आषाढ मासारंभालाच तब्बल दीड तास धुवाधार पाऊस , शेतकऱ्यांत नवचैतन्य…मृग गेला , आर्द्रा गेल्या पुनर्वसू ने दिला आधार अन्यथा बळीराजा होता बेजार.

फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )

आठ जून रोजी सूर्याचा गाढव वाहन घेऊन मृग नक्षत्रात प्रवेश झाला आणि खरीप हंगामातील विविध पिकांच्या पेरणीला सुरुवात करण्यासाठी बळीराजा सज्ज झाला. परंतु मृग नक्षत्रात म्हणावा तसा पाऊस झाला नसल्याने यंदा पेरण्या थोड्या उशिराच सुरू झाल्या . त्यानंतर २१ जून रोजी सूर्याचा आर्द्रा नक्षत्रात कोल्हा वाहन घेऊन प्रवेश झाला आणि शेवटी शेवटी बऱ्यापैकी पाऊस पडला . पण ५ जुलै रोजी उंदीर वाहन घेऊन सूर्याचा पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश झाला आणि चांगल्या पावसाला सुरुवात झाली. आज ता. १० जून रोजी तर दुपार नंतर तब्बल दीड ते दोन तास धुवाधार बॅटिंग करत पावसाने कहरच गाठला.

गेली काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा काळ्या आईची ओटी भरून पावसासाठी आभाळाकडे नजरा लावून देवा दुबार पेरणीचे तर संकट आमच्यावर येणार नाही ना ? या चिंतेत प्रत्येक शेतकरी होता . परंतु आज आषाढ महिन्याच्या प्रारंभीच्या दिवशी झालेल्या पावसाने बळीराजा सुखावला असून पांडुरंगाने शेवटी आमचे गाऱ्हाणे ऐकलेच अशा समाधानात आनंदाने भारावून गेले होते.

आज झालेल्या पावसाने मात्र रस्ते , नाल्या यांची चांगलीच वाट लागली असून राष्ट्रीय महामार्ग बनवण्यासाठी खोदून ठेवण्यात आलेल्या रस्त्यावर व रस्त्यालगत ओढ्याना पुराचे स्वरूप आले होते. त्या रस्त्यावरून पायी चालणे , मोटारसायकल चालवणे जिकरीचे झाले आहे. पावसाचा वेग आणि गाराडून आलेले आभाळ पाहून वाहनधारकांना भर दिवसा गाड्यांच्या लाईट लावून वाहन चालवावे लागत होते.

सदर रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण झाले नाही तर येणाऱ्या काळात आणि याच पावसाळ्यात किती अपघात होतील हे न सांगितलेलेच बरे , तेंव्हा संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे जनतेतून बोलल्या जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *