पावसामुळे झालेल्या रस्ते व पुलांच्या हानीची पाहणी करण्याचे मंत्री अशोक चव्हाण यांचे निर्देश

प्राथमिक अंदाजानुसार 290 रस्ते बंद, 469 रस्त्यांवरची वाहतूक खंडित तर 140 पूल पाण्याखाली

मुंबई, दि. 26 : राज्यातील कोकण व पुणे विभागात पडलेल्या अतिवृष्टीमुळे रस्ते व पुलांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्यांना दौरा करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत. नुकसानीचा आढावा घेऊन तातडीने अहवाल देण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.


राज्यात गेल्या काही दिवसात पुणे तसेच कोकण विभागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या अतिवृष्टीमुळे या भागातील अनेक रस्ते व पुल नुकसानग्रस्त झाले आहेत. या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्य अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्रभावित जिल्ह्यांचा दौरा करण्याच्या सूचना मंत्री श्री. चव्हाण यांनी दिले आहेत. त्यानुसार, सातारा व पुणे जिल्ह्यात पुण्याचे मुख्य अभियंता श्री. साळुंखे, सांगली जिल्ह्यात औरंगाबादचे मुख्य अभियंता श्री. उकिर्डे, कोल्हापूरमध्ये मुंबईचे मुख्य अभियंता के.टी. पाटील, सिंधुदुर्ग व रत्नागिरीमध्ये कोकण विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश इंगोले, पालघर व ठाणेमध्ये नाशिकचे मुख्य अभियंता पी.बी. भोसले आणि रायगडमध्ये सहसचिव श्री. रामगुडे हे भेट देणार आहेत. या अधिकाऱ्यांनी शासनास दररोज अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे.
राज्यातील अतिवृष्टीमुळे प्राथमिक अंदाजानुसार, 290 रस्ते बंद पडले आहेत. तर 469 रस्त्यांवरची वाहतूक खंडित झाली आहे. 140 पूल व मोऱ्या हे पाण्याखाली गेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *