मुखेड – कोणत्याही विद्यार्थ्याला त्याच्या शिक्षणासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध जातीनुसार, वर्गानुसार, उत्पन्नानुसार वेगवेगळ्या शिष्यवृत्त्या दिल्या जातात. ज्याचा फायदा घेऊन गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे हा त्याचा मुख्य उद्देश आहे.
समाजातील एस.सी., एस.टी., एन.टी.,ओ.बी.सी., अल्पसंख्यांक या वर्गांसाठी व तसेच आर्थिक मागास असलेल्या साठी विविध शिष्यवृत्त्या दिल्या जातात. या शिष्यवृत्तीचा फायदा घेऊन अनेक जण आपल्या आयुष्यात मोठ्या पदापर्यंत पोहोचले आहेत पण अलीकडच्या काळात या शिष्यवृत्ती बाबत विद्यार्थ्यात उदासीनता दिसून येते आहे.मुळात कित्येक हजार वर्षांपासून ज्या समाजघटकांना शिक्षणापासून वंचित ठेवले गेले त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज व बाबासाहेब आंबेडकरांसारख्या समाज सुधारकांनी प्रयत्न केले त्याचाच एक भाग म्हणजे या विविध शिष्यवृत्त्या आहेत. या वर्षी पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ घ्यायची तारीख १५ जुलै २०२१ आहे. तेंव्हा विद्यार्थ्यांनी विविध शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. गुरुनाथ कल्याण यांनी ग्रामीण ( कला, वाणिज्य व विज्ञान )महाविद्यालय वसंतनगर ता. मुखेड जि. नांदेड येथील ग्रंथालय समिती व शिष्यवृत्ती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना’या विषयावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना केले.
यावेळी अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरिदास राठोड म्हणाले की अलीकडे महाविद्यालयात विद्यार्थी या योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेताना दिसत नाहीत.निष्काळजीपणा जास्तीचा दिसून येतो.आमची पिढी ही शिष्यवृत्तीमुळेच घडली.तेंव्हा तुम्ही ही सांगीतलेली कागदपत्रे वेळेवर सादर करून शिष्यवृत्ती प्राप्त करून घ्या व कुटुंबावरील शिक्षणाचा आर्थिक बोजा कमी करा. विद्यार्थ्यांसाठी शासन वेळोवेळी वेगवेगळ्या योजना आणत असते. त्या योजनांचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे.त्यासाठी तुम्ही सतत अपडेट राहिले पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक या शिष्यवृत्ती समितीचे प्रमुख प्रा.श्रीकांत जेवळे यांनी करून विविध शिष्यवृत्ती देण्या मागील भूमिका विशद केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सिनेट सदस्य प्रा. डॉ.संजीव रेड्डी यांनीही मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचलन या समीतीचे सदस्य प्रा. बळीराम राठोड यांनी केले तर आभार ग्रंथालय समितीचे प्रमुख ग्रंथपाल प्रा. डॉ. सूग्रीव क्षीरसागर यांनी मानले. तंत्र सहायक म्हणून प्रा. डॉ.महेश पेंटेवार यांनी काम पाहिले.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य अरुणकुमार थोरवे, माजी प्राचार्य डॉ. रामकृष्ण बदने, माजी प्राचार्य डॉ.देवीदास केंद्रे,स्टाफ सेक्रेटरी प्रा. डॉ. व्यंकट चव्हाण, सह स्टाफ सेक्रेटरी प्रा.सौ.शिल्पा शेंडगे, समिती सदस्या प्रा. डॉ.कविता लोहाळे, श्री वीरभद्र भालेराव अन्य प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.