शिष्याचा कार्याचा नावलौकिक ऐकून गुरूकडून सत्कार : आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षिका श्रीमती रतन अंबादास कराड

नांदेड:-(मारोती शिकारे) जिल्हा परिषद हायस्कूल हदगाव या शाळेतील आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षिका श्रीमती रतन अंबादास कराड यांची आतापर्यंत अनेक पुरस्कारांसाठी निवड झाली आहे . श्रीमती रतन कराड यांना जिल्हा , राज्य , राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय , ग्लोबल अशा अनेक स्तरावरील विविध पुरस्कार व पारितोषिके प्राप्त झाली आहेत .

त्यांना शैक्षणिक , सामाजिक , आरोग्यविषयक तसेच कला , क्रीडा , साहित्य इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार मिळाले आहेत . त्यामुळे त्यांचा व त्यांच्या कार्याचा नावलौकिक सर्वत्र पसरला आहे . त्यांचा हा नावलौकिक त्यांचे गुरू आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे ज्येष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी मा. सुशील फुलारी साहेब यांच्या पर्यंत पोहचला . मा. सुशील फुलारी साहेब हे संवेदनक्षम मनाचे व शैक्षणिक बांधिलकी मानणारे असल्यामुळे त्यांनी त्यांचे नांदेड येथील सहकारी सोबत घेऊन आपल्या विद्यार्थीनीचा सत्कार करण्यास आले . इतकेच नाहीतर शाळेत जाऊन श्रीमती रतन कराड यांचे कार्य देखील पाहिले . ‘ प्रत्ययाचे ज्ञान । हेचि ते प्रमाण ‘ या न्यायाने पाहणी करत असताना आपल्या विद्यार्थीनीचे कार्य व प्रगती पाहून आनंदित झाले . ‘ इवलेसे रोप लावलीये द्वारी । तयाचा वेलू गेला गगणावरी ‘ या उक्तीप्रमाणे शिष्याच्या कार्याने ते भारावून गेले . त्यांची ही गुणग्राहकता लक्षणीय व वाखाणण्यासारखी आहे . आपल्या सेवेत जे काही हुशार व कर्तबगार विद्यार्थी निघाले त्यांना ते भेट देतात . त्यांच्या कार्याचा गौरव करतात . ते असे असामान्य व्यक्तिमत्त्व असल्यामुळे ही भेट म्हणजे एका गुणी आदर्श विद्यार्थीनीची व आदर्श शिक्षण विस्ताराधिकाऱ्याची भेट खऱ्या अर्थाने निर्मळ , निर्भेळ शिक्षणक्षेत्राचे आदर्श लक्षण आहे . असे विद्यार्थी व असे शिक्षक सापडणे दुर्मिळच . असा दुर्लक्ष योग लाभला , हा नव्या पिढीला नवा मार्ग दाखविणार आहेच . नव्या लोकांपुढे श्रेयस आणि प्रेयसचा आदर्श समाजापुढे ठेवणारा हा क्षण आहे . याप्रसंगी विद्यार्थीनीने तुमची प्रेरणा व व्हिजन घेऊन कार्य करते असे म्हणून ‘ विसरणार नाही मनमाझे ‘ म्हणत विनम्र होत गुरूआशीर्वाद घेतला आणि गुरुनेही शाल – श्रीफळ देऊन तितक्याच मुक्तकंठाने गौरवोद्गार काढत आशीर्वाद दिला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *