नयन बारहातेः एक हात,दोन बोटांचा चित्रकार !…. जगदीश कदम

सुमारे वीसेक वर्षांपूर्वीची गोष्ट.नयन बारहाते हे नाव नांदेडच्या ग्रंथजगतात जाणीवखोर झालेलं.प्रकाशक मित्रांकडे पुस्तक निर्मितीची चर्चा सुरू झाली की हटकून अग्रक्रमावर येऊन बसणारं.मुखपृष्ठ घ्यायचं तर नयनचंच हा असायचा लेखकुंचाही अतोनात आग्रह.आमचा प्रकाशक मित्र निर्मलकुमार सूर्यवंशी यांच्याकडे हे चित्र चारदोनदा जरूर दिसलं दिमाखात.
तशी पुस्तकांची मुखपृष्ठं करणारी चित्रकारांची चवड होती पुण्यामुंबईकडंच रचून ठेवलेली.रविमुकुल,चंद्रमोहन कुलकर्णी,रमेश भरताल,अवचट अशा लोकांनी केली होती आपली कारकीर्द कणखर.दीड दोन हजारात लेखक हरखून जाईल असं चित्र ठेवत हातावर.निर्मलच्या माध्यमातून या लोकांशी आमचाही आला जरासा संबंध.भगवान अंजनीकर आणि निर्मलकुमार यांच्यासमवेत आम्ही अनेकदा फिरकलो इकडे.


पुण्याच्या शुक्रवार पेठेच्या आजुबाजूलाच असायची ही मंडळी.लाटकरांचा कल्पना छापखाना तिथंच आणि बाजूला अलका टाॅकीजवळ खिळ्यांची प्रकाश टाईप फौंड्री.त्याच्या शेजारीच विनायक आर्ट आणि हाकेच्या अंतरावर खाडीलकर ब्लाॅक मेकर्स.मुखपृष्ठाची सजावट व्हायची इथंच देखणी.मुखपृष्ठ असेल देखणं तर वाचक उतरतो आत्मविश्वासानं झरझर पुस्तकांत.
त्यादृष्टीनं खरंच हा भाग सधन.पुण्यातील सदाशिव पेठेविषयीच्या बाकी दंतकथा असूही शकतील अजागळ पण ग्रंथव्यवहाराची अंगभूत असोशी जपणारी जरबेची जागाही हीच!


सरलेल्या शतकाच्या शेवटी काही प्रयोग झाले जरूर.वर्षानुवर्षे बस्तान मांडून बसलेल्या जागांना बसायला लागले जबरदस्त धक्के.अर्थात धाक दाखवून किंवा करामती करून कलेचा प्रांत नाहीच करता येत कानकोंडा.नाही चालत तिथं तुटपुंजी कसरत.सरकावं लागतं आपल्यातलं खणखणीत नाणं नाक्यावर.नाक्यावरची गर्दी आणि दर्दी विस्मित होईल असं वजन टाकावं लागतं ताबडतोबीनं तळहातावर.तेव्हा कुठं जागं होतं तकलीफिनं तारतम्य!
ही किमया या मुलुखी करून दाखवली नयन बारहाते नावाच्या नायकानं!सृजनाचा धाक बसवत त्यानं नाहीच होऊ दिली चित्रकार म्हणून आपली वाट धाकटी.खरं म्हणजे चित्रकाराच्या कुंचल्यातून आलेल्या कोणत्याही चित्राला नाहीच मोजता येत मनीमॅटरमधून.
पैशाची किंमत कधीच नाही स्पर्शून घेत परदेशातली चित्रकला.


चित्रकार चित्र काढतो म्हणजे करतो काय!आपणालाच उभाआडवा चिरत जाऊन वाहात असतो रक्तरंगानं रक्तप्रवाहात.
मेंदूकडून निघालेले रंगांचे मार्ग पत्ता विचारत विचारत येतात भावनांच्या प्रांतात.हे सगळं असतं इतकं बेमालूम कळत नाही चित्रकाराला सुध्दा कुठं आहे आपला मुक्काम!आणि मग वाचक प्रेक्षकांच्या काळजाला कुरतडेल असं चित्र उतरते आपोआप कागदावर.
ही चित्र निर्मितीची किचकट कथा नयन बारहातेला सांगावी लागत नाही शब्द ओरबाडून.
हा चित्रकार बोलायला लागला म्हणजे अशा कितीतरी कथा येतात त्याच्या शब्दांना लगटून.भाषेला कसं नितांत सुंदर रूप द्यावं याचं नेमकं गणितही जमवावं याच सर्जकानं.


नयन बारहाते हा केवळ नामवंत चित्रकार आहे एवढाच परिचय नाही या माणसाच्या वस्तीला.कवी,कथालेखक,
रंगकर्मी,संपादक,संवादक,संशोधक,समीक्षक असं केवढं मोठं लटांबळ आहे त्याचं.हा माणूस कलावंत म्हणून आहेच मोठा.त्याहीपेक्षा माणसाला जीव लावणारा जिगरबाज दोस्त म्हणूनही त्याची दावत देखणी आहे.उगाच नाही ग्रेस नावाचा कवी या माणसाच्या प्रेमात पडत!नयनला जेवढा ग्रेस आतबाहेरून समजला तेवढा अन्य कोणाला या भूतलावर समजला असेल याची शक्यता शून्य.ही गोष्ट अतिशयोक्तीची म्हणून सोडून दिली तर काळ उद्याच्या वाड़मय इतिहासाच्या ढुंगणावर फटके मारल्याशिवाय थोडाच राहणार!तसा नयन बारहाते हा गडी विदर्भातला.नागभूमीतला.
नागभूमीतल्या माणसानं माणसाला माणसाच्याच ठिकाणी शोधायला हवं.बाकीच्या जागा जिरेटोपासारख्या वाटत असल्या तरी त्या मुळात अत्यंत वकट्या आणि नकट्या असतात याची शिकवण घ्यावी याच भल्या माणसाकडून.


अगदी परवा या माणसानं आपल्या नागपूरातल्या बहिणीची पंच्याहत्तरी साजरी केली आपल्या गोतावळ्यासह.माणसं जोडणंही महत्वाचं मानलं या सर्जकानं कमर्शियल आर्ट इतकंच. शेकडो चित्र,हजारो कल्पकपत्रे,वेधकशब्दांची सजावटपत्रे,जाहिरातींचे मुद्देसूद मसुदे आणि बरंच काही टाकता येईल या माणसाच्या कारकीर्दीवर.संपादन सुंदर,सजीव आणि सौष्ठवपूर्ण करायचं असेल तर सरळ निघावं या माणसाच्या शोधात.
या कलावंताच्या कार्यालयाकडेही कानाडोळा करता नाही येणार.कारूणीकाची कौशल्यपूर्ण प्रतिमा.बोधीवृक्षाचं भरमसाठ भवताल.आणि त्याच्या पुढ्यात या चित्रकाराची गिरकी घेणारी खुर्ची.सगळंच कलात्मक. कथनाच्या पलिकडचं.
तसं या माणसाचं कौटुंबिक जीवन जरासं कटकटीचंच.येतात वादळं आणि जातातही विझून विस्तवासारखे. ‘कलावंत म्हटल्यावर सुटतच नसतो या कचाट्यातून.’अशी एक ऊर्दू कहावत आहे.ती कहावत करूण कहाणी म्हणून नसतेच मिरवायची कलावंतानं.अनेकदा असूही शकते ती कसोटीची कळ.नव्हता का तुकोबा अभंग रचताना असल्या कटकटींनी घेरलेला.तरीही झालाच ना तो कळस!
एका मुलीला, त्याच्या भाषेत पाडसाला जीव लावत जगतोय हा कलावंत जिगरबाज होऊन.
गावातल्या सांस्कृतिक, सामाजिक चळवळीला घालतो खतपाणी जमेल त्या पध्दतीनं.दोस्त असो वा दुष्मन सच्चेपणावर त्याचं प्रेम.नम्र बनून आलं तरी बेगडीप्रेम
बहि-यासारखं तो करतो कानाआड.
आणि असेल निखळ प्रेमाचा वाहता झरा तर हा थांबतो तिथं थकेपर्यंत.


नयन बारहाते या माणसाचं गणगोत महाराष्ट्र आणि बाहेरही!या गणगोतात रमतो गावचाच असल्यागत.गुणवान मित्राचं गुणगान करायला जशी कचरत नाही या कलावंताची जीभ तशीच तुटपुंज्या ताकदीची तालेवारी तासण्यातही तसूभर पडत नाही कमी!
बड्या बड्या प्रतिभावंतांशी प्रतिष्ठीत मैत्र.पण त्याचा देखावा शून्य.तसा हा कलंदर कलावंत.राहणं वागणं मनमौजी.
बोलणं, हसणं, खेळणं मोकळं ढाकळं.पांचट सभ्यतेचा बुरखा नाही की केवटी भावाची नम्रता नाही.
नाव बाराहते पण एक हात आणि दोन बोटांमधून आलेली अमर्याद चित्रं.अशा एका चित्रकार मित्राची आजच्या दिवशी आठवण होणं स्वाभाविकच.कारण आज त्याचा वाढदिवस!
गेली काही दिवस हा मित्र एका विचित्र आजारानं ग्रासलेला आहे.पाठीच्या कण्याचा त्रास सहन करीत जगतो आहे.मुंबईच्या इस्पितळात त्याच्यावर इलाज चालू आहे.या आजारातून हा विलक्षण ताकदीचा चित्रकार,सर्जक लवकर मुक्त व्हावा,अशी आपण प्रार्थना करू या!
आपणा सकळांच्या वतीनं नयनजींना शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *