नांदेड (प्रतिनिधी)- प्रत्येक नागरिकाला हक्काचे घर असावे ही भूमिका शासनाची असून जिल्ह्यात अधिकाधिक घरकुले मंजूर करुन घेण्यात आली आहेत. याचाच एक भाग म्हणून घरकूल बांधकामासाठी भोकर व बिलोली या दोन शहरास 2.63 कोटी रुपये शासनाने नुकतेच मंजूर केले आहेत. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचा या संदर्भात सातत्यपूर्ण पाठपुरावा होता.
नांदेड शहरासह जिल्ह्यातील अनेक नगरपालिकांमध्ये घरकूल योजनेंतर्गत मोठया प्रमाणात घरांची बांधकामे सुरु आहेत. कोविडच्या काळात या घरकुलांचे अनुदान काही प्रमाणात शासनाकडे थकीत होते. ही बाब पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी तातडीचे पावले उचलत म्हाडा या संस्थेकडे त्याचा पाठपुरावा केला. त्यामुळे बिलोलीसाठी 1.43 कोटी तर भोकरसाठी 1.20 कोटी इतका निधी शासनाने मंजूर केला आहे.
या मंजूर झालेल्या निधीतून बिलोली शहरात 735 तर भोकरमध्ये 448 घरकुलांचे काम पूर्ण होणार आहे. हा उर्वरित निधी मिळावा यासाठी घरकूल लाभार्थ्यांची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. त्यांची ही मागणी लक्षात घेवून पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी शासनाकडून हा निधी उपलब्ध करुन घेतला आहे. त्याबद्दल दोन्ही शहरातील लाभार्थ्यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे आभार मानले आहेत.