डॉ. संगिता आवचार उप प्राचार्य परभणी यांची समिक्षा ;आठवणींच गाठोडं: आत्मकथन लेखनप्रकार समृध्द करणारी साहित्यकृती


आत्मकथन लिहीणं विनासायास मुळीच घडत नसतं, ते शब्दबद्ध करताना जीवनातील सर्वच्या सर्व प्रसंग चितारता येत नसतात. उलटपक्षी जे प्रसंग कुंचल्याच्या फटकाऱ्यातुन विस्तृत अशा साहित्य कृतीत संकलीत करावयाचे असतात ते हुबेहुब रंगसंगती साधणारे असावे लागतात. आत्मकथन लिखाणाचे आयाम सचोटी आणि आत्मभान या मुल्यांच्या भोवती गुंफलेले असावे लागतात. अशा प्रकारची आत्मानुभूती व्यक्त करणारं आत्मकथनच सुजाण आणि चोखंदळ वाचकांच्या मनाच्या गाभाऱ्यात प्रवेश करु शकतं.

आत्मकथन या साहित्यप्रकारात मनाचा ठाव घेणाऱ्या अशा लेखनकृती, सामाजिक भावतरंग वाचकांपर्यंत पोहचवणाऱ्या, समाजातील ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या, स्वत:च्या आयुष्यातील जगणं आणि वागणं वेदनेच्या मालेत गुंफणाऱ्या अशा असतील तरच त्या स्विकारल्या जातात अंगीकारल्या जातात, महात्मा गांधींचे “माझे सत्याचे प्रयोग” डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे “अग्नीपंख” अमेरिकन शिक्षणतज्ञ बुकर टी वॉशिंग्टन यांचे ” अप फ्रॉम स्लेव्हरी (Up from Slavery) हे कित्येक पिढया घडवण्याचं काम करतात.

या समृध्द परंपरेत साहित्य, भाषा आणि समाज यांना समृध्द करणाऱ्या आणि कवेत घेणाऱ्या अनेक समग्र साहित्यकृती पाहायला मिळतात. एका विशिष्ट मागास, दलित किंवा उपेक्षित समाजात जन्मलेल्या माणसाला पुष्कळदा आलेले माणुसकीहीनतेचे विदारक अनुभव काही आत्मकथनांमधुन आपल्या भेटीला येतात. यामध्ये प्रामुख्यानं लक्ष्मण माने यांचे “उपरा” लक्ष्मण गायकवाड यांचे “उचल्या” प्र. ई. सोनकांबळे यांचे “आठवणींचे पक्षी” अशी काही उदाहरणं देता येतील. प्र.ई. सोनकांबळे यांच आत्मकथन जीवनातील खडतर अनुभवाचं वास्तव ज्या पध्दतीनं प्रभावीपणे मांडतं अगदी त्याच प्रकारे लेखक मोतीराम राठोड यांचं “आठवणीचं गाठोडं” वेदनेचा हुंकार नकळतपणे वाचकांच्या हदयापर्यंत पोहचवण्यात यशस्वी होतं. कल्पनातीत अशा हालाखीच्या परिस्थितीत रुढी, परंपरा आणि अंधश्रध्देच्या खोल गर्तेत खितपत पडलेल्या बंजारा समाजातील एका सर्वसामान्य बालकाचा प्रामुख्यानं जगण्याचा आणि पर्यायान शिक्षणासाठीचा संघर्ष दर्शवितं.

ज्या प्रतिकुल परिस्थितीत दोन वेळची भाकरी मिळवण्यासाठी पाचवीला पुजल्यागत संघर्ष करावा लागतो तिथं बाकीचा विचार तो काय ? लेखक मोतीराम राठोड म्हणतात, “मला चांगलं आठवते, घरात तंगी असायची पावसाळयात, पावसाळयाच्या सुरुवातीच्या दिवसात काम मिळत नसे. कोणीही मजुरीने लावत नसत.” पुढे ते सांगतात, “एकदा तर असा प्रसंग आला की, आजही सांगताना अंगावर शहारे येतात, तीन दिवसांपासुन घरात अन्न शिजलं नव्हत…” तीन दिवसांपासुन पोटात अन्नाचा कण नसल्यामुळं मलुल होऊन पडलेला बालक मोतीराम, कधी मोहाची फुले, कधी अंबाडी तर कधी चक्क लाल तिखटाच्या गोळया खाल्ल्या की सहज दोन-तीन तांबे पाणी पिऊन पोटं भरतं हे त्यामागचं गमक! आपल्या समाजात दयनीय अवस्थेत जगणाऱ्या अशा वंचित, दीन पामरांच्या भाकरीच्या आर्त कहाण्या समाजव्यवस्थेला खडबडुन जागे करतील तेंव्हा या आत्मकथानाचं खरं यश म्हणावं लागेल.

प्र. ई. सोनकांबळे यांना चिंचोके आणि मृत जनावराचं मांस खाऊन स्वत:ची भूक भागवावी लागल्याचा विदारक अनुभव आणि लेखक मोतीराम राठोड यांचे असे अनेक अनुभव यात साधर्म्य वाटतं. आगतिकता, असहाय्यता आणि अवहेलना यांच्याशी क्षणोक्षणी दोन हात करत लेखक घडत जातो. उदगीरच्या बोलीभाषेचा प्रभाव तसेच बंजारा सामजाच्या बोली भाषेचा प्रभाव आत्मकथनास स्थानिक भाषिक पातळीवर समृध्द करतो. “भूक शमविण्याचा प्रयत्न करत, दैवाला दोष देत जगत होतो, कष्टाने दिवस ढकलत होतो ” हे दाहक सत्य सांगताना मातृतुल्य वहिनीच्या प्रयत्नातुन अडथळयांची शर्यत पार करत शिक्षणाचा श्रीगणेशा झाला असे भावपूर्ण उद्गार लेखक मोतीराम राठोड काढतात.

श्रीगणेशा झाला तरीही प्रवास निश्चितच खडतर होता. भुकेच्या संघर्षाला शिक्षणाच्या संघर्षाची साथ लाभली होती. शिक्षणाचा तिळमात्र गंध नसलेल्या समाजात शिक्षण घेण्यासाठी घराबाहेर पडावं लागलं. लेखकाच्या वहिनींची त्यांना शाळेत घालण्यामागची भूमिका एवढीच प्रांजळ की बालक मोतीराम उपाशी मरेल त्यापेक्षा आश्रमशाळेत त्याचा भुकेचा प्रश्न मिटण्याची आशा होती. सुजाण वहिनी भाजीपाल्याचा उकडून लगदा बनवुन पुष्कळदा कुटूंबाची भूक भागवण्याचा प्रयत्न करायची. अनेक अनेक मार्ग भूक भागवण्यासाठी अवलंबत श्रीगणेशा झाला. त्याकाळच्या आश्रम शाळांमधलं जीवन सुध्दा प्रचंड खडतर कुठल्याही सुविधांचा अभाव हेच त्यांचं ठळक वैशिष्टय ! घरच्यांना शिक्षणाशी देणंघेणंच नाही, कारण भाकरीची भ्रांत त्यांना भटकण्यापासुन रोखू देत नसे. बंजारा समुह तांडे, वाडया तसेच गावोगावी मजुरीसाठी भटकत असत. शालेय शिक्षणानंतर महाविद्यालयीन शिक्षणाचा श्रीगणेशा करताना अंगावर धड कपडयांचा अभाव त्यामुळे भिकारी म्हणून गणना! अंधश्रद्धांनी परिपूर्ण प्रथा, परंपरांच्या साथीतलं जीवन, अगम्य आणि कल्पनातीत.

संघर्ष ज्यांच्या पाचवीलाच पुजला होता असे लेखक मोतीराम राठोड, पहिली पत्नी स्वर्गीय सौ. कविता यांच्या वेडसरपणामुळे संसाराची परवड, आणि पुन्हा तीच ससेहोलपट ! सौ. कविता यांच्या वेडसरपणातील विचित्र वागणुकीमुळं समाजातील विविध स्तरावरच्या घटकांचा रोष ही नित्याचीच बाब ! वेडसरपणामुळे सौ. कविता यांचं माहेरी राहणं आणि लेखकाचा “एकला चलो रे ” हा खाचखळग्यांचा दोन चिमुकल्या पिल्लांसह प्रवास घरच्या प्रेमळ नातेवाईकांच्या पाठबळावर आणि समाजातील विविध स्तरावर स्वकर्तृत्व आणि स्नेहमय स्वभावाच्या जोरावर जुळलेल्या स्नेहबंधांच्या नात्यांमुळं हे शिवधनुष्य पेलताना लेखकाला बळ मिळाल्याची कृतज्ञता त्यांच्या लिखाणातुन व्यक्त होते.

. विद्यार्थ्यांच्या अनेक पिढया घडवणारे प्रभावी शिक्षक म्हणुन लेखक मोतीराम राठोड यांचा प्रवास थक्क करणारा आहे. मनोविकास विद्यालय, कंधार ते जिल्हा परिषद हायस्कूल हदगाव ते पुढे जिल्हा परिषद हायस्कूल विष्णुपुरी अशा विविध ठिकाणी अद्यापन करताना शिक्षकाची कर्तव्य, सचोटी आणि विद्यार्थी घडला पाहिजे ही जिगीषु वृत्ती लेखकामधला शिक्षक घडवण्यात महत्वपुर्ण भूमिका बजावतात. शिक्षक ते गटशिक्षणाधिकारी या भूमिका निभावताना विद्यार्थीहित तसेच शिक्षकांच्या समस्यांची उकल हेच ध्येय मानुन लेखक काम करताना दिसतात. या दरम्यानचे त्यांचे अनुभव प्रत्यक्ष आत्मकथन वाचताना अधिक खुलतात. या थक्क करणाऱ्या प्रवासात भेटलेली दुसरी सहचारिणी सौ. सुरेखा ही लेखकाचा संसार सावरताना कंबर कसून साथ देणारी माय माऊली ठरली !

जीवनाच्या विविध वळणांवर शिक्षकी पेशातील विविध व्यक्तीमत्वांशी जीवाभावाची मैत्री, विद्यार्थी वर्गावर अलोट प्रेम, यातुन जीवनाच्या विविध वर्गावर अलोट प्रेम, यातुन जीवनाच्या विविध संकटांचा लीलया सामना करण्याचे बळ मिळाल्याचे लेखक मोतीराम राठोड यांच्याशी साधलेल्या संवादातुन समाजते.

दुसऱ्या बाजुने विचार करता आत्मकथन थोडेसे विस्तृत वाटत असले तरी कुठलीही सरमिसळ न करता प्रसंग जसेच्या तसे चितारल्यामुळे वाचकाची रुची वाढत जाते आणि आता पुढे काय या उत्सुकतेपोटी वाचक हे आत्मकथन खाली ठेऊ धजावत नाही. संगत प्रकाशन, नांदेड यांनी प्रकाशित केलेल्या या आत्मकथनाचं संतोष घोंगडे यांनी साकारलेलं आकर्षक मुखपृष्ठ ही जमेची बाजू. “आठवणींच गाठोडं ” चोखंदळ वाचक काखोटी बसवतील या मनिषेसहित !

डॉ संगीता जी आवचार,
उपप्राचार्य व इंग्रजी विभागप्रमुख,
कै सौ कमलताई जामकर महिला महाविद्यालय,
परभणी
भ्रमणध्वनी 9767323290
Email :[email protected]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *