कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेवून जिल्ह्यातील सर्व सुपर स्प्रेडर व्यक्तींच्या होणार चाचण्या – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर


जिल्ह्यात दररोज किमान 5 हजार 700 चाचण्याचे उद्दिष्ट

नांदेड :- कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका दृष्टीपथात ठेवून नागरिकांनी अधिकाधिक दक्षता घेणे अत्यावश्यक आहे. कोरोनाचा धोका अजून तसूभरही कमी झालेला नाही. सुपर स्प्रेडर ठरणाऱ्या विविध शासकीय कार्यालयासह सेवा क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तींची कोरोना चाचणी करण्याची महत्वपूर्ण मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा व संभाव्य तिसरी लाट लक्षात घेवून करावयाच्या उपाययोजनाच्या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक संपन्न झाली.

या बैठकीस मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. जमदाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंघ बिसेन व आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नागरिकांनी कोरोना संदर्भात वेळोवेळी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. ज्या शासकीय कार्यालयाचा आणि सेवावर्गात मोडणाऱ्या ज्या व्यावसायिकांचा अधिकाधिक विविध लोकांशी दररोज संपर्क येतो अशा व्यक्तींची सोळा वर्गवारीत विभागणी केली आहे. यात पंचायत समितीपासून जिल्हा परिषदेपर्यत, ग्रामीण आरोग्य उपकेंद्र – अंगणवाडी पासून ते वैद्यकीय महाविद्यालयापर्यत गट केलेले आहेत. याचबरोबर बँका, कृषी विभाग, पोलीस विभाग, शिक्षण विभाग, विजवितरण, बस वाहतूक-डेपो पासून दुध विक्रेते, फळवाले, फेरीवाले, पेपर विक्रेते, रिक्षाचालक, खाजगी वाहनचालक आदी सेवा क्षेत्राचा समावेश सुपर स्प्रेडर मध्ये केला आहे. सर्वाधिक काळजी याच घटकापासून घेणे अत्यावश्यक असल्याने या सर्वांची कोरोना चाचणी युध्दपातळीवर करता यावी यादृष्टीने ही विशेष मोहिम असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले.

ही मोहिम 27 जुलैपासून सुरु होत असून ती 11 ऑगस्टपर्यत चालणार आहे. यासाठी आरोग्य विभागाचे विशेष पथक तयार करण्यात आले आहेत. दररोज किमान 5 हजार 700 चाचण्या करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व तहसिल, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण आरोग्य यंत्रणा यांच्या समन्वयातून ही मोहिम राबविली जाणार आहे. प्रत्येक विभागाला नेमून दिलेल्या तारखेप्रमाणे पथकामार्फत कोविड-19 ची तपासणी केली जाईल. यात आरटीपीसीआरचे प्रमाण जास्तीत जास्त राहणार आहे. नांदेड मनपा क्षेत्रासाठी दररोज 2 हजार 310 चाचण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *