नांदेड- येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळ महाराष्ट्र शाखा भोकरच्या वतीने तालुक्यातील मातुळ येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त स्तंभलेखक ना. सा. येवतीकर यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते
सप्तरंगी मंडळाची ही ४३ वी काव्य पौर्णिमा असून त्यात अनुरत्न वाघमारे, नागोराव डोंगरे, गंगाधर ढवळे, कैलास धुतराज, एकनाथ कदम, एल. पी. वारघडे, दत्ताहरी कदम यांनी सहभाग घेतला.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्राम पंचायत सदस्य तुकाराम डांगे यांनी केले. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन अरविंद कदम यांनी केले तर काव्यपौर्णिमेचे संवादसूत्र अनुरत्न वाघमारे आणि कैलास धुतराज यांनी हाती घेतले तर आभार सरपंच प्रतिनिधी प्रकाश कदम यांनी मानले.
दरम्यान या कार्यक्रमात सप्तरंगी साहित्य मंडळाच्या तालुकाध्यक्षपदी तालुक्यातील मातुळ येथील नवोदित कवी दत्ताहरी कदम यांची तर कोषाध्यक्षपदी अरविंद कदम यांची निवड करण्यात आली. मंडळाचे राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे यांनी ही घोषणा केली असून यावेळी नांदेड जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगांवकर, मंडळाचे उपाध्यक्ष नागोराव डोंगरे, कोषाध्यक्ष गंगाधर ढवळे, सहसचिव कैलास धुतराज, नागोराव येवतीकर, सरपंच सविताताई कदम, उपसरपंच माधव बोईनवाड, पोलिस पाटील लक्ष्मण बोईनवाड, मुख्याध्यापक मारोती छपरे, पत्रकार बालाजी कदम आदींची उपस्थिती होती.
गुरुपौर्णिमेनिमित्त मातुळात गावकऱ्यांच्या प्रतिसादात रंगलेल्या कविसंमेलनात निमंत्रित कवींकडून गुरुचरणी काव्यपुष्पांजली वाहण्यात आली. कविसंमेलनानंतर लगेचच ओमप्रकाश कदम यांच्या पुढाकाराने उपस्थितांना महाप्रसाद देण्यात आला.
दरम्यान, राज्यातील रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, पुणे, ठाणे आणि मुंबई या भागांना पावसाचा जोरदार तडाखा बसला. अनेक भागांत पूरस्थिती उद्भवल्याने तसेच दरडी कोसळण्याच्या घटना घडल्याने किमान १३७ जणांचा बळी गेला आहे तर ७३ जण बेपत्ता असून ५० जण जखमी झाले. महापुरात बळी गेलेल्या मृतांना उपस्थितांकडून दोन मिनिटे स्तब्ध होऊन श्रद्धांजली वाहण्यात आली.
त्यानंतर काव्य पौर्णिमेत सहभागी कवींनी आपल्या बहारदार रचना सादर करीत कविसंमेलनात रंगत आणली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ओमप्रकाश कदम, शंकर कदम, रमेश पांचाळ, भारत शिंदे, किशन भिमेवाड, पंडित कदम, दिगांबर कदम, ऋषिकेश कदम, साईराम कदरवाड, बालाजी तोपलवाड, अशोक इलतेपोड, उदय खिल्लारे, साईनाथ सायबलू, क्रांती बुद्धेवार, सम्यक चौदंते, तानाजी कदम आदींनी परिश्रम घेतले.