिवाजीराव खुडे,प्रा.वसंत बिरादार,प्रा.मारोती कसाब ,संजय सूरनर आदिची उपस्थिती होती.
या प्रसंगी भूमिका मांडतांना "आठवणीचं गाठोडं"हे मोतीराम राठोडचे आत्मकथन जे ४४८ पानांचे संगत प्रकाशनने सिध्द केलं आहे.त्याची किमंत ५००₹ आहे.(प्रकाशनपूर्व २५०₹सवलत किमंतीत सुमारे ८५० प्रती खपल्या सुद्धा. .या मागे मार्केटींग नसून गेल्या तीस/पस्तीस वर्षात घडवलेले अनेक विद्यार्थी व माणसं राठोडसरांनी जपलीआहेत..हेही येथे आवर्जून नमुद करावे लागेल!)
काय आहे या आत्मकथनात..?
सुमारे ४५ वर्षा खालील मुखेड तालुक्यातील माळरानावर वसलेलं लमाण वस्तीचा ५/५० झोपड्यांचा तांडा.ज्यांना गोरमाटी शिवाय मराठी सुद्धा धड बोलता येत नव्हती..अशी वस्ती..तेथील हा लेखक म्हणून मोतीकाका (त्यांचे चुलत भावांची लेकरं त्यांच्या पेक्षा साताठ वर्षांनी मोठी पण हा ननगा असून मानाने काका त्यामुळे ” मोतीकाका”) हा गोंडस,लाघवी पोर
शाळा,फळा आणि पाटी खडूच्या मोहात पडतो.पण तांडा ..त्यातून अठरा दोन्ही छत्तीस विश्व दारिद्रय नांदते..भाकरीचा चंद्र तसा केव्हांतरी उगवायचा..घरात खाणारी सात आठ भावंडं..खायला कण मिळणं मुस्कील ..बाप कुण्या तरी सावकाराकडे पोतभर ज्वारीसाठी ढोरात ढोर होऊन राहणारा..या मोतीचा जन्मसुद्धा अशाचं गोठ्यात झालेला..!
पोटाची भूक दाबून शिक्षणाच्या भूकेसाठी हा खाकावलेला..हा शेंडेफळ..दिसायलाबरा..कंठीरामदादाच्या नवरीनं ..भाबीनं मायेचा आधार दिलेला.घरात फुटकी पाटीही नाही..तरी जिद्द,चिकाटी,मरणाचे कष्ट पार करुन अनवाणी पायाने चार चार किमी चालत शाळेचा लळा लागला..तांड्यावरचा पोर मैट्रीक होतो ..
पुढे उदगीरच्या शिवाजी महाविद्यालयात प्रवेश घेतो फाटक्या इजारी शिवाय नवं कधी पाहिलं नाही.मोठ्या गावात जायचं म्हणून एकाचं धोतरं व शर्ट मागून हे सोंग उदगीर च्या महाविद्यालयात प्रवेश घेतो.तेथील प्राचार्य नांदेड टेरिकाट कापडाची पँट व शर्ट शिवून देतात..याला जणू चंद्र गवसला..!
पुढे दोन वर्ष त्याचं कपड्यावर काढतो..! पदवीधर वगैरे होतो.पुढे इंग्रजीचे लाडके सर बनतो..पण संघर्ष संपत नाही.जिप चा शिक्षकचा शिक्षक, त्यातून शिक्षण विस्तार अधिकारी वगैरे..केवळ शिक्षण ,विद्यार्थी आणि जगण्याच्या निष्ठा जपण्यासाठी सतत धडपड..पण मूल्याशी कधीच तडजोड स्वीकारली नाही.विचाराला मुरड दिली नाही. त्यासाठी प्रसंगी ताठ मानेने संघर्षहि दिला..इंग्रजीवर प्र्रभुत्व मिळविले
- विचार केला तरी हे कथन तसे महत्वाचे नाही.पण,ज्या संघर्षातून हे रसायन खळाळत
जाते ते महत्वाचे..आत्मकथेला एक धोका संभवतो जो भोगवटा येथील व्यवस्थेने दिलेला आसतो.त्यात होरपळलेले व्यक्तिमत्त्व ,नायक म्हणा..एक तर अशा व्यवस्थेवर सूड उगविण्याच्या ईर्षेतून आत्मकथनाचा सूरचं बिघडवून बसतात.किंवा स्वतःला संघर्ष नायक कल्पून नसलेले व्यापकत्व शोधण्यात हसे करुनघेतात..अशी फसलेली आत्मचरित्रे मराठीत आंबतांना पाहिली आहेत. . .पण "आठवणीचं गाठोडं" मध्येअसा कुठलाही अभिनिवेश नाही.उर बडवेपणा नाही.किंवा वेदनेचा गर्गशा दाखवत नाही. जे भोगलं जे वाट्याला आलं ते उद्याच्या कुण्याहि "मोतीरामा"च्या नशीबाला जाऊ नाही हीच माफक अपेक्षा चरित्रकार ठेवतो. मराठी गेल्या शतकातील.साठोतरीत अनेक आत्मकथने आलीत. त्यापैकी सहज वाणगी दाखलं अतिशय नितळ,तरळपणे अनुभवाच्या पातळीवर उतरली आहेत.दूःख सोलत न बसता,अलवार लेखणीतून अवतरले आहे त्यात प्र.ई.सोनकांबळेचं आठवणीचे पक्षी, हंसा वाडकरचं सांगत्ये ऐका,शरणकुमार लिंबाळेचं अक्करमाशी,लक्ष्मण मानेचं उपरा,लक्ष्मण गायकवाडचं उचल्या,दया पवाराचं बलुतं ,आनंद यादवाची झोंबी,दादा कोंडकेचं एकटा जीव,माधवी देसाई चं नाच ग घुमा, सदा कर्हाडेचं एका स्पृशाची डायरी,विश्राम बेडेकरांचं एक झाड दोन पक्षी ,शंकरराव खराताचे तराळ अंतराळ ही व इतर थोरा मोठ्यांची आत्मचरित्रे आवडीने वाचली त्याचा उल्लेख करीत नाही.--- या पार्श्वभूमीवर मोतीराम राठोड यांचे "आठवणीचे गाठोडं" कुठे ठेवावे असा प्रश्न हे कथन वाचतांना मला पढला नाही. कारण या कथनातील निवेदन शैली एखाद्या मित्राने दुसऱ्या जीवलगास ज्या सहजतेने सांगावं ,त्यात जसा आडपडदा नसतो तसे मोतीराम राठोडचे निवेदन झालेले आहे..खूप सोसल्या नंतर एक विरेचन होते..ते निर्द्वंव्द असते.ते रागा लोभाच्या हारजितीच्या पलीकडे जाते.तशीच अवस्था राठोडांची आहे. जाता जाता सहज सुचलं..नव्या जाणीवा ,सकसपणा घेऊन आजचे लेखक वास्तवाला भिडायचा प्रयत्न करीत आहेत.प्रसंगी पदरमोड करुन समाजापुढे मांडत आहेत,पण वाचनसंस्कृती वर इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा आभासी प्रभाव पडत आहे.समीक्षकांची कंपुशाही,अहो रुपं अहो ध्वनीम्..चा जीवघेणा जमाना आहे.जातवाद फोफावला आहे.अशा परिस्थितीतून या नव्या उमेदीच्या लेखकांना उभारी देण्यासाठी ज्या त्या भागातील विद्यापीठे काय करतात किंवा करु शकतील? प्रगल्भ जाणीवांच्या लेखकांचा शोध घेऊन त्यांची पुस्तके विकत घेऊन,शक्य झाल्यास अभ्यासक्रमात लावून त्यांना प्रेरित का करित नाहीत..? किती दिवस त्याचं त्याचं लेखकांची पुस्तके लागेबांधे जपत लावत राहणार ?किंवा पुण्या मुंबई कडील जाणीवा बोथट झाल्यावरची पुस्तके इकडे लावणार?यावरहि धूरिणांनी आता गांभीर्याने विचार करायची वेळ आली आहे..!
★★★ ★★★ विजय गं वाकडे (काका )
कळमनुरी जि हिंगोली .