नांदेड दि. 24 :- नांदेड तालुक्यासाठी 22 ठिकाणी नवीन रास्त भाव दुकानाचा परवाना मागणीसाठी अर्जाची विक्री तहसिल कार्यालयाच्या सेतु सुविधा केंद्रामार्फत करण्यात येणार आहे. प्रत्येक अर्जाची किंमत 10 रुपये निश्चित करुन अर्जासोबत 10 रुपये शुल्क चलनाद्वारे भरुन घेण्यात येणार आहे. अर्जदार / पंचायत / स्वयंसहाय्यता गटांनी / सहकारी संस्थानी चलनाची मुळ प्रत, शपथपत्र तसेच आवश्यक ती सर्व कागदपत्रे गुरुवार 15 जुलै 2021 रोजी कार्यालयीन वेळेत तहसिल कार्यालय नांदेड येथे सादर करावेत, असे आवाहन तहसिलदार नांदेड यांनी केले आहे.
नवीन रास्त भाव दुकानाचा परवाना पंचायत (ग्राम पंचायत तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था), नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्याअंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था, महिला स्वयंसहाय्यता बचतगट व महिलांच्या सहकारी संस्था यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.
अर्जाची छाननी संबंधीत तहसिल कार्यालयात होणार आहे. जिल्हास्तरावर जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी नांदेड यांनी समिती गठीत केली आहे. यामध्ये जिल्हा समन्वयक माविम, प्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणा नांदेड तसेच संबंधीत तहसीलदार सदस्य आणि नगरपालिका क्षेत्रात मुख्याधिकारी तसेच महानगर पालिका क्षेत्रात संबंधित प्रभाग अधिकारी हे सहसदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.
नांदेड तालुक्यात नांदेड शहरातील ठिकाण व दुकान क्र. पुढीलप्रमाणे आहेत. नई आबादी दुकान क्रमांक 1, लेबर कॉलनी दु.क्र 6, जंगमवाडी दु.क्र. 7, गवळीपुरा दु.क्र 15, अशोकनगर दु.क्र 20, मगनपुरा दु.क्र 24, चिखलवाडी दु.क्र 26, जूना मोंढा दु.क्र.28, गाडीपुरा दु.क्र.32, इतवारा भाजी मार्केट दु.क्र.33, इतवारा भाजी मार्केट दु.क्र. 34, ब्रम्हपुरी दु.क्र. 41, रंगार गल्ली दु.क्र. 45, गाडीपुरा दु.क्र. 47, चिखलवाडी दु.क्र. 57, चिखलवाडी दु.क्र. 58, स्नेहनगर दु.क्र. 60, चिखलवाडी दु.क्र 62, असर्जन कॅम्प दु.क्र.128, तर नांदेड ग्रामीणसाठी वाघाळा दु.क्र. 121, मौ.वाहेगाव दु.क्र.217, मौ. थुगांव, दु.क्र. 215 चा यात समावेश आहे.
या नवीन रास्त भाव दुकानाचा परवाना जाहीर प्रगटनाद्वारे मंजूर करण्याबाबतची प्रसिध्दी 15 जून ते 15 जूलै 2021 या कालावधीत ज्या गावातील व शहरातील क्षेत्रात मंडळ अधिकारी व तलाठयामार्फत चावडी/ग्रामपंचायत, तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, उपविभागीय कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, महानगरपालिका कार्यालयाच्या जाहीर प्रगटन व दंवडीद्वारे करावे, असे तहसिलदार नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.