वारसा संघर्षाचा व वसा लोकसेवेचा असलेले नेतृत्व – मा.सौ. पंकजाताई मुंडे


(आज २६ जुलै २०२१ रोजी मा.सौ. पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस.त्या नीमीत्य त्यांच्या कार्याचा हा संक्षिप्त परिचय)


समाजाचा विकास हा अनेक मार्गांनी होतो. प्रत्येक जण आपापल्या परीने समाज विकासासाठी हातभार लावत असतो.परंतु लोकशाहीत समाज विकासाचे सर्वश्रेष्ठ साधन हे राजकीय सत्ता आहे. तसे अधिकार संविधानाने त्यांना प्राप्त करून दिले आहेत. त्यामुळे दृष्टे राजकारणी ज्या भागाला लाभले त्या भागाचा सर्वांगीण विकास झाल्याचे आपण पाहतो. पश्चिम महाराष्ट्राचा यासाठी उल्लेख करावा लागतो.कधी कधी राजकारणी दृष्टा असतो पण त्याला विकासा साठी सत्तेची चावीच हाती येत नाही.त्यामुळे इच्छा असूनही त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे विकास साधता येत नाही. त्याच्या वाट्याला सत्तेपेक्षा संघर्षच अधिक येतो. तरीही तो सत्तेपेक्षा लोकसवेला सर्वाधिक महत्त्व देऊन काम करत राहतो. संघर्ष आणि लोक सेवेच्या माध्यमातून त्याचे नेतृत्व निखरत जाते.भलेही सत्ता नसल्यामुळे स्वार्थापोटी अवतीभोवती घुटमळणा-या लोकांची संख्या कमी होत असली तरी असे नेतृत्व आपला स्वाभिमानी बाणा सोडत नाही असा संघर्ष राजकारणात सर्वाधिक वाट्याला आला ते नेतृत्व म्हणजे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब होत. तसाच कमी अधिक प्रमाणात संघर्ष त्यांच्या जेष्ठ कन्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण माजी मंत्री मा. पंकजाताई मुंडे यांच्या वाट्याला येत असल्याचे सध्या तरी दिसते आहे. असे असले तरी वडीलांप्रमाणे सर्वसामान्य लोकांचे प्रेम मात्र कमी होताना दिसत नाही.त्यामुळे ताई ही लोकसेवा करण्याचे आपले व्रत सोडताना दिसत नाहीत.


त्यांचा लोकसेवेचा मागील एक वर्षाचा आढावा जरी आपण घेतला तरी लक्षात येते कि आमदारकीची असो की मंत्रीपदाची असो सत्ता नसतानाही त्या सतत लोकसेवा करत आहेत. मागील वर्षी मराठवाडा व अन्य भागात ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले. अशा शेतकऱ्यांच्या भेटीला त्या दौऱ्याच्या माध्यमातून गेल्याचे आपण पाहिले. प्रसंगी बैलगाडीतून ही त्यांनी प्रवास केला व शेतकऱ्यांचे अश्रु पुसण्याचा प्रयत्न केला. राज्यातील ऊसतोड कामगारांचे कोयता बंद आंदोलन हाताळण्यासाठी केलेले प्रयत्न, दिवाळीनिमित्त बालगृहाला भेट देऊन त्या बालकांना सर्वार्थाने दिलेला आधार,गणेश मिसाळ हा ऊस तोड कामगार अपघातात जखमी झाला असता त्याची भेट घेऊन त्याला आर्थिक मदत व त्याच्या पाल्याच्या संगोपनासाठी घेतलेली जबाबदारी, स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या जयंती व पुण्यतिथीला आयोजित रक्तदान व फिटनेस शिबिराचे आयोजन, स्नेहसंबंध असलेल्या कार्यकर्त्यांच्या दुःखद निधनानंतर किंवा त्यांच्या परिवारातील सदस्यांच्या निधनानंतर अस्या कोरोनाच्या काळातही त्यांच्या घरी सांत्वनपर दिल्या गेलेल्या भेटी. त्यात ही आपला अंगरक्षक गोविंद मुंडे यांच्या जाण्याने त्यांचे भावुक होणे व त्यांच्या परिवाराची संगोपन करण्याची जबाबदारी स्विकारणे, कोरोनामुळे ज्या घरातील व्यक्ती मरण पावल्या त्या घरी तीन दिवस मोफत जेवणाच्या डब्याच्या माध्यमातून सेवा पुरविणे. कोरोना काळात परळी, शिरूर कासार व अन्य ठिकाणी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयसोलेशन सेंटरची उभारणी करून सेवायज्ञ आरंभीने, कोरोना महामारीत काम करणाऱ्या कोरोना योध्दाचा सन्मान करने, २६ जून २०२१ रोजी इतर मागासवर्गीय वर्गाला राजकीय आरक्षण पुन्हा मिळाले पाहिजे तोपर्यंत महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही अशी भूमिका घेत चक्काजाम मध्ये सहभाग घेणे तसेच ओबीसींच्या विविध मेळाव्यात सतत सक्रिय सहभाग घेणे, मतदार संघात जनता दरबाराचे आयोजन करून समस्या जाणून घेऊन सोडविण्याचा प्रयत्न करणे, महाराष्ट्रात कुठेही वंचितांच्या वर अन्याय झाल्यास त्याला वाचा फोडणे व त्याला न्याय मिळून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे या व यासारख्या कितीतरी लोकसेवेच्या कामांची दाखले आपणास मागील एक वर्षातील पाहता येतील.सत्ता असल्यास लोकसेवा करावी किंवा निवडणुकीच्या तोंडावर ती करावी असे चित्र ताईच्या बाबतीत दिसत नाही. त्या सतत लोकसेवा करताना दिसतात हा लोक सेवेचा वसा त्यांना त्यांचे वडील गोपीनाथरावजी मुंडे व मामा प्रमोदजी महाजन यांच्याकडून नेहमीच मिळाला आहे आणि तोच वसा त्या अत्यंत प्रामाणिक पणे पुढे चालताना दिसत आहेत.लोकसेवा हे चिरंतन टिकणारे काम आहे. यामुळे अनेक लोक आपल्याशी कायमचे जोडले जातात. सामान्य लोक इतके प्रामाणिक असतात की अशा नेत्याला ते देव्हाऱ्यात ही जागा देतात हे चित्र गोपीनाथरावजी यांच्या संबंधाने ताईने अनुभवले आहे.परंतु कधी कधी असी प्रामाणिक पणे केलेली लोकसेवा अनेकांना खूपत असते. हे इतिहासात सर्वच क्षेत्रात वेळोवेळी होताना आपण पाहिले आहे मग अशा नेतृत्वाला बदनाम करने, त्याला माध्यमांच्या व इतर साधनांच्या माध्यमातून जातीपुरते व अन्य विचारांपुरते संकुचित असल्याचे दाखविणे असे कटकारस्थाने रचली जातात. असे नेतृत्व हे सत्तेपासून अधिकाधिक दूर कसे राहील यासाठी स्वकीय आणि परकीय व्यक्ती काम करताना दिसतात कारण त्यांच्या मनात असे जनाधार लाभलेले नेतृत्व भविष्यात मोठे होण्याची भीती असते.तसेच पंकजाताईंच्या बाबतीत ही होते आहे की काय ?असा प्रश्र्न उपस्थित करण्यासारखी स्थिती मागील काही वर्षांपासून पहावयास मिळते आहे. या बध्दल जनतेकडून जे प्रश्न नेहमी चर्चीले जातात ते हे की सत्तेत असताना त्यांनी ज्या खात्याला देशभर नावलौकिक प्राप्त करून दिला होता ते जलसंधारण खाते अचानक त्यांच्या कडून काढून घेणे, परळीतून त्यांचा पराभव व्हावा म्हणुन प्रयत्न करने, विधानसभा पराभवानंतर विधान परिषदेसाठी अर्ज भरायला सांगून अचानक पणे संधी नाकारणे, राज्याच्या राजकारणात सर्वाधिक जनाधार असलेल्या नेत्या म्हणून माहिती असताना राज्याच्या महत्त्वाच्या पक्षपदावरती संधी न देता केंद्रात पाठविणे. राज्यसभेच्या निवडणुकीत किंवा पदवीधर मतदारसंघात उमेदवार निवडीत पूर्णार्थाने त्यांना विश्वासात न घेणे,उस तोड कामगारांच्या प्रश्नाबाबत त्यांना अंधारात ठेवून पर्यायी नेतृत्वाला पुढे करण्याचा प्रयत्न करणे किंवा परवाच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात त्यांच्या भगिनींना मंत्रीपदाची हुलकावणी देणे. या सर्व चर्चेत पुर्ण असत्य ही नाही. या सर्व घटनेंसाठी पुर्णपणे पक्षाला जबाबदार धरने योग्य होणार नाही. यातील काहीजण असी कामे करत असावीत.हे लोक कोण आहेत.त्यांना अनुयायांनी लक्षात ठेवले पाहिजे.असे ताईंही म्हणाल्या आहेत.यातून पक्षाचे भले होत आहे की नाही याचा गांभीर्यपूर्वक विचार मला वाटते अशा व्यक्तींनी करणे गरजेचे आहे.असा जनाधार असणारा नेता जर पक्षा पासून दुरावत राहिला तर त्याचे निश्चितच दुष्परिणाम पक्षाला भोगावे लागतात. नेतृत्वानेही पक्षासी आपली कित्येक वर्षांपासून असलेली नाळ तुटणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे कारण आपल्या जडणघडणीत पक्षाचे ही खूप मोठे योगदान असते हे नेतृत्वाने ही विसरता कामा नये. अन्यथा एकट्याच्या बळावर अस्या प्रवृत्तीं विरुद्ध संघर्ष करने कठीण असते.स्वतच्या बळावर उभे राहणे तसे महाकठीण व वेळखाऊ ठरते. त्यामुळे दोघांनी ही एक दुसऱ्यांना समजून घेऊन जर मार्गक्रमण केले तर त्यात दोघांचेही हित सामावलेले असते. आणि त्यांच्यातील सामंजस्याचा फायदा नेतृत्वावर आणि पक्षावर प्रेम करणाऱ्या अनुयायांसाठी महत्त्वाचा ठरतो.तसे तर ‘ यह पब्लिक है सब जानती हैl’हे तर सूरुच असते. अहंकाराला मूठमाती देऊन दोन्ही बाजूने काम होत राहिल्यास प्रश्नाची उकल होणे सोपे होते.


अनुयायांच्या मनात वरील प्रश्न सतत येत असतात आणि त्यामुळे अनुयायी अनेक वेळा माध्यमांमधून आक्रमकपणे व्यक्त होताना दिसतात. अनुयायांनी देखील आपला राग सौम्य भाषेत व तितक्याच संयमाने व्यक्त करणे हे नेतृत्वा साठी ही महत्त्वाचे असते. अयोग्य भाषा व अनाठाई क्रोध आपल्या नेतृत्वासमोर अनेक प्रश्न उपस्थित करत असतो आणि त्यामुळे नेतृत्वाला लोकसेवे पेक्षा अशाच गोष्टींना जास्त तोंड द्यावे लागते.संघर्षशील नेतृत्वाला हे माहिती असते की ‘ सत्य परेशान हो सकता है l लेकिन पराजित नही’म्हणून ते नेतृत्व सतत लोकसेवा करत असते.अशा नेतृत्वाचा खरा आधार सामान्य जनतेचे प्रेम हाच असतो. ते कमी होता कामा नये याला अशा नेतृत्वाने सर्वाधिक जपले पाहिजे.कारण त्याची सर्वात मोठी जमेची बाजू ही या सर्वसामान्य लोकांचे निस्वार्थ प्रेम हीच असते. त्यासाठी ताई कसोशीने प्रयत्न करताना दिसताहेत. त्यांनी आपल्याला मिळालेल्या सत्तेचा वापर वंचितांचा विकासासाठी केलेला आपण पाहिला आहे. पण त्यांचा सर्वाधिक वेळ आज तरी काही लोक जे त्यांच्या मार्गात खिंडी उभ्या करताहेत त्या पार करण्यातच जातो आहे की काय? असे दिसते आहे. हे चित्र सामान्य जनता अनेक वेळा मुक होऊन पाहत असते कारण तिच्या हातात निवडणुकी शिवाय दुसरे शस्त्र नसते. जेंव्हा निवडणुका येतात तेंव्हा ते आपल्या मनातल्या भावना मतदानाच्या माध्यमातून व्यक्त करताना दिसतात. खरेतर चांगुलपणाने काम करणाऱ्या नेतृत्वाला बळ दिल्याने बळ देणाऱ्याचे ही बळ वाढते व समाजाचा विकास घडतो पण असे सरळ सरळ घडले तर मग ते कसले राजकारण? राजकारणात असे डावपेच खेळले जातात आणि यातून त्या नेतृत्वाचे व जनतेचे नुकसान होते.एक कसदार नेता निर्माण होण्यासाठी कित्येक वर्षे जातात तेंव्हा कुठे असा नेता निर्माण होत असतो.त्याला घडविण्यात, वाढविण्यात त्याच्या कर्तुत्वा इतकेच जनतेचे,पक्षाचे सहकार्य लाभलेले असते.अस्या नेतृत्वाकडून अधिक लोकसेवा करून घेण्याऐवजी त्याला जर अशा चकवाचकवीच्या राजकारणात अडकवुन ठेवले तर समाजाच्या विकासाला खीळ बसते.हे नेतृत्व ज्या समाजातून येते व जी दृष्टी घेऊन पुढे जाते त्या समाजाचे सर्वाधिक नुकसान होते. त्याच्या जातीवरती नेतृत्वाचे नैसर्गिक दृष्ट्या थोडेसे प्रेम असले तरी ही नेतृत्वाला विशिष्ट जातीपुरते बांधुन ठेवणे त्या नेतृत्वावर अन्याय केल्यासारखे असते. त्याने समाजाच्या विकासाचा वसा घेतलेला असतो. तो त्या नेतृत्वाचा समाज असतो.तो न ब्राह्मण,न मराठा,न वंजारी असतो तो वंचित समाजाचा नायक असतो. पण बऱ्याच वेळा लोकाभिमुख सर्व समाजासाठी प्रिय व्यक्तीला विशिष्ट समाजापुरते संकुचित करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जातो असे चित्र पंकजाताई बाबतीतही निर्माण केले जाते आहे.ताई या सर्व समाजाच्या आहेत. कारण त्या सर्व समाजाच्या प्रश्‍नांसाठी हीरीरीने लढताना दिसतात. त्यात ही त्यांची अधिकची जवळीक वंचित समाजासी आहे.हे खरे चित्र समाजासमोर आणण्याचा प्रयत्न त्यांचे अनुयायी या नात्याने आपण केला पाहिजे. ताईंनीही एखाद्या घटनेने लगेच व्यक्त न होता काही काळ जाऊ देवुन थांबा,पहा व चालत राहा हे सूत्र काही काळ तरी स्विकारले पाहिजे. नाही तर त्यांच्यावर जे ताई नेहमी नाराज असतात,ते बंडाची भाषा करतात, त्यांचे अनुयायी हे फारच आक्रमकपणे व्यक्त होतात असा जो प्रचार ऐकायला मिळतोय त्याला चाप बसेल. ताई व्यक्त नाही झाल्या तरी त्यांचे दुःख,वेदना सर्व समाज वेळोवेळी जाणतो. शेवटी ताईंना संघर्ष हा वडिलांपासून वारसा रूपाने प्राप्त झालेला आहे. तसाच लोकसेवेचा वसाही प्राप्त झाला आहे. मुंडे परिवाराला यावर मात करून पुढे जाण्याचा चांगला अनुभव आहे.पण यासाठी त्यांच्या अनुयायांनी कुठलाही स्वार्थ डोळ्यासमोर न ठेवता अस्या काळात तरी विशेषत्वाने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. काही वैयक्तिक कामे न केल्याची कारणे किंवा पक्षीय दृष्टीकोन या गोष्टी बाजूला ठेवून वंचितांच्या सेवेसाठी सदैव प्रामाणिकपणे प्रयत्न करणा-या या युवा नेतृत्वाला आपण सर्वतोपरी सहकार्य केले पाहिजे. बुद्धिभेद करून जर अनुयायीच एकमेकांत भांडत बसले तर नुकसान नेतृत्वाचे तर होतेच पण त्यापेक्षा अधिक नुकसान अनुयायांचे होते. हे लक्षात असले पाहिजे. त्यासाठी आपण ताईंना त्यांच्या स्वकीयांसी व परकियांसी चाललेल्या संघर्षात साथ देण्याचे व लोकसेवेचा वसा अधिकपणे चालविण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने अभिवचन देऊयात व त्यांना जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देऊयात. ईश्वर त्यांचे आयु आरोग्य अबाधित ठेवो. अशी ईश्वरचरणी प्रार्थना करूयात.

            प्रा.डॉ. रामकृष्ण बदने
   ग्रामीण महाविद्यालय, वसंतनगर ,
           ता.मुखेड जि.नांदेड
        भ्रमणध्वनी-९४२३४३७२१५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *