नांदेड ; सातत्याने होणा-या इंधन दरवाढ व महागाईच्या विरोधात गुरूवार, दि.15 जुलै रोजी सकाळी 10 वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात जुना मोंढा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा बैलगाडी व सायकल मोर्चा काढण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या धोरणामुळे महागाई वाढत असून भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर ढासळत असून देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्नात निच्चांक पातळी गाठली आहे. इंधन दरवाढ नियंत्रित करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात न आल्याने इंधन दरात सातत्याने वाढ सुरूच आहे. गेल्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या दराने शतक पूर्ण करत सर्वोच्च पातळी गाठली आहे. दिवसागणिक इंधन दरवाढ होत असून त्याचबरोबर महागाईत वाढ होत आहे. लॉकडाउनच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीत घट होत असतांना देखील भारतात इंधनाचे दर वाढत आहेत असा आरोपही काँग्रेसने केला आहे.
इंधन दरवाढ व महागाई विरोधात जनतेचा आवाज मोदी सरकारच्या कानावर पडावा व केंद्र शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा यासाठी राज्यभर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येत असून गुरुवारी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात बैलगाडी व सायकल मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरोनाचे सर्व नियम पाळून आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे महानगराध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर, माजी पालकमंत्री डी.पी.सावंत, आ.मोहनअण्णा हंबर्डे, आ. माधवराव पाटील जवळगावकर, जि.प. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर मोहिनीताई येवनकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण, माजी आ.हनमंत पाटील बेटमोगरेकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पू कोंडेकर, शहर जिल्हाध्यक्ष डाॅ. विठ्ठल पावडे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कविता कळसकर, शहराध्यक्षा अऩुजा तेहरा, ब्लाॅक काँग्रेसचे अध्यक्ष किशोर स्वामी, विनोद कांचनगिरे, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष अब्दुल गफार, सत्यजित भोसले यांनी केले आहे.