( मागील भाग प्रकाशीत,.http://yugsakshilive.in/?p=12974,, आता पुढे वाचा)….
व पहाटेलाच सर्वांना उठवून गाडी लावली.
सकाळी लवकरंच मंडळी दिग्रसला पोहोचली. देवीच्या समोरील पटांगणात गाडी सोडली. देवी एका मोठ्या दगडी चबुतऱ्यावर उभी केलेली होती. पण ती शेंद्राच्या लेपानं बुजून गेली होती. जवळच भला मोठा जुना वटवृक्ष उभा होता. जवळंच बांधलेली मोठी बारव विहीर होती. पहाटे पासूनच पारावर सटवाईचा महाजन ठान मांडून बसला होता. पारा खाली एका बाजूला न्हावी आपलं सामान घेऊन तयार बसला होता.
पाराजवळ एक बकरं बांधलेलं दिसत होतं. येणारीजाणारी भक्त मंडळी त्या बकऱ्याची हळदी कुंकवाने पूजा करून त्याच्या गळ्यात नाडा बांधून पाया पडत होती. आणि दक्षिणा म्हणून पाच रुपये त्या महाजनाला देत होती. या साऱ्या प्रकाराला देवीला बकरं सोडणं असं नाव देण्यात आलं होतं.
नागा म्हाताऱ्यापासून लहान मुलांपर्यंत सर्वांनी विहिरीच्या थंड पाण्याने आंघोळी करून घेतल्या. प्रसन्न मनाने शुर्चिभूत होऊन मनोभावे देवीची पूजा केली. खण, नारळ, हळदी कुंकू, पानफुलं सर्व देवीला अर्पण करण्यात आलं. कापूर लावून आरती म्हटली. महाजनला दहा रु. दक्षिणा देण्यात आली आणि मग मंडळी नाव्ह्याकडे वळली. नाव्ह्याने मुलाच्या मामाला बोलावले. एकाच मुलाचा मामा आला होता. त्याने मुलांना मांडीवर घेतले. नाव्ह्यायाला कुंकाचा टिळा लावला. नाव्ह्याने मामाला टिळा लावला व कात्रीने केस कापून काढले. सर्वाना आनंद झाला. पाहुण्यांनी मुलांच्या हातात दोनदोन रुपये घालून तोंडभर आशीर्वाद दिला.
पण नागादाच्या धाकट्या नातवाचा मामा आला नव्हता, म्हणून धाकटी सून बाजूला बसून मुळुमुळु रडत होती. तिला सारे समजावीत होते. तर थोरला मुलगा मला माझ्या सासरच्यांनी आहेर हलका आणला म्हणून रुसून बसला होता. त्याला शानी माणसं समजावीत होती.
“घी बाबा घी, आहेर सांभाळून घ्यावं आताच सरलं का समदं ? म्होरं बकळ वक्त हाईत तवा घील की नादर आयीर. “
“राहू दी, राहू दी आता काय कार्य हाई मया घरात या पंचीस वर्षात ? आता मया बब्याच्या लगन वक्तालाच कायकी बा” असं बोलून निराशानेच त्याने आहेर स्वीकारला होता.
इकडे कारबारी मंडळीनी बकऱ्याची पूजा केली. त्याला हळदकुंकू वाहून गळ्यात नाडा बांधला. पाया पडून त्याच्या डोक्यावर पाणी शिंपडले. पाण्याच्या शितोड्याने बकऱ्याने झिंझाडा दिला. पावलं बाबा.. म्हणून एकाने मुल्लाला ईशारा केला. मुल्लाने सुरी काढली. बकऱ्याला खाली पाडले. दोघा तिघांनी दाबून धरून त्याच्या नरड्यावरवर सुरी फिरविली. बकऱ्याने एकदा मॅड करून आवाज केला. मग सारे कांही संपले. माणसांच्या भल्यासाठी बकऱ्याने आपला जीव गमावला होता. बकऱ्याचा मॅड असा आवाज ऐकून महाजन खेकसला. म्हणाला, “अरे, ओरडू कशाला देता त्याला ? आणि इतक्या जवळ कापता कशाला? थोडं दूर जाऊन कापता येत नाही काय?”
“झालं जे झालं मालक… ” बरं बरं, आता घेऊन जा तिकडं आणि हे बघ नागा त्याचे खूर आणि मुंडी आमची आसतीया बरं काय. ती आमच्या घरी नेऊन द्या.
“बरं मालक” नागा बोलला होता. देवीच्या पाठीमागे सारं मोकळं रान होतं. मंडळी मोकळ्या रानात गेली. बकऱ्याचं कातडं काढून खांडखुंड केले. तीन दगडांची चूल मांडून त्यावर भांड चढवून भाजीचा मसाला, तेल, मीठ, मिरची मागवून घेऊन आचाऱ्यांनी मस्त फोडणी दिली. आचारी जाळ घालत बसले. बाया माणसांनी वेगळ्या चुली पेटवून भाकरी टाकायला सुरुवात केली. सर्वत्र कामाची धांदल उडाली. उत्साह ओसंडून वाहत होता.
पाहुणे मंडळी थोड्या दूर अंतरावर एका झाडाच्या आडोश्याला बसून. दारूचे घोट हळूहळू घशाखाली उतरवत होते. गप्पा रंगत होत्या. तेवढ्यात नागादाने पाहुण्यांना जेवायला बसायला बोलावले. जो तो मी वाढत तुम्ही बसा असा आग्रह करीत होता. शेवटी विनंती करून नागादाने सर्वांना बसवले.
इतक्यात दोन पाहुण्यांत काय बाचाबाची झाली कोणास ठाऊक. ते जेवता जेवता उठले नि एकमेकांच्या अंगावर जाऊ लागले. शिव्याश्याप देऊ लागले. इतर जन जेवण थांबवून त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करू लागले. साराच इचका झाला. तेवढ्यात देवीच्या महाजनाचा गडी आला. त्याचे वेगळे गाने होते. कुणाचे कुणाला कांही समजत नव्हते. महाजनाचा गडी नागाला म्हणाला, “तुम्ही फक्त खूरमुंडी पाठविली. भाजी कोण देईल ? देवीला येता आणि महाजनाला सोडून खाता काय ? तुम्हाला लाज वाटायला हवी. ” हा ” सारा प्रकार पाहून नागा गोंधळून गेला होता. तो हात जोडून म्हणाला, “चुकलो मालक, आता पाठवून देतो.” मागितल्यावर देतोस काय…. ते ही तुझ्या हाताने शिजविलेले ? ते चालते काय आम्हासनी ?” “अशाने देवी की पावेल थेरड्या ? सारेच वाया गेले की….” ऐवढे बोलून तो गेला. पाहुण्यांनी देखील भांडण थांबविले होते. ते शांतपणे जेवत होते.
पण म्हातारा नागा पार कोमेजून गेला होता. त्याचे हृदय पार विदीर्ण झाले होते. आपणास देवीचा आशीर्वाद मिळणार नाही. आणि आपल्या गावच्या पाटलाकडे दोनशे रुपये फेडण्यासाठी आपल्या मुलांना किती दिवस राबावे लागेल कोण जाणे? या विचाराने म्हाताऱ्याला कांही सूचत नव्हते. तो भिंताडांगत स्थिर उभा होता. कर्जात गमावलेल्या आयुष्याचं गणित करीत.
.द.घाटे
छोटी गल्ली ,हिराई भवन,
कंधार ता.कंधार जि.नांदेड
(९४०५९१४६१७)
रुमणपेच (कथासंग्रह)
प्रकाशक ; गणगोत प्रकाशन
(९६६५६८२५२८)
मुल्य ; २१०/- रु