भारत देश जगातील प्राचीन देशांपैकी एक आहे. जगात ज्या काही प्राचीन संस्कृती अस्तित्वात आहे त्यापैकी एक भारतीय संस्कृती. अदिम जूनीपुराणी संस्कृती येथे नांदत आहे. येथे निसर्गाची पूजा केली जाते. येथे दगडांची पूजा केली जाते. येथे निसर्ग ही पुजला जातो. वृक्ष वल्लीला नातलग सोयरे समजले जाते. येथे धरणीला मातेचा दर्जा देवून पूजा केली जाते. भारत हा उत्सव प्रिय देश आहे. येथे अनेक सणवार धुमधडाक्यात साजरे केले जातात. येथे सणवारांचा दुष्काळ नाही. गरीब असो की श्रीमंत सर्वच आपआपल्या परिने आपआपल्या कुवतीनुसार सण साजरे करतात.
अनेक उत्सवांपैकी एक उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा. पौर्णिमा तर वर्षातून बारा तेरा वेळा तरी येत असेल पण आषाढी पौर्णिमेला भारतीय समाजात विशेष महत्व आहे. रुढी परंपरेनुसार हा सण साजरा केला जातो. हा उत्सव सण का साजरा केला जातो? कशासाठी सजारा केला जातो? या विषयी सामन्य नागरिकांना फारशी माहिती असेल असे वाटत नाही. या दिवशी गुरुला का मान दिले जाते. गुरुचे चरण का पुजले जाते या विषयी फारशी चर्चाही सामान्य नागरिकांत होताना दिसत नाही.
भारतीय परंपरेनुसार या दिवशी महर्षी व्यास मुनींचा जन्म झाला असे मानले जाते. याच ऋषीने पुढे हिंदू धर्मासाठी अनेक ग्रंथ लिहीले. मानसशास्त्र, समाजशास्त्र, पुराणे, वेद व राजकारण या विषयी भरपूर लिखान केलेले आहे. त्याकाळी यांनी समाजाला दिशा दाखवली. जीवनात दिशा दाखविण्याचे कार्य गुरु करतो, ते कार्य महर्षी व्यास यांनी केले म्हणून किंवा त्यांचा जन्म दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. बौद्ध धर्मातही आषाढी पौर्णिमा ही बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. याच दिवशी महात्मा गौतम बुद्धांनी आपले पहिले प्रवचन आपल्या शिष्याला दिले. समाज प्रबोधनाला सुरुवात केली. हा दिवस अखिल मानव जातीचा कल्याणांचा दिवस म्हणुन हा दिवस गुरु पौर्णिमा म्हणून साजरा केला जाते. याला बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी करतो याला आपण आषाढी पौर्णिमा असेही म्हणतो.
ज्याचे शिष्य श्रेष्ठ ते गुरुही श्रेष्ठ. शिष्य जेवढा श्रेष्ठ तेवढे त्या गुरुंची चर्चा नेहमीसाठी होताना दिसते. आपल्या देशात काही गुरु शिष्यांची जोड्या पाहा विश्वामित्र, वशिष्ठ-राम लक्ष्मण, सांदिपाणी-कृष्ण, जनार्धन स्वामी-एकनाथ महाराज, निवृतीनाथ-ज्ञानेश्वर माऊली, परशुराम-कर्ण, द्रोणाचार्च-अर्जुन असे कितेक जोड्या गुरुशिष्यांच्या आपणास सांगता येतील. या शिष्यांने गुरूंनी दाखविलेल्या मार्गाने कसे चालले व गुरूंचा मान कसा वाढवला. त्यांचा गुरुप्रति कशी अपार श्रद्धा त्यांच्या ठायी होती हे ही आपण पहातो.
गुरु म्हणजे कोण जो शिष्यांच्या जीवनातील अज्ञानमय अंधकार दुर करून शिष्यांच्या जीवनात ज्ञानाचा दिप लावतो तो गुरु. चिखलाच्या गोळ्याला आकार देतो तो गुरु. शिष्याप्रति प्रेम ठेवणारा ज्ञानातील सर्वच धडे शिकवणारा तो गुरु. शिष्याची प्रगती म्हणजे स्वतःची किर्ती व यश माननारा तो गुरु. विद्यार्थांचा जीवनातील अंधकार घालवून प्रकाशमय जीवन देणारा तो गुरु. अंधारात चाचपडणाऱ्या शिष्याला जीवनाचा सोपा सरळ धोपट मार्ग दाखविणारा तो गुरु. अवघडाकडून सोप्या मार्गाकडे नेणारा म्हणजे गुरु. गुरु शिष्यांच कायम नातं जपणारे व संकटकाळी शिष्याला योग्य दिशादर्शन करणारे हे खरे गुरु. गुरु शिष्यांच्या नात्यात मी पणा नसतो. अहंमभाव नसतो. एखादी शिष्य अहंमभाव जोपासत असेल तर ते दुर करणे हे गुरुचे कार्य. आपला शिष्य चारीत्र्यवान, निर्मळ, शुद्ध, बुद्धीमान, शूर व कृतत्ववान कसा बनेल. तो आदर्श कसा बनेल याकडेच गुरुचे लक्ष लागलेले असते. कुटुंब, समाज व देश यासाठी तो कसं उपयोगी येईल यासाठी गुरु झटत असतो व सतत मार्गदर्शन करत असतो.
गुरु पौर्णिमा म्हणजे आज गुरु पदांचे पूजन. गुरु चरणांची पुजा करून गुरुचे स्मरण करणे. आपल्या जीवनात पहिली गुरु आपली आई त्यानंतर आपले बाबा. आईबाबां नंतर आपले गुरुजी. आई वडीलांनतर आपल्या गुरुला आपण मान देतोत. गुरुला तर हिंदू धर्मात देवास्थांनी मानले जाते. गुरु मुळेच ईश्वर प्राप्ती होते असे समजले जाते. म्हणून गुरु श्रेष्ठ का?
गुरु चरणांची, गुरु पदांची पुजा केली म्हणजे गुरुचे कार्य आपण पूर्ण करतो का? ही श्रद्धा की अंधश्रद्धा? केवळ पूजन केल्याणे त्यांची स्मृती जपल्याने शिष्यांचे काम संपले का? एक विशिष्ठ दिवशी गुरुची आठवण ठेवली म्हणजे गुरु महान होईल का? आपण सर्वांनी जेव्हा गुरुची शिकवण प्रत्यक्षात आचरणात आनु. त्यांनी दाखविलेल्या मार्गाने आपण मार्गक्रमण करू. किती ही संकटं आली तरी न डगमगता त्यांची शिकवण न विसरता आमलात आनु तेव्हा हे खरे गुरुप्रति प्रेमभाव श्रद्धा आपणास सिद्ध करता येईल. गुरुजी कधीच विद्यार्थ्यांना ओठांत एक, पोटात दुसरे व कृतीत तिसरे असे कधीच शिकवत नाहीत. मग आपण विद्यार्थी ही गुरुप्रती श्रद्धा जपत त्यांनी दाखविलेल्या अचूक सत्य मार्गाने चालू या.
आपल्या जीवनात केवळ एकच गुरु नसतो. आपल्या जीवनात आपले आईवडील, भाऊबहीण नातेवाईक, शेजारी व मित्र यांच्या कडूनही आपण पावलोपावली काही तरी शिकत असतो. आपल्या ज्ञानात भर पडत असते या आफाट पसरलेल्या जगात कोणाकडून तरी काही तरी आपण शिकत रहातो व शिकत आहोत.
म्हणुन आपल्या ज्ञात अज्ञात सर्व गुरुजनांस आदरपूर्वक नमन करू या. आठवूया गुरु. चालू या सत्याच्या मार्गाने. लावू या ज्ञान ज्योती. घडवू या सुजान समाज.
राठोड मोतीराम रुपसिंग
” गोमती सावली ” काळेश्वरनगर , विष्णुपूरी, नांदेड – ६
९९२२६५२४०७ .