हुरहुरत्या दिवट्या – सु.द.घाटे(रुमणपेच)

तवा म्या आठवी नववीत शिकत असन, माय समद्या गावाचे घणेले चिंदकं धुवायची तिच्या हातची किमया मोठी भारी. तिनं पाण्यात भिजविलेलं कापड गंगवानी निर्मळ नवकोरं निघालंच म्हणूनशान समजा. धुनं धुता धुता तिचा जलम गेला.

दोरे भरून बारा ठिगळाचं लुगडं लेवणारी माय ‘एक नुर आदमी दस नुर कपडा’ ह्यो जुन्या जानत्यांचा बोल हाडाहाडात भिनलेली ती बाई. कपडा दसनुर ठेवायचं वरट्याच्याच हाती असतया, असं तिचं म्हणनं व्हतं. या तिच्या व्रत्तापाई गावाचा नेसता सकोट करता करता तिची हाड पार खंगून गेलती. तासन तास तळ्यात उभ राहिल्यानं मऊ पडलेल्या पायासनी चिकटलेल्या जळवांनी तिच्या रक्ताचा पुरताच घोट घेतला होता. माय तशी रग्गड सोशीक अन् आभाळाएवढ्या मायेची होती. तिच्या वाकलेल्या कमरंत ठणका होत असला तरीबी तिचं काम थांबलं नव्हतं. धुण्याची मोठी लठ्ठ मोळी गाढवाच्या पाठीवरनं वाहून तळ्यावर नेमानं नेनं व चकोट नेटकं धुऊन आणून सांच्यापारी ज्याच्या त्याच्या घरी देणं, ह्यो तिचा धर्म होता. याच्या बदल्यात लोक तिला शिळेपाते अन्न देत होते. त्या उष्ट्या अन्नावरच आमची गुजरान होत होती.

त्यातूनच आमचं रगत वाढत व्हतं. म्या शिकून मोठा व्हावा, या पाई अंगानं कस्ता खाणारी माय मनानं मातर मया बहिणीचा संसार नादर नेटका व्हावा म्हणूनशान हुरहुर करीत व्हती.

कमलबाई मयी थोरली बहीण, तिच्या बानं सात हजार रुपये हुंडा कबूल करून सोयरीक केली होती. त्यानं सोयरीक कराया केली, पर हुंड्याची रक्कम कुठून जमवायची म्हणूनशान त्याच्या मनात भलंमोठं काहूर माजलं. आपूण पैसा आणनार कुठून? कुणापुढं हात पसरायचा? आपल्या सारख्या लाचार माणसाची पत करायला लोक काय थोडेचं खुळे हायतं ? अरं देवा म्या ऐवढा पैसा नाय जमवू शकलो तर मया कमलीचं कसं व्हणारं. कसं व्हणार? हळदीचा मांडव वाळविल्याचा बट्टा बापाच्या डोस्क्यावर येणार किरं देवा? एक ना दोन असंख्य ईचारांच्या मुंग्याचं वारुळ बा च्या डोस्क्यात नको त्या विचाराच वादळ नाचवीत होतं अन् बा लहान तोंड करून फिरत होता.

त्याला कारणबी तसंच व्हतं. बाला तसं कोणतं असं काम नव्हतं त्याच्या कडं चार गाढवं होती. ती बी माईनं धुण्याच्या मोळीचं ओझं तळ्यावर नेण्यासाठी घ्यायला लावली व्हती. अधूनमधून बा धुण्याची मोळी गाढवावरनं घेऊन माई संगट तळ्यावर जायाचा. अन् माईला तो कापडं धुऊ लागायचा. पर ह्यो त्याचा रोजचा धंदा नव्हता. बा गावातल्या कैकाडी, वैदू या गाढव वाल्यांच्या संगतीनं बांधकामावर वाळू टाकायचे गुत्ते घेत असे, पर हेबी त्याला रोज मिळत नव्हते. अवसं पुनवला गावलेल्या या धंद्यात मिळालेले अख्खे पैसे बाला दारूच्या भट्टीत बुडवावे लागत. वाळूच्या भरल्या गोण्या उचलून त्याच्या हाता पायाच्या शिरा तर्र गारठून जात. शिरा मोकळ्या करायचं थकवा घालवायचं दारू हे औषध हाय, असं त्याचं म्हणनं व्हतं. असा कफलक बा हुरहुरी शिवाय काय करणार व्हतां ?

बा नं काय हुन्नर केली माहीत नाय पर त्याची चिंता हटली व्हती. कमलीच्या लग्नाची तीथ निघाली व्हती. लग्नबी व्यवस्थित पार पडलं व्हतं. बानं लग्नात कुठं कांही कमी पडू दिलं नव्हतं. फक्त एक गोष्ट तेवढी इसरली व्हती. बरं ती इसरली, असं तरी कसं म्हणता येइल? सोयरीकीत तिचं कायी बोलनं केलं नव्हतं. शेवंतीच्या वक्ती पारावर नवरदेव रुसून बसला व्हता. काइ राह्यलय काय? काई चुकलंय काय म्हणूनशान त्याला बामनानं पुसलं तवा तो आपले गोबरे गाल फुरगटून तोंड मडक्यावाणी करीत म्हणला व्हता. “अर्धा तोळा सोन्याचा छल्ला घाला तरच म्या आहेरी कापडं नेसण म्हणावं. सोयरीकीच्या बोलण्यात नसलेली खोटी मागणी पारावर बसून करताना याला देवाची भीती कसी वाटत नसावी? असा इचार त्यावेळी मया मनात उठला व्हता. नग व्हय करीत आखरीला बा नं छल्ला दिवाळीला द्यायची तडजोड केली व्हती. तवा कमलीच्या डोस्क्यावर अक्षता पडल्या व्हत्या.

बाई नांदाया गेली. घर शिरणी होऊन आरतनपरतन झाली. अन बघता बघता दिवाळी तोंडावर आली. दिवाळी, ह्यो बाई लेकीचा सण लगीन झालेल्या बाई लेकीला तर पहिल्या दिवाळीची भारी आपरूक असतीया. माहेरच्या मुराळ्याची वाट बघता बघता तिचं मन सैरभैर झालेलं असतया. हिंदकळणाऱ्या मोती लगासारखं अस्थिर चंचल मन माहेरच्या वाटेवर न थकता घोडदौड घेत राहातया. बोळाई येण्याच्या समद्या वाटा हेरून आपली सतेज

जागती नजर पेरून बसतया हे समदं जगलेली माय बाईचा हिरमोड कसा होऊ देईल? मला तिनं एका दिशी झुंझुरक्याच उठविलं, अन् गूळ रोट्या बांधून देऊन बाईला आनाया धाडलं.

म्या बाईच्या घरी गेलो. तवा बाई चुलीपाशी भाकरी थापीत बसली. होती. मला बघतांच तिचं तोंड चिराख दान्यातल्या ज्योती सारखं सोनसतेज उजळलं. तिनं लगबगीनं पीठ माखल्या हातानंच पाय धुवाया पाणी भरून तांब्या मया हाती दिला. अन् म्हणाली, “समदी बरी हायती की दादा ?” “व्हय, हायत.” म्या म्हणलो. पाय धुऊन आलो. तवर बाईनं बसाया सतरंजी टाकली. तिनं चुलीवर चहाचं आदन ठेवलं. म्या सतरंजीवर बसलो. तशी बाईची सासू येऊन मह्या शेजारी बसली. अनं तिन पुसलं बरं हाईत नव्हं. ? “व्हय समदी धडशी हाईतं. म्या म्हणालो.

“गूळ रोट्या आल्यात तवा बाईला अन् दाजीला बोळ न्यायचं असंल ? बाईच्या सासून हुल भरून अंदाज जोखीत बार टाकला. ऐकून म्या तर पुरताच बिचकलो. मला दाजीला न्यायचा घरचा कायबी सांगावा नव्हता. तवा याची तोड काय सांगावी या इचारानं मया मनात कोंडीच कोंडी दाटली. एकट्या बाईलाच तेवढं न्यायला आलाव. हे सांगायला मव्हं जाया झालेलं मन कच खाऊ लागलं. दातखिळी बसल्यागत म्या चिडीचिप बसलो होतो.” शेण गवऱ्याचा हुडवा बसावा तसा. तेवढ्यात बाहेरून दाजी येताना दिसले. म्या रामराम म्हणीत हात जोडले. पर दाजीनं नुसताच हूं म्हणूनशान एक हात जरासाच वर केला. मयावर नजर पडताच तेचं तोंड मातर निखाऱ्यावर फुललेल्या भाकरीगत फुगलं व्हतं. मया काळजात चर्रकून झालं. म्या गरिबा लाचार तोंडाने बाईकडे बघितलं. बाईचं मयाकडं ध्यान नव्हतं. तिनं चहा आणून आम्हा दोघासनी दिला दाजीनं अन् म्या चहा घेतला. खिनभर गप्प राहून म्या दाजीला पुसलं. म्या दिवाळीसाठी बाईला न्यायाय पाई आलाव.. धाडता नव्हं ?

“धाडायचं खरं हाय पर….”

“पर काय… म्या लगबगीनं म्हणालो.

“दिवाळीला बोळवन करून छल्ला घालायचं बोलनं हाय तवा तसा सांगावा असंल तर आम्ही बी येताव. नसता तुमची बाई बी दिवाळीला येत

नाही म्हणतीया तवा आजच्यालाराहून जेवन करून जावा. अन तुमच्या बाला ह्यो असंच सांगा.” एवढं बोलून दाजी बाहेर निघून गेले. म्या जखडबंद जबान तोंडात घोळवीत बाईकडं बघितलं. बाई डोळ्यातला पान पडदा मला दिसू नाही म्हणून शान जीभ झडल्या गत वळचनीला उभी होती. तिच्या मनसुब्याचा समदा ईसकोट उरी दाटून येऊन बाभळगाट जळावी तसं धडधडा जळत व्हता.

उरी बाण लागलेलं पाखरू चित्कारण्याची ताकद नसल्यानं तसंच फडफडत जावं, तसा म्या रित्या हाताने वापीस आलो होतो. बाईला न आणता बोळाई एकटा आलेला बघून माय रड रड रडली व्हती. माईचे पानथळ डोळे बघून बा चं थोराड काळीज बी गलबलून आलं व्हतं. बानं घोगरट आवाजात माईला समजावलं. असा दिल टाकू नगस. म्या कशाबी हिकमतीनं येळ आवसला बाईची बोळवण करीन. जावई बाबाचा रुसवा फुगवा समद काढीन बाच्या जबानीनं माईच्या मनातले रटरटते अगटी पलोते जरासे निवले व्हते.. जसजसी येळआवस जवळ येत व्हती. तसतसा बा मनानं खंगत व्हती बाईच्या बोळवणीचा सूड ईरसरीला पडून त्याचा पाठलाग करीत व्हता. बा इचार करीत व्हता. वाट काढण्याचा अन् एक दिवस त्याला वाट गवसली. घरी व्हती ती चार गाढवं माळेगावच्या यात्रेत विकून टाकायचं बानं पक्क केलं. जनावरं त्याच्या जगण्याचं आधार खर्ची व्हता. आधार खची घालून बा बाईची बोळवण करणार

येळआवसच्या वक्ती माळेगावची खंडोबाची यात्रा असतीया, त्या वक्ती जनावरं विकून टाकायचं बानं बेत पक्का केला व्हता. खंडोबाची पालखी निघायच्या चार दिसानं आदी गाढववाल्यांच्या संगतीनं गाढवं घेऊन पायी निघायचं बानं मला बजावलं व्हतं. बा मोटारनं येणार व्हता. निघायचा मुहूर्त भरत आला. उगवतीला आणिक तांबडं फुटलं नव्हतं. झुंझुरक्याच म्या उठलो. गावातले चट उकंडे पालथे घालून गाढवं एक जागी केली. तवरोक समदे गाढव वाले जतरकरी गावाच्या मावळतीला असलेल्या आखरावर एकजूट झाले व्हते. समदे आल्याची खातरजमा करून गाढववाल्यांचा म्हादू मोठ्यानं वाट तुडवायचा इशारा भरला. एक लगीनं आपापल्या जनावरावर नजर रोखीत सम गाढववाले निघाले दुपारचं उन लागू नाही म्हणूनशान गडयाइन पळसाच्या पानाच्या छपन्या डोस्क्यावर पांघरल्या व्हत्या. कनगीवर तनसांच इरलं

झाकल्यागत ते दिसत व्हत. दोन दिसाच्या वाट तोडीच्या बाद आम्हासनी माळेगावची यात्रा गावली.

खंडोबाची यात्रा भारी आपरुकीची आम्ही माळेगावात पवचलो तवा फेंडरीत उटलेले पेठके ढनकत व्हते. पर यात्रेतला गदारोळ बघून त्याची सय आपसुकच सुमार व्हत व्हती. जत्रत माकडवाले, सापवाले, नंदीवाले, अस्वलवाले, पोपटवाले, चुडबुडकेवाले, कावडवाले, तुतारीवाले, ढणमणेवाले, मसनजोगी, राइंदर, पांगूळ, मोरपिसछत्रीधारी वासुदेव, पोतराज, वैदू, गोंधळी, वाघ्यामुरळी, हिजडे, गुराखी खेळकरी गडी आपापला डावा मांडून बसले होते, मळवट भरले खेळकरी नुकत्याच पोटरी फोडून बाहेर आलेल्या कणसागत गमतीदार साज लेवून गोंधळ घालीत व्हते.

खेळ कऱ्यांची पाळीव जनावरं त्यांच्या इशारासरसी हरहुन्नरीनं डुलत होती. त्यो करीना बघाया पाइ मलाबी जावं वाटत व्हतं. पर जनावरं सोडून जावं कसं? म्हणूनशान म्या बाची वाट बघत व्हतो. क्षणाक्षणाला जत्रेतली माणसं वाढत व्हती. पावसाळी नदी बघता बघता फुगावी तशी जत्रा फुलत व्हती. चकोट जागा बघून आम्ही जनावरासनी चारापाणी करून दावन लावली. दिवस कलांडायला आलता, तवा बा मोटारीतनं आला. आल्या आल्या त्यानं भिकारी वैदूचे पाल हुडकून काढले. बानं वैदूसँग जनावरांचा सौदा मांडला. बा सौदा तोडीत व्हता. अन मया मनात ईचाराच्या घनाचे दनके मव्ह काळीज तोडीत व्हते. मला मया जनावारांचा भारी सोस. आपरुक तशीच. मला सय व्हत व्हती. धुन्याची भली थोराड मोठ (मोळी ) वाहून नेणाऱ्या गाढवांची. बिनतक्रार माईच्या डोस्क्यावरलं ओझं आपल्या पाठीवर घेणारी, बाला वाळूच्या गोण्या, पोती वहायला मदत करणारी, म्या , जवळ गेलो की, हरखून मायेनं फूर फूर करणारी, म्या पाठीवर मान टाकली की इशागत तोल सावरीत अल्हाद धावणी धरणारी मई चंदेरी गाढवं. आमच्या कुटुंब कबिल्यातलीच व्हती ती. त्यांना इकल्यावर नवख्या जागेवर नवख्या माणसासंगट त्यांच्या जिवाची कोण घालमेल व्हणार व्हती? ती किती हुरहुरणार व्हती? या इचारांन मला चौवाटा येरगाटलं व्हतं. बानं तेचा सौदा केला व्हता. तेच्या रुपानं बाची जिनगानीच इकल्या गेली व्हती. गाढवं इकून आलेल्या पैशातून बाच्या काळजावरलं बाईच्या बोळवणीचं ओझं उतरणार व्हतं. पर गाढवाच्या पाठीवरणं तळ्यावर जाणारं धुन्याचं ओझं मात्रं कायमचं

माईच्या डोस्क्यावर चढणार व्हतं.

म्या सपान बघत व्हतो. मये गुराखी दोस्त, गडी दिवाळीच्या सनाला आपापल्या गाई बैलांना लव्हाळ्याच्या दिवट्या करून ओवाळत आहेत. म्या बी गारगोटीच्या चकमकीनं दिवट्या पेटविल्या. दिवट्यातील त्या ज्योती सोनसतेज पेटल्या. त्या पेटत्या दिवट्या ओंजळीत घेऊन त्या ओंजळीनं म्या मया गाढवांची ओवाळनी करू लागलो. दिवट्या कशातरी फरफरु लागल्या मला वाटलं. आम्ही समदे माय, बा, बाई, म्या, मई गाढवं या अगटी दिवट्या होऊन बेगुमान फरफरतो आहोत. तेवढ्यात बानं पाठीवर थाप भरली. म्या भानावर आलो. पर कांई दिसंत नव्हतं. डोळ्यात फाटक्या कुडत्यावर ओघळंत व्हते. आलेले पाण्याचे ढग फाटक्या कुडत्यावर ओघळंत व्हते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *