मन्याड खो-यातील धन्वंतरी… शब्दांकन – प्राचार्या आशा शिंदे, पुणे यांचे मनोगत

सुज्ञ, सुजाण, सुबुद्ध, सुशील, सुसंस्कारित रसिक वाचकहो,

‘मन्याड खोऱ्यातील धन्वंतरी’ हे डॉ. माधवराव रणदिवे यांचे आत्मचरित्र आपल्या हाती देताना मनस्वी आनंद होत आहे. हे आत्मचरित्र शब्दांकित करण्याचं महद् भाग्य मला लाभलं.

डॉक्टर साहेबांच्या मनात आत्मचरित्र लिहिण्याची प्रेरणा ही त्यांचा डॉक्टर मुलगा स्वप्नीलमुळेच निर्माण झाली. त्यानेच त्यांना आत्मचरित्र लिहिण्यास प्रवृत्त केले. डॉ. स्वप्नील जेव्हा त्यांच्या रणदिवे हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टीस करू लागला तेव्हा त्याला नेहमीच अनेक पेशंटस् म्हणायचे – “डॉक्टरसाहेब, आम्ही तुमचे बारसे जेवलो आहोत, काय तुमच्या बारशाचा थाट होता असं बारसं पंचक्रोशीत झालं नव्हतं.” कुणीतरी म्हणायचं – ” मोठ्या सायबांची काय प्रॅक्टीस जोरात चालायची ! पेशंटची हीऽऽ गर्दी असायची. त्यांचा हातगुणही चांगला होता.’ त्यामुळेच स्वप्नील त्याच्या बाबांना एकदा म्हणाला – “बाबा तुमच्याकडे खूप वेगवेगळ्या रुग्णांचे अनुभव आहेत. तुम्ही आत्मचरित्र लिहा.” डॉक्टरसाहेबांच्या मनात आत्मचरित्र लिहिण्याचे विचार हळूहळू येऊ लागले.

मी डॉ. रणदिवे यांची सर्वांत मोठी मेहुणी. माझी तीन नंबरची धाकटी बहीण चंदा ही त्यांची अर्धांगिनी. जेव्हा डॉक्टरांचे लग्न झाले तेव्हा ते लोह्याला होते आणि मी तेव्हा कंधारला होते. कारण माझे मिस्टर प्राचार्य शांताराम रामचंद्र शिंदे हे शिवाजी मोफत कॉलेजचे प्राचार्य म्हणून कार्यरत होते. डॉक्टरसाहेबांची कीर्ती हळूहळू आमच्या कानावर येत होती. आम्ही माझ्या बहिणीचे पहिले डोहाळ-जेवण कंधारमध्ये माझ्या पंचवीस-तीस मैत्रीणी बोलावून केले होते. त्यावेळी डॉक्टरसाहेब, त्यांचे ‘बाई दादा’, त्यांचा लहान पुतण्या, माझी बहीण चंदा असे सर्वजण कंधारला आले होते. मीही दोन-तीन वेळा लोह्याला त्यांच्याकडे गेले होते. हळूहळू डॉक्टरां कुशलता, त्यांचा निष्णातपणा आणि गरीबांविषयीचा कळवळा आमच्या लक्षात यायला लागला होता.

कालांतराने डॉक्टरसाहेबांची बदली कंधारला झाली आणि आम्हां दोन कुटुंबांच्या नात्यातील वीण अधिकच घट्ट झाली. आमचे प्राचार्य शांताराम शिंदे हे तर डॉक्टरांचे मित्रच बनले. या आत्मचरित्रात डॉक्टरसाहेबांनी ‘माझे मोठे साडू…. ? या नावाचे प्रकरण लिहिले आहेच. त्यावरून वाचकांच्या लक्षात येईलच. आम्हां दोघांनाही नेहमीच एका गोष्टीचे आश्चर्य वाटत गेले की डॉक्टरसाहेबांचे सर्वच पक्षातल्या राजकीय पुढाऱ्यांशी एवढे कसे जमते ? सगळ्यांशीच अत्यंत चांगले संबंध, सौहार्दपूर्ण वागणूक. रुग्णांविषयीचा कळवळा, माणुसकी, आपुलकी, आस्था हे सगळं मी जातीनं अनुभवलं आहे. नात्यागोत्यातील सर्वांच्याच कल्याणाचा ध्यास आणि त्यासाठी लागेल ती आर्थिक मदत. घरात पै-पाहुणे, मित्रमंडळींचा सतत राबता.

“नाती जपण्यात मजा आहे

बंध आयुष्याचे विणण्यात मजा आहे”

मंगेश पाडगावकरांच्या या काव्यपंक्ती डॉक्टर रणदिवे पती-पत्नीच्या बाबतीत अगदी सार्थ आहेत.

सर्वात कहर म्हणजे कंधारसारख्या ग्रामीण भागातून माध्यमिक शिक्षण घेऊन त्यांची चारही मुले – तीन मुली आणि एक मुलगा हे सर्वजण एम. बी. बी. एस., एम. डी. झाले. सर्व जावई एम. बी. बी. एस., एम. डी. खरोखर ‘अहो पुरुषस्य भाग्यं’ म्हणतात ते हेच ! आमच्या सर्व नातेवाईकांत डॉक्टरांसारखं सुशिक्षित, सुसंस्कृत, सधन कुटुंब दुसरं नाही. त्यांची अर्धांगिनी म्हणजे माझी बहीण चंदा व डॉक्टरसाहेब हे दोघे कधीही एकमेकांशी भांडले नाहीत. याला कारण अर्थातच माझ्या बहिणीचा शांत, सहनशील, संयमी स्वभाव. त्या दोघांनी जगासमोर एका आदर्श कुटुंबाचा दाखला ठेवला आहे. त्यामुळे मलाही नेहमी वाटायचं डॉक्टरांनी आत्मचरित्र लिहावे.

फार पूर्वीच आम्ही कंधार सोडून नोकरीनिमित्ताने भटकंती करीत राहिलो. प्राचार्य शांताराम शिंदे हे तीस वर्षांपूर्वीच स्वर्गवासी झाले. माझी मुलगी अक्षरा ही नांदेड येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातून बी. ए. एम. एस. झाली. त्यानिमित्ताने माझे वारंवार नांदेड, कंधार येथे येणे-जाणे व्हायचेच. खूप पैसे, नावलौकिक मिळवूनही या दोघा पती-पत्नींचे पाय नेहमी जमीनीवरच राहिले. इतरांना मदत करण्याची वृत्ती यत्किंचितही कमी झाली नाही. हे सर्व ‘याचि देहि याची डोळा’ मी पहात होते.

माझी मुलगी अक्षराच्या लग्नाला मी मागताक्षणी डॉक्टरसाहेबांनी आढेवेढे न घेता दहा हजारांची आर्थिक मदत केली होती. अर्थातच मी माझ्या सवडीने त्यांचे पैसे परत केले होते.

माझे पती स्वर्गवासी झाल्यानंतर आणि माझ्या एकुलत्या एक मुलाचे प्राणोत्क्रमण झाल्यानंतर माझ्या सर्वच जवळच्या नातेवाईकांनी मला जो आधार दिला त्यामध्ये डॉक्टरसाहेब, चंदा, स्वप्नील, वर्षा यांचा सिंहाचा वाटा आहे.

मी दोन वर्षांपूर्वी कंधारला आले होते. प्राचार्या म्हणून मीही निवृत्त झाले होते. माझा मुलगा सुपर्ण हा नुकताच स्वर्गवासी झाला होता. लहान बहिणीने सौ. चंदाने मोठ्या बहिणीला – मला चार दिवस सुखदुःखासाठी बोलावले होते. त्यावेळी मी तब्बल महिना दीड महिना राहिले होते. या संपूर्ण कुटुंबानं मला इतकी चांगली वागणूक दिली की त्याविषयी लिहिण्यास माझ्याकडे शब्दच नाहीत ! त्याच काळात मी डॉक्टरसाहेबांना म्ह “डॉक्टरसाहेब तुमचं चरित्र खूप आगळं वेगळं आहे. आज बाजारात –

कितीतरी आत्मचरित्र येताहेत, जो उठतो तो आत्मचरित्र लिहितो. तुम्ही आत्मचरित्र का लिहित नाही ?” तेव्हा डॉक्टर मला म्हणाले, “आमचा स्वप्नीलही मला आत्मचरित्र लिहण्याचा आग्रह करतो आहे. परंतु कोण लिहिणार? मला लिहिणे जमणार नाही. मी काही साहित्यिक नाही.” तेव्हा मी लगेच म्हणाले, “अहो डॉक्टरसाहेब, तुम्ही सांगा, मी लिहिते – तुमचं बालपण, शिक्षण, तुमचे डॉक्टरी व्यवसायातले अनुभव. हे सगळं अस्सल, प्रांजळ असलं म्हणजे झालं. आणखी काय लागतं?” ही कल्पना सर्वांनाच आवडली.

दोनचार दिवसातच मी लिहायला बसले. रोज दोन तास वेळ काढून डॉक्टरसाहेब त्यांचे अनुभव कथन करायचे – मी लिहायचे असा सपाटाच लावला. मग आम्ही काही मित्र, आप्तेष्ट, राजकीय पुढारी यांना विनंती करून लेख मागवले. सर्वांनी आम्हांला महिनाभरातच लेख तत्परतेनं पाठवून दिले. खरं तर काही अपरिहार्य कारणांमुळे आम्हांलाच हे आत्मचरित्र प्रकाशित करायला वेळ लागला आहे. परंतु शेवटी हा लेखन प्रपंच एकदाचा साकारला. ‘मन्याड खोऱ्यातील धन्वंतरी’ चा जन्म झाला. लवकरच त्याचे बारसे करण्याचा मनोदय आहे.

डॉक्टरसाहेबांच्या आत्मकथनाला त्यांनी ‘मन्याड खोऱ्यातील धन्वंतरी’ हे ‘शीर्षक’ का दिले ? हे छोटेसे प्रकरण वाचताना त्यांची जन्मभूमी धारुर आणि कर्मभूमी कंधारविषयीची त्यांची ओढ, आत्मीयता दिसून येते. विलक्षण योगायोग असा की जन्मभूमी आणि कर्मभूमी दोन्ही तीन अक्षरी शब्द असून दोन्हीमध्ये शेवटी ‘र’ आहे.

‘मन्याड खोऱ्यातील धन्वंतरी’ या आत्मचरित्रात ‘आमचे कुलदैव’ मधून त्यांना त्यांच्या कुलदैवताचा शोध कसा लागला ? हे वाचणे मनोरंजक ठरेल. ‘दैवते – माय-तात’ मधून त्यांची, त्यांच्या ‘बाई-दादांवरची’ अढळ निष्ठा प्रत्ययास येते. त्यांची पहिली नोकरी लोहा’ आणि नंतर ‘कंधारमधील मंतरलेले दिवस’ वाचताना त्यांना दोन्ही ठिकाणी भेटलेले अविस्मरणीय पेशंट्स, कोणत्याही सोयी-सुविधा नसताना त्यांनी घेतलेली आरोग्य शिबीरे त्यामधून त्यांनी अथक, अविश्रांत झपाटून केलेलं काम वाचून ‘डॉ. प्रकाश आमटे’ यांच्यावरील सिनेमाची आठवण झाल्याखेरीज रहात नाही.

लोह्यामध्ये त्यांच्या लग्नानंतर त्यांना चार-पाच दिवसांतच व्ही. आय. पी. पेशंट्स भेटतात – ते थोडेही चलबिचल होत नाहीत – धैर्याने, कुश नुकतंच घेतलेलं त्यांचं वैद्यकीय शिक्षण ते पणाला लावतात आणि रुग्णांना बरे करतात. ‘नारु व इसब बरा करणारा एकमेव डॉक्टर’ ही आसमंतात पसरलेली त्यांची ख्याती वैद्यकीय व्यवसायातील त्यांची विशेषता सांगून जाते. सरकारी नोकरी स्वाभिमानाने सोडून देऊन कंधारमध्ये त्यांनी उभे केलेले रणदिवे हॉस्पीटल म्हणजे स्वर्गीय कवी सुपर्ण शिंदे यांच्या शब्दांत –

“लाखमोलाची माणुसकी जपणारं हॉस्पिटल घाईगडबडीच्या आयुष्यात नकोशी होतात दुखणी आजार तेव्हा ‘रणदिवे’ डॉक्टर होतात मायेचा आधार आपुलकीनं सेवा देणारं कुणी असेल तर क्षणार्धच लागतो बरं व्हायला”

अशीच आपुलकी, जिव्हाळा त्यांच्या हॉस्पीटलमध्ये अनुभवायला म्हणूनच ते ‘जनतेचे आवडते डॉक्टर’ झालेले आहेत. या आत्मचरित्रातील सर्वांत इंटरेस्टिंग प्रकरण म्हणजे ‘स्वप्नीलचे नभूतो न भविष्यति असे बारसे !’ तत्कालीन वृत्तपत्रांतून आलेले वर्णन येथे जसेच्या तसे दिलेले आहे.

डॉक्टरसाहेबांच्या तीन मुली, मुलगा, सून यांची त्यांच्या विषयीची, मते, विचार वाचताना त्या सर्वांना ‘आई-बाबांविषयी वाटणारा आदर वाचकांच्याही हृदयात एक आगळे-वेगळे स्थान निर्माण करतो.

डॉक्टरसाहेबांचे जीवघेणे, दुर्धर अशा आजारांविषयी माहिती करून घेताना ह्या माणसानं गेली बत्तीस वर्षे स्वत:च्या शरीरात डायबेटिस आणि बी. पी. हे दोन बॉम्बगोळे कसे बाळगले आहेत, हे ‘देव तारी त्याला कोण मारी’

या प्रकरणातून कळते आणि मन अचंभित होऊन जाते. औरंगाबाद येथे झालेले त्यांच्या वर्गमित्रांचे ‘गेट-टू-गेदर’ ‘गोल्डन

ज्युबिली मीट’ ही प्रकरणे मनाला निश्चितच आनंद देऊन जातात.

‘देवानेही हेवा करावा अन् प्रेमानेही लाजावं’ असं त्यांच्यातील मैत्रीचं प्रेमळ, प्रांजळ आणि प्रामाणिक नातं पाहून खरोखरच हेवा वाटतो आणि पन्नास वर्षानंतरही त्यांची मैत्री अबाधित राहिली याचे सखेद आश्चर्य वाटल्यावाचून रहात नाही.

सर्व नातेवाईकांच्या समवेत केलेल्या बालाजी आणि हरिद्वारची सहल, आमलेकर, नंदनवार व वराळे या मित्रांच्या सहवासात केलेल्या म्हैसूर, बंगलोर उटी या सहली वाचकांनाही निखळ आनंद देतात.

डॉक्टरसाहेबांच्या अंगणातील लिंबाचे झाड, त्याला बांधलेला झोका, त्यांनी पाळलेले टॉमी, मोगली हे लाडके प्राणी वाचकांना खूप काही सांगून जातात. मी तर म्हणेन.

“एका लिंबाची ही छाया, पशूंची ही माया संसाराचे तापत्रय पुरे सुखाने सोसाया”

यांच्या सहवासात डॉकटरसाहेबांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे शीण कुठल्या कुठे पळून गेले असतील, नाही का ?

‘मन्याड खोऱ्यातील धन्वंतरी’ हे आत्मचरित्र मी शब्दांकित केलेलं आहे, म्हणून म्हणत नाही परंतु एकंदरीत ते वाचनीय झाले आहे, यात संशय नाही.

या आत्मचरित्रात मान्यवरांचे, पै-पाहुण्यांचे, मित्रांचे जे अनेक लेख प्रकाशित झालेले आहेत, त्या सर्वच लेखांनी डॉक्टरांचे अनेकपदरी व्यक्तीमत्त्व

उलगडून दाखवले आहे. खरंच काही माणसं खूप अफाट व्यक्तीमत्त्वाची असातात. “शब्दांनाही कोडे पडावे एवढी काही माणसं मोठी असतात पण केवढे आपले भाग्य असते जेव्हा ती आपली असतात !”

हेच, अगदी हेच हे सर्व लेख वाचल्यानंतर प्रत्ययाला येते. या सर्व लेखातून डॉक्टर रणदिवे यांचे सर्वांना सर्वतोपरी मदत करणारा एक सच्चा माणूस, जिव्हाळा, आपुलकीनं ओतप्रोत भरलेला एक शिस्तप्रिय पिता, पत्नीची काळजी घेणारा एक आदर्श पती, गरीबांचा साक्षात् देव, समाजसेवेचा आदर्श दीपस्तंभ, एक वटवृक्ष असे अनेक पदरी सर्वंकष, अष्टपैलू व्यक्तीमत्त्व वाचकांच्या नजरेत भरते. हा त्या सर्व लेखांचा सुंदर असा एकत्रित परिणाम आहे. हा फारच थोड्या आत्मचरित्रांमधून प्रकर्षाने जाणवतो. या आत्मचरित्रात जर काही उणीवा राहिल्या असतील तर तो दोष डॉक्टरसाहेबांचा नव्हे; हे आत्मचरित्र शब्दबद्ध करणाऱ्या माझ्यासारख्या सामान्य स्त्रिचा असेल.

आता यात प्रसिद्ध झालेल्या लेखांविषयी थोडेसे झालेल्या प्रतिक्रिया अत्यंत बोलक्या आहेत. यामधून व्यक्त

मा. केशवरावजी धोंडगे लिहितात. – “बहुजनांचा कळवळा असणारा, मृत्युच्या दाढेतून रुग्णांना वाचवून आयुष्य वाचविणारा धन्वंतरी म्हणजेच आमचे प्राण वाचविणारे उपकारकर्ते, मर्द बाण्याचे…. डॉ. रणदिवे साहेब या माझे प्राण वाचविणाऱ्या खऱ्या दैवताला वंदन करून या पुस्तकाला माझी सदिच्छा व्यक्त करतो.” किती सार्थ आहे हे ! मा. ईश्वरराव भोसीकर म्हणतात – ‘डॉ. माधवराव रणदिवे म्हणजे एक आदर्श व्यक्तीमत्त्व, नजरेत भरणारी एक शासकीय अधिकारी व्यक्ती.’ मा. गुरुनाथरावजी कुरुडे लिहितात – “अतिसाराच्या बिमारीतून माझा पण प्राण वाचवला. कंधारचे भूषण ठरलेले धन्वंतरी त्यांचा सुविद्य डॉक्टर मुलगा कंधारला रुग्णसेवा करीत आहे. त्यांची पत्नी कंधारमधील एक सुशील, प्रतिष्ठित महिला म्हणून प्रसिद्ध आहेत. एकंदरीत डॉ. रणदिवे आहे.” व्यक्ती नसून ती एक नावाजलेली संस्थाच बनली

डॉक्टरसाहेबांच्या अर्धांगिनी लिहितात नि:स्पृहता, निर्भयता, निष्पापपणा, प्रामाणिकपणा असणारे, मुक्या प्राण्यांवरही मनापासून प्रेम करणारे, डॉ. रणदिवेंसारखे पती मला मिळाले हे मी माझे भाग्यच समजते. माझे पती एक उत्स्फूर्त व्यक्तीमत्त्व आहे.

“तुम्ही मेरे मंदिर, तुम्ही मेरी पूजा,

तुम्ही मेरे देवता हो

कोई मेरे आँखोसे देखे तो समझे कि तुम मेरे क्या हो’

आपल्या जोडीदाराचं त्यांनी किती योग्य वर्णन केलं आहे ! डॉक्टरांची ज्येष्ठ कन्या वैशाली म्हणते- “लहानपण देगा देवा आई – बाबांजवळ रहायला” प्रत्येक जन्मोजन्मात मला हेच हेच हेच आई-बाबा हवेत ही तिची आर्त इच्छा काळजात घर करून जाते.

डॉक्टरसाहेबांची द्वितीय कन्या माधुरी ही लहानपणी तिच्या बाबांना खूप घाबरणारी, बाबांना चोरून कादंबऱ्या वाचणारी, तिचे बाबा, अंगणा लिंबाचे झाड आणि नागपंचमीच्या सण यांच्याशी तिचे अतूट नाते आहे. बाबा म्हणाले होते –

“यापेक्षा ‘ययाती’, ‘स्वामी’ वाचा मग आनंदाचे मोरपीस गालावरती फिरते”

यामधून श्रेष्ठ कादंबऱ्या वाचनाचे सुसंस्कार तिच्या बाबांनी केले आहेत,

हे जाणवते.

डॉक्टरसाहेबांची तिसरी कन्या दीपूला तर तिचे बाबा म्हणजे सर्वांना शीतल छाया देणारे वटवृक्षच वाटतात. तिच्या बाबांच्या अपार कष्टाचा आणि त्यांना मोलाची साथ देणाऱ्या तिच्या आईचा तिला सार्थ अभिमान वाटतो. अमरावतीला ती शिकत असताना तिच्या रूममध्ये थोडावेळच तिचे बाबा ज्या खुर्चीवर बसायचे त्या खुर्चीला ती प्रत्येक पेपरला जाताना पाया पडायची आणि खरोखरच तिला पेपर सोपा जायचा. बाबांवरील अशी ही श्रद्धा आजकाल दुर्मिळच ! हे वाचून मन थक्क होतं.

वर्षा ही डॉक्टरसाहेबांची स्नुषा. हिला डॉक्टरसाहेब म्हणजे ‘संस्कारांची शिदोरी’ वाटते. सुनेबरोबर मनमोकळेपणाने बोलणारे सासू-सासरे, आजारी पडल्यानंतर बेटा, बेटा म्हणणारी सासू, कसं काय आहे पायाचं दुखणं माय ? असं अत्यंत मायेनं विचारणारे सासरे म्हणजे तिच्यासाठी तिचे दुसरे आई बाबाच आहेत.

माझी मुलगी डॉ. अक्षरा हिनेही ‘माझे डॉक्टरकाका एक गुरुतुल्य व्यक्तीमत्त्व, पितृतुल्य व्यक्तीमत्त्व या नावाचा प्रदीर्घ लेख लिहून डॉक्टरसाहेबांच्या

एकूणच स्वभावावर, कार्यशैलीवर प्रकाश टाकलेला आहे. तिची कविता तर अफलातून झाली आहे. ती डॉक्टरकाकांच्या हाताखाली शिकतानाचे सर्वच प्रसंग हृद्य झाले आहेत. तिच्या मते पैशांपाठीमागे न धावणारा, पैशांसाठी गोरगरीबांची अडवणूक न करणारा डॉक्टर आजच्या काळात तरी विरळाच !

डॉक्टरसाहेब हे सौ. उषा उभारे यांचे आवडते भाऊजी असून त्यांनी तिला एम. पी. एड्. होण्याकरिता प्रोत्साहन तर दिलेच पण आर्थिक मदतही केली. आज केवळ आणि केवळ ती शिक्षणखात्यात शासकीय अधिकारी आहे ते तिचे वडील धर्मवीर रामभाऊ आबा पवार आणि डॉक्टरसाहेबांमुळेच!

पुण्यातील शास्त्रज्ञ बी. एस. गुगळे हे डॉक्टरसाहेबांचे धाकटे साडू. डॉक्टरसाहेबांनी त्यांना त्यांच्या लग्नानंतर रांची-बिहार येथे उच्च शिक्षणासाठी जाण्याकरिता प्रोत्साहन दिले. डॉक्टरसाहेब त्यांना अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे वाटतात.

सौ. प्रभावतीबाई धोंडगे यांनी ‘ऋणानुबंधाच्या इथेच पडल्या गाठी’ पुढे कशा घट्ट झाल्या, अतुट झाल्या हे अनेक अस्सल, प्रांजळ अनुभवांतून चितारलेले आहे. त्यांच्या भागूचे बाळंतपण, त्यांचे कुटुंबनियोजनाचे ऑपरेशन त्या प्रत्येक वेळी सौ. चंदाताईनी त्यांना दिलेली ‘माहेरपणाची माया, डॉक्टरांच्या ठिकाणी वसत असलेल्या सरावण (श्रावण) बाळाचे, भक्त पुंडलिकाचे त्यांना झालेले दर्शन विलोभनीय आहे.

मा. अनिल आमलेकर या निवृत्त न्यायाधिशांना डॉक्टर रणदिवे हे सेवाव्रती, समर्पित, सज्जन, हसतमुख व आनंदी स्वभावामुळे – ‘सामान्यातील असामान्य कर्मयोगी धन्वंतरी’ म्हणून भावतात. त्यांच्या दोन्ही कुटुंबातील मैत्रीचा धागा कधीही उसवणार नाही याची त्यांना खात्री वाटते. त्यांनी डॉक्टरांच्या स्वभावामुळे घरी येणाऱ्यांचा राबता सतत वाढत असलेला पाहिला होता आणि वहिनींनी देखील याविषयी कधीही तक्रार केली नाही याची ते प्रांजळ कबूली देतात.

मा. नारायण जवकर हा डॉक्टरांच्या जन्मगावचा शाळकरी बालमित्र. या बालमित्राचे उच्च शिक्षण हे डॉक्टरसाहेबांच्या ‘दादांमुळेच झाले याचा ते आवर्जून उल्लेख करतात. जिव्हाळा हे डॉक्टरांचे प्रमुख भांडवल असून त्यांची सर्व मुले डॉक्टर्स झाली आहेत, जणू डॉक्टरसाहेबांनी ‘डॉक्टर्स बनविणारी फॅक्टरीच काढली आहे’ – असे त्यांना वाटते. त्यामध्ये या मित्राच्या पत्नीला ते सुद्धा ते १०१ टक्के मार्क्स देतात.

डॉक्टरसाहेब आणि नारायण जवकर यांची मैत्री पाहिल्यानंतर अ

“मंदिराचे पावित्र्य जपणारा घंटेचा मंजूळ नाद सुखदुःखात हक्काने आवर्जून मारावी अशी साद म्हणजे – तुझी अन् माझी मैत्री !!”

श्री कृष्णा नंदनवार हे कंधारला नायब तहसिलदार म्हणून कार्यरत होते. तत्कालीन राजकारणामुळे प्रथम ते कंधारला यायलाच तयार नव्हते. चंदाताई आणि डॉक्टरांमुळेच ते तब्बल नऊ वर्षे कंधारला राहिले.

स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. शरयू क्षीरसागर यांना डॉ. रणदिवे पती-पत्नीसारख्या सज्जनांचा सहवास चंद्र व चंदनापेक्षाही शीतल वाटतो. डॉ. रणदिवेंनी सरकारी दवाखान्याला शिस्त लावून दिली होती, हे त्यांना पहावयास मिळाले. ‘या दोन्ही कुटुंबांच्या जुळून आल्या गाठी ते आजपर्यंत’ हे. डॉ. शरयू यांचे विचार त्यांचे पती डॉ. व्यंकट क्षीरसागर यांच्या लेखावरूनही पटतात.

माध्यामिक शिक्षक असलेले मा. सूर्यकांत चालीकवार आणि डॉक्टरसाहेब हे दोघेही लोह्याला रहात होते. त्यांची त्याकाळी जमलेली मैत्री आजही अव्याहतपणे सुरू आहे. याचे नवल वाटते. डॉक्टरांच्या सुविद्य, सुशील पत्नी सौ. चंदाताईंना तर त्यांनी बहिणच मानले असून दरवर्षी न चुकता ते भाऊबीज व राखीपौर्णिमा साजरे करतात. ‘माझे डॉक्टरमामा शिक्षणाचे प्रेरणास्थान’ – मधून अशोक तनपुरे यांची व्यक्त झालेली कृतज्ञतेची भावना लाजवाब !

श्री. चंद्रकांत बार्शीकर पुजारी हे डॉक्टरसाहेबांमधले अनेक गुण हेरून ‘एक तेजोमय प्रकाशसूर्य’ अशी उपमा देतात.

या सर्व लेखक-लेखिका, कवयित्री यांचे मनःपूर्वक आभार. प्रकाशक महाजन पब्लिशिंग हाऊस (पुणे), मुखपृष्ठ रचना टाईपसेटर्स (पुणे), चित्रकार अनिल रामभाऊ पवार बार्शी, मुद्रक एस. प्रिंटर्स, या सर्वांची मी ऋणी आहे. डॉक्टरसाहेब आणि त्यांच्या कुटुंबियांनी माझ्यावर पूर्ण विश्वास टाकला म्हणून मी त्यांच्याशी कृतज्ञ राहण्यातच धन्यता मानते.

डॉक्टरसाहेब व सौ. चंदाताई रणदिवे यांच्याविषयी मी तर असं म्हणेन. “जीवनात ही जोडी अशीच राहू दे” डॉ. अक्षरा हिने तिच्या लेखात म्हटले – तिचे दादा म्हणजे स्वर्गीय प्राचार्य शांताराम शिंदे डॉक्टरसाहेबांना एकदा साडू या नात्याने म्हणाले होते.

“अहो, डॉक्टरसाहेब, तीर्थरूप रामभाऊंनी म्हणजे आमच्या सासऱ्यांनी सर्वांत मौल्यवान रत्न तुमच्याच पदरात टाकलंय आणि मग उरलीसुरली आम्हांला वाटलीत….” यातला गमतीचा भाग सोडला तरी डॉक्टरांच्या अर्धांगिनी सौ. चंदा या खरोखरच त्यांच्यासाठी मौल्यवान रत्नच आहेत, यात शंका नाही.

असं म्हणतात

“दिवस सरतात तशा आठवणी दाटून येतात खूप प्रेमळ माणसे हृदयात घर करून राहतात.’

त्याप्रमाणेच या उभयता पती-पत्नीने खरोखरच अनेकांच्या हृदयात घर केलेले आहे, हे शंभर टक्के सत्य आहे. डॉक्टर पती-पत्नीचा प्रेमळ माणुसकीचा वारसा त्यांच्या प्रत्येक अपत्यात

तंतोतंत उतरला आहे. त्यांच्या तीनही मुली आम्ही कोणीही नातेवाईक

त्यांच्या घरी गेल्यानंतर अत्यंत प्रेमाने वागतात, उत्कृष्ट पाहुणचार करतात. डॉक्टरसाहेबांचा मुलगा स्वप्नील हा दरवर्षी गुरुपौर्णिमेला मला न विसरता फोन करतो. कारण मी त्याला तो १०वीत असताना कंधारला येऊन मराठी आणि संस्कृत शिकवलं होतं. तेव्हा मी खास पंधरा दिवसांची रजा टाकून कंधारला आले होते. ती जाणीव त्याने आजही ठेवली आहे. मला खूप अप्रूप वाटते. त्यावेळी तो मराठी विषयात कंधारमध्ये सर्वप्रथम आला होता. मराठी व संस्कृतमध्ये उत्तम मार्क्स घेऊन त्याने मला चांगलीच गुरुदक्षिणा दिली होती.

अगदी अलीकडची, काल-परवाची गोष्ट. मी, स्वप्नील, माझी बहीण चंदा आणि डॉक्टरसाहेब आम्ही सर्वजण लोह्याच्या पोलीसवाडीला होतो. तेथे उंच डोंगरावर निवास करीत असलेल्या रेणुकामातेच्या दर्शनासाठी गेलो होतो. संध्याकाळची सहा-साडेसहाची निवांत वेळ होती. तेथे एक ऐंशी वर्षांचे वृद्ध गृहस्थ आले होते. त्यांच्या अंगावर जाडे-भरडे कपडे. तो वृद्ध त्याची व्यथा सांगत होता. त्याचं वय ऐंशी वर्षांचं होतं. त्याचा मुलगा व सून त्याला सांभाळत नव्हते. या वयातही त्याला खूप कष्ट करावे लागत होते.

सध्या त्याची खूप दाढ दुखत होती. तेवढ्यात स्वप्नीलचे लक्ष त्याच्या अनवाणी पायांकडे गेले. पायांवर खूप जखमा होत्या. त्याला डायबेटीस असावा. लगेच स्वप्नील त्या वृद्धाला म्हणाला, “बाबा, तुम्ही कंधारला आमच्या रणदिवे हॉस्पीटलला या. मी तुमच्यावर मोफत उपचार करतो.” डॉक्टर रणदिवेसाहेबही त्याला म्हणाले, “हे माझं कार्ड घ्या. कंधारला कोणालातरी बरोबर घेऊन या. तुमची दुखरी दाढ काढतो. तुमच्याकडून काहीही पैसे घेणार नाही.”

त्यावेळी त्या वृद्धाच्या चेहऱ्यावर जे समाधान दिसले, ते समाधान हीच त्या पितापुत्र डॉक्टरांची खरी संपत्ती खरी दौलत ! मी हा प्रसंग पाहून अक्षरश: दीपून गेले. म्हणजे डॉक्टरांचा मुलगा स्वप्नीलही आज डॉक्टरांचाच माणुसकीचा, उदारतेचा, आपुलकीचा, जिव्हाळ्याचा तोच वारसा चालवत आहे. त्यालाही

त्याच्या रुग्णसेवेत उदंड यश लाभो ! डॉ. रणदिवे कुटुंबियांच्या यापुढील आयुष्याच्या वाटेवर….

” आनंदाचा मेघ बरसू यशो शिखरांची दीपमाळ लागू दे परमेश्वरी कृपेचा आशीर्वाद नित्य लाभू दे !!

हीच ईश्वरचरणी प्रार्थना !

प्राचार्या आशा शिंदे

पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *