धर्मभूषण ॲड. दिलीपभाऊ ठाकूर यांना ” कर्मयोगी ” ही उपाधी बहाल

नांदेड ; प्रतिनिधी

गेल्या चाळीस वर्षापासून 75 विविध उपक्रमांमार्फत गोरगरिबांची सेवा करण्यात नेहमीच सक्रिय असणारे धर्मभूषण ॲड. दिलीपभाऊ ठाकूर यांना ” कर्मयोगी ” ही उपाधी हडको येथील श्री शनीदेव मंदिर देवस्थानतर्फे नांदेड दक्षिणचे आमदार मोहनअण्णा हंबर्डे यांच्या हस्ते देण्यात आली.

श्री शनी मंदिर व श्री संकटमोचन हनुमान मंदिर देवस्थान समिती हडको तर्फे शनिदेव जयंती चे औचित्य साधून झालेल्या शानदार समारंभात व्यासपीठावर प्रकाशसिंह परदेशी, निवृत्ती जिंकलवाड,अरूण दमकोडंवार, डॉ.नरेश रायेवार,प्रा.अशोक मोरे, नरसिंग ठाकूर,माधवराव गुडेगांवकर,प्रमोद टेहरे,माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन चव्हाण, रमेशसिंह ठाकूर, सारंग नेरलकर यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक करतांना देवस्थानचे अध्यक्ष करणसिंह ठाकूर यांनी दिलीप ठाकूर यांनी आत्तापर्यंत केलेल्या सेवाकार्याचा सविस्तर तपशील विशद केला. त्यानंतर शाल ,श्रीफळ पुष्पहार व सन्मानपत्र देऊन आ. हंबर्डे यांच्या हस्ते दिलीप ठाकूर यांचा गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना आ. हंबर्डे यांनी दिलीपभाऊंचे कार्य अनेकांना सतत प्रेरणा देत असते. त्यांनी असेच सेवा कार्य चालू ठेवावे त्यांच्या पाठीशी प्रत्यक्ष परमेश्वराचा हात असल्यामुळे त्यांना काहीही कमी पडणार नाही असे आवर्जून सांगितले.कर्मयोगी ही उपाधी मिळाल्यामुळे आपल्यावरील जबाबदारी शतपटीने वाढली असून आणखी काम करण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे सांगत दिलीप ठाकूर यांनी करणसिंग ठाकूर व त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद व्यक्त केले.

या पुरस्कारासह दिलीप ठाकूर यांना देशभरातील विविध संस्थांनी दिलेल्या पुरस्कारांची संख्या ५४ झाली आहे.सातत्याने सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेले दिलीपभाऊ यांचे नाव मराठवाड्यात सर्वपरिचित आहे. सहा शैक्षणिक पदव्या घेतलेले भाऊ सदैव समाजसेवेत व्यस्त असतात. गेल्या वीस वर्षापासून त्यांनी आयोजित करत असलेल्या अखिल भारतीय विराट कवी संमेलनाची ख्याती संपूर्ण भारतभर पसरलेली आहे. आतापर्यंत चार लाखापेक्षा जास्त रुग्णांना लोकसहभागातून त्यांनी जेवणाचे डबे पुरविलेले आहेत. याशिवाय थंडीत कुडकुडत असलेल्या २०२१ निराधारांना ब्लॅंकेट रुपी मायेची ऊब त्यांनी दिली. ५७ रक्तदान शिबिरातून ६३०० रक्ताच्या बॉटलचे संकलन केले. वेडसर, बेघर, उपेक्षितांची दाढी कटिंग करून त्यांना नवीन कपडे जेवण व शंभर रुपये बक्षिसी देण्याचा त्यांचा ” कायापालट ” हा उपक्रम नुकताच सुरू करण्यात आला आहे.
“कृपाछत्र” या उपक्रमांतर्गत २०२१ गरजूंना पावसाळात संरक्षण व्हावे या उद्देशाने छत्री वाटप कार्यक्रम सध्या शहरात त्यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत आहे.विविध वृत्तपत्रातून त्यांचे साप्ताहिक लेख नियमित प्रसिद्ध होतात.या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना मराठवाडा भूषण, नांदेड का सांता, जिजाऊ रत्न, शान ए नांदेड यासारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. दिलीपभाऊंच्या कार्याची दखल घेऊन सिडको हडको परिसरातील रामभक्त
नागरिकांनी कर्मयोगी ही उपाधी दिल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

(छायाः सारंग नेरलकर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *