फेसबुकवरुन धार्मिक दंगल!…….
फेसबुक या समाजमाध्यमावरुन कर्नाटकमध्ये दंगल घडून आली आहे. भारतातील हायटेक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये मंगळवारी रात्री हिंसाचार उसळला. एका फेसबुक पोस्टवरून धार्मिक भावना दुखावल्या म्हणून आमदारांच्या घरावर हल्ला करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला, अश्रूधूर सोडावा लागला आणि गोळीबारही करावा लागला. हिंसाचारादरम्यान जमावानं आमदारांच्या घरापासून गाड्यांपर्यंत अनेक वस्तूंची तोडफोड केली. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बेंगळुरूत जमावबंदीचा आदेश देण्यात आला आहे. तर हिंसा घडलेल्या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या हिंसाचारात जवळपास १०० पोलिसही जखमी झाले आहेत. या प्रकरणात आत्तापर्यंत ११० जणांना अटक झाली आहे. हिंसेची दृश्यं कुणासाठीही अतिशय दु:खदायक असतात. एका फेसबुक पोस्टवरून धार्मिक भावना दुखावल्यानं बंगळुरूमध्ये काँग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्ती यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. खरं तर ही पोस्ट आमदार मूर्ती यांच्या एका नातेवाईकानं लिहिली होती. मूर्ती यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी गोळीबार केला. या घटनेत तीन जणांना आपले प्राण गमवावे लागलेत तर अनेक जण जखमी झालेत.
फेसबुक या समाजमाध्यमावरुन अफवा पसरुन यापूर्वीही अनेक धार्मिक दंगली घडून आल्या आहेत. मुझफ्फरनगरमध्ये २७ ऑगस्ट २०१३ रोजी एक घटना घडली. कवाल गावातील शहनवाज या तरुणाने आपल्या बहिणीची छेड काढली म्हणून निमित्त झाले. गौरव आणि सचिन या दोन तरुणांनी शहनवाजवर चाकूने हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला शहनवाज यात मरण पावला. पण त्याच्या नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी गौरव आणि सचिन यांना धरून ठेवलं. गावकऱ्यांच्या सामूहिक मारहाणीत(माॅब लिंचिंग) त्या दोघांचा मृत्यू झाला. अत्यंत भयानक असा हा प्रकार. या प्रकरणाने सामाजिक वातावरण बिघडलं. या भागात दहशतीचं वातावरण पसरत गेलं. मात्र या घटनेला जातीयस्वरूप देण्यासाठी काही लोक टपलेलेच होते. त्यातच खाप पंचायतीच्या सभेची घोषणा करण्यात आली. या तिन्ही युवकांच्या खुनाने दोन्ही समुदायांमध्ये तीव्र संताप होता. मात्र त्या संतापाला फुंकर देण्याचं काम सुरू झालं. यातच फेसबुकवरून एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला. गौरव आणि सचिन या दोन तरुणांना कशा पद्धतीने हालहाल करून मुस्लीम समुदायाने ठार मारलं याचं चित्रण त्या व्हिडिओमध्ये होतं. अत्यंत क्रूरपणा त्या क्लिपमध्ये होता. ही क्लिप मोबाईलवरून वाऱ्यासारखी पसरली. या क्लिपचे पडसाद मग खाप पंचायतीत उमटले आणि वातावरण बिघडलं. आपल्या बहिणींचं रक्षण करणाऱ्या हिंदू तरुणांना किती भयानक पद्धतीने मुस्लीम जमावाने मारलं पहा असं सांगणं सुरू झालं. त्या क्लिपमध्ये दाढी, टोप्या घातलेले मुस्लीम दिसत होते. यावरून दंगलीचा भडका उडाला.दंगलीत केवळ जाळपोळ नाही तर दोन्ही समुदायातील सुमारे ३२ लोकांचा जीव गेला आणि अनेक लोक जखमी झाले आहेत. यात एका पत्रकाराचाही बळी गेला आहे. या जिल्ह्यातलं सारं जनजीवन अस्तव्यस्त होऊन गेलं आहे. ही दंगल आटोक्यात यावी यासाठी लष्कराला फ्लॅग मार्च करावा लागला.
कोल्हापुरातही फेसबुकमुळे दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. फेसबुक’वर एक बदनामीकारक प्रकरण घडले. त्या प्रकरणानंतर मध्यरात्री बेभान झालेला जमाव अल्पसंख्य समाजाच्या वस्त्यांवर ज्या रीतीने चाल करून जात होता, प्रार्थनास्थळांवर हल्ले करीत होता, दुकाने असोत की हातगाड्या-अगदी वेचून मोडतोड करीत होता ते पाहून हे कोल्हापुरात घडते आहे, यावर विश्वास बसत नव्हता. ‘फेसबुक’वरून बदनामीचा प्रकार घडला, परंतु मोडतोड, जाळपोळ, लुटालूट प्रत्यक्षात झाली. ज्या लोकांनी ‘फेसबुक’ हा शब्दही ऐकला नाही, अशा गरिबांच्या हातगाड्या उलथवून टाकण्यात आल्या. त्यांची दुकाने फोडून लुटण्यात आली. शाहूनगरी म्हटल्या जाणाऱ्या कोल्हापुरात हे घडले. तणावाचे प्रसंग कोल्हापुरात याआधीही निर्माण झाले होते. परंतु कोल्हापूरकरांना शरमिंदे बनवणारा असा प्रसंग कधी आला नव्हता. २०१७ मध्ये पश्चिम बंगालच्या बसिरत आणि बदुरिया भागात एका १७ वर्षीय मुलाने आक्षेपार्ह छायाचित्रे फेसबुकवरून शेअर केली होती. ही पोस्ट व्हायरल झाल्याने येथे जातीय दंगल भडकली. या दंगलीत संतप्त जमावांकडून अनेक दुकाने, घरांची तोडफोड करण्यात आली आहे. तसेच अनेक वाहने पेटवून देण्यात आली. गुरुवारी भडकलेल्या हिंसाचारात एका ६५ वर्षीय वृद्धाला जमावाने भोसकल्याने त्याचा मृत्यू झाला. तर इतर तीन जण गंभीर जखमी झाले होते. अशाप्रकारे फेसबुक, व्हाटसप अशा लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेल्या समाजमाध्यमातून अफवा पसरतात आणि दंगली घडवून आणल्या जातात. ही त्याची काही उदाहरणे आहेत.
आज फेसबुक आणि सोशल मिडिया आजच्या पिढीसाठी वैयक्तिक तथा सामूहिक विचारपीठ म्हणून पुढे आले आहे. याचे प्रत्यंतर १६ व्या लोकसभेमध्येही आले होते. हे भावना व्यक्त करण्याचे मुक्तपीठ आहे. याच फेसबुकवरून जेव्हा आमच्या थोर राष्ट्रीय पुरुषांची विटंबना घडवून आणली जाते त्यावेळी तरुणाई धर्माच्या झेंड्याखाली दडून जी विघातक कृत्ये करते ही सध्या भारतीयांसाठी शरमेची बाब आहे. विकृती करणारे कोणत्याही धर्माचे असोत, त्यांना शिक्षा व्हायलायच हवी. पण हे काम पोलिस आणि न्यायव्यवस्थेचे आहे असे आपण म्हणतो पण सर्वसामान्य जनतेने कायदा हातात का घ्यावा? कोणत्याही महापुरुषांबद्दल, जातसमुहाबद्दल आक्षेपार्ह लेखन, विधानं, विटंबना झाली तर ती समाजमाध्यमांवर लवकर व्हायरल होतात. त्यातून लोक जमा होतात आणि दंगली भडकतात. आज महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत संवेदनशील विषय झालेले आहेत. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांवर आम्ही हिंदूधर्माचे लेबल लावून त्यांना जाती धर्माच्या चौकटीत डांबून ठेवलंय, ते महाराज समाजकंटकाच्या संकुचित मनांएवढे लहान होता काय? नक्कीच नाही. छत्रपतींचा इतिहास आणि सर्व धर्मांबद्दलचा प्रेम आणि आदर बघितल्यावर त्यांची आभाळभर उंची सहज दिसते. अशा भावना भडकवण्याने कोणत्याही महापुरुषांची उंची तसूभरही कमी होत नाही. हीच गोष्ट सर्व महापुरुषांकडे बघितल्यावर सिद्ध होते; पण हा समतेचा, राष्ट्रभावनेचा संदेश समाजात पोहचायला हवा त्यासाठी जातीय सलोख्याची आणि परस्पर विश्वासाची गरज आहे. सोशल मीडिया आणि इंटरनेटचा गैरवापर करण्याचे प्रमाण फार वाढले आहे, प्रक्षोभक आणि अश्लील स्वरूपाचे संदेश सोशल मीडियावर व्हायरल होण्यापासून रोखलेच पाहिजेत. सोशल मीडियावर फिरणाऱ्या पोस्ट्स वाचून, ऐकून,पाहून त्याची सत्यता पडताळून न पाहता आपली भूमिका तयार करणं धोकादायक असतं. सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या बनावट व्हिडिओमुळे दंगल भडकल्याची अनेक उदाहरणे आहेत. सोशल मीडियाचा असाच वापर करून हिंसाचार घडवला गेलेला आहे. हे रोखायचे असेल तर सोशल मीडियाचा गैरवापर थांबवण्याचे मार्ग शोधण्याची आवश्यकता आहे. जातीय दंगलींसाठी होणाऱ्या सोशल मीडियाच्या गैरवापर तीव्र चिंतादायक ठरला आहे . ‘सोशल मीडिया हा आपल्या विचारांना बिनधास्तपणे अभिव्यक्त करण्याचे माध्यम आहे. त्याची ही ओळख जपणे गरजेचे आहे. या मीडियाचा उपयोग एकात्मता आणि बंधुभाव वाढविण्यासाठी व्हायला हवा. मात्र, अलीकडे चुकीच्या पद्धतीने याचा वापर केला जात आहे असे दिसते .
गंगाधर ढवळे, नांदेड