६ जुलै रोजी खुरगावात रक्तदानासह विविध कार्यक्रम
नांदेड – बौद्धांना राजकीय मर्यादा आहेत. हे सत्य असले तरी बौद्ध समाजातील नेते तथा कार्यकर्ते यांची राजकीय अस्तित्वासाठी संघर्ष सुरू असतो. इथल्या विविध राजकीय पक्षांमध्ये बौद्धांचा वावर असतो. बुद्धकाळापासून धम्मकारण आणि राजकारण यांची सांगड घातली गेली आहे. अनेक राजांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला आहे. तेव्हा धम्मकारणासाठी आजच्या राजकीय बौद्धांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन धम्मगुरू भदंत पंय्याबोधी थेरो यांनी एका मुलाखतीत केले. देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीचा उल्लेख न करता ते म्हणाले की, एखाद्या पोटनिवडणुकीसाठी सुद्धा अनेकजण तयारी करीत असतात. ही जागा बौद्धांनी विजयी होऊन दाखवायची असेल तर सर्व गट तट विसरून एकत्र येणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले. पंय्याबोधी यांच्या जन्मदिनानिमित्त श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात महारक्तदान शिबिराचे आयोजन, वृक्षारोपण, चिवरदान, ग्रंथदान, भोजनदान, धम्मदेसना, धम्मगान आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पत्रकार राजेश्वर कांबळे यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी भंते संघरत्न, भंते सुदर्शन, भंते श्रद्धानंद यांच्यासह भिक्खू संघ, धम्मसेवक गंगाधर ढवळे, सामाजिक कार्यकर्ते परशुराम केंद्रे, ज्येष्ठ साहित्यिक पांडूरंग कोकुलवार यांची उपस्थिती होती.
मुलाखतीत पंय्याबोधी यांनी अनेक प्रश्नांना हसत खेळत उत्तरे दिली. प्रसंगी ते चिंतनशील झाले. काही आठवणींत हरवले. आजपर्यंतचा संपूर्ण प्रवास त्यांनी उलगडला. ते म्हणाले की, जीवन क्षणभंगुर आहे. जगात काही शाश्वत नाही. हे बुद्धानेच सांगितले आहे. माणसाचे आयुष्यही कमी झाले आहे. कोरोनाचा काळ भयंकर आला आहे. तेव्हा इतर जातीधर्मांच्या लोकांनी मानवतेने एकत्र नांदले पाहिजे. कोणताही धर्म अमानुषतेची शिकवण देत नाही. समता, ममता न्याय बंधुता ही जगण्याची चतुसुत्री असली पाहिजे. असे झाले तर कुणालाही जगण्यासाठी फारसा संघर्ष करावा लागणार नाही. मुळात राग द्वेष लोभ मोह माया मत्सर या षडरिपुंसह अहंभावाचा त्याग केला पाहिजे. एकमेकांच्या भावनांचा आदर केला पाहिजे. माणसाने मैत्रीभावना वाढविली पाहिजे. त्यामुळे कुणी कुणाचा वैरी राहत नाही. सृष्टीतील सर्व जिवांचे कल्याण होण्याची भावना निर्माण होणे हीच मैत्री भावना. तथागतांनी दुःखाचे मूळ शोधून काढून जो धम्ममार्ग सांगितला तो अखिल मानवजातीच्या कल्याणासाठीच आहे. मैत्रीभाव जतन केल्यास सुखप्राप्ती होते. कोणत्याही जाती धर्माच्या लोकांनी वैरभाव, राग वा अहंकाराने वागू नये. नम्रता बाळगावी यामुळे मानवाला विकास साधता येईल.
दान पारमितेविषयीच्या एका प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, महाउपासक अनाथपिंडकाएवढा दानी जगाच्या इतिहासात कुणी झाला नाही. अनाथपिंडक जेतवन विहारात जातांना रिकाम्या हाताने जात नसे. कधी भिक्खूंना अल्पोपहार घेऊन जात असे. कधी भोजन, कधी भिक्खूंसाठी चिवरे घेऊन जात असे. सत्तावन करोड मोहरा खर्च करून त्याने महाविहाराची निर्मिती केली आणि ते बुद्धांना, संघाला दान केले. जातीय अत्याचाराच्या बाबतीत ते म्हणाले की, जाणूनबुजून आपण कुणाला त्रास द्यायचा नाही. परंतु अत्याचार होत असेल तर तो निमूटपणे सहन करायचा नाही. अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. प्रतिकार करायलाच हवा. शिक्षणाचा संघर्ष आज बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे. तरीही आम्ही अनेक धम्मपरिषदांतून शैक्षणिक परिवर्तनाबाबत बोलत असतो. आपल्या मुला-मुलींच्या शिक्षणाकडे आजही दुर्लक्ष करता कामा नये. बुद्धांनी संपत्तीपेक्षा संततीला अधिक महत्त्व दिले आहे. संतती चांगली निपजली तरच धनसंपत्ती सुरक्षित किंवा विकासाच्या मार्गावर असते. आपण आता विकासाच्या मार्गावर आहोत पण सामाजिक समतेसाठी संघर्ष सुरुच ठेवावा लागेल. या संघर्षात इतर समविचारी जातींना सहभागी करून घेतले पाहिजे.
जन्मदिनानिमित्त घेतलेल्या मुलाखतीचा हा कार्यक्रम चांगलाच बहरला. अनेक कटू गोड आठवणींना यामुळे उजाळा मिळाला. हा संपूर्ण व्हिडिओ आकाश प्रकाशन युट्युब चॅनलने प्रसारित केला आहे.