मुखेड- मी व गोविंदराव राठोड यांनी संस्था स्थापन करताना अनेक अडचणी सहन केल्या. संस्था स्थापन करताना वाटले नव्हते की कधी आमच्या हस्ते पदवीदान होईल म्हणून, या घटनेने मनाला अत्यानंद झाला आहे. शहरातील श्रीमंतांची मुले शिक्षण घेऊ शकतील पण ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाचे काय? हा विचार करून आम्ही या भागात शाळा व महाविद्यालये सुरू केली. १९५६ ला वसतिगृहासाठी मुले हवी होती. मुले आणायला गेलेल्या गुरुजींनाच फाशी पारधी बांधवांनी बांधून टाकले व मुले आमची आहेत आम्ही का तुम्हाला द्यावीत? असा उलट प्रश्न केला. तेंव्हा संकल्प केला होता त्यांच्याच मुलाला शिकवून मोठे करायचे. पुढे त्यांच्याच अशीलाक शिंदे या मुलाला शिकवून डॉक्टर बनवले. ही ताकत शिक्षणात आहे. मी जीवनात शिक्षण व शेतीला महत्त्व दिले. शेती माणसाचे पोट भरण्याचे काम करते तर शिक्षणातून जीवन परिवर्तन होते. आपण मुलांची इमानदारीने सेवा केलात तर हे सर्वात मोठे पुण्याचे काम आहे. शिक्षण हाच देव आहे असी मी व्याख्या करतो. ही व्याख्या अनुभवातून आली आहे. अन्नदानापेक्षा शिक्षणदानाला अधिक महत्व आहे असे प्रतिपादन विमुक्त जाती सेवा समिती वसंतनगरचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार कर्मवीर किशनराव राठोड यांनी ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान )महाविद्यालय वसंतनगर ता.मुखेड जी. नांदेडच्या वतीने आयोजित पदवीदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले.
यावेळी दुसरे प्रमुख पाहुणे संस्थेचे सदस्य तथा या भागाचे जिल्हा परिषद सदस्य संतोषभाऊ राठोड म्हणाले की ज्या पदवीधरांना आज विविध शाखांच्या पदव्या प्राप्त होणार आहेत त्या सर्वांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षणातून उद्यमशीलता व कौशल्य विकास याला महत्त्व दिले गेले आहे. आपण याचा अवलंब केला पाहिजे. आज सर्वत्र स्पर्धेचे वातावरण आहे. आपणास या स्पर्धेत उतरता आले पाहिजे. वाणिज्य शाखेत अनेक संधी आहेत त्याचा शोध घेऊन त्यात प्राविण्य मिळवा. केवळ पदवी मिळाली म्हणून स्वस्थ बसू नका तर पुढेही सतत शिक्षण घेत राहा.
अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिदास राठोड म्हणाले की आम्ही विद्यापीठाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून तसेच राज्य शासनाने कोरोना संदर्भाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून हा कार्यक्रम घेत आहोत. आपणा सर्वांसाठी हा कार्यक्रम ऐतिहासिक आहे कारण शिक्षण व शेतीत संपूर्ण आयुष्य अत्यंत प्रामाणिकपणे वेंचणा-या एका ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व असलेल्या कर्मवीराच्या हस्ते आपणास ही पदवी प्राप्त होते आहे. आज या क्षणी संस्थेचे संस्थापक सचिव कै.आ. गोविंदराव राठोड साहेबांची ही प्रकर्षाने आठवण होते आहे.
संस्थेने घालून दिलेले चांगले विचार त्यावरच चालण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करतो आहोत. खरे तर अशा कर्मवीरामुळेच तुम्हाला गावाजवळच उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध झाली व पदवी प्राप्त करता येते आहे. आम्हाला अनेक पदव्या अशा समारंभातून दूर असल्यामुळे घेता आल्या नाहीत. आज आम्ही या कार्यक्रमाकडे सणाच्या दृष्टीने आनंदित होऊन पाहतो आहोत.आई,वडील, कुटुंब, समाज व पर्यावरण या सगळ्यांना विसरू नका. नाउमेद न होता शिकत राहा. संतोषभाऊ सारख्या युवा व्यक्तीमत्वा कडून जिद्द, चिकाटी,अभ्यासूवृत्ती हे गुण तुम्ही घ्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे परीक्षा विभाग प्रमुख प्रा.डॉ.परशुराम शिंदे यांनी करून कार्यक्रम आयोजना पाठीमागची भूमिका व कार्यक्रमाची रूपरेषा सविस्तर विशद केली.
सुरुवातीला परीक्षा विभाग प्रमुख प्रा. डॉ. परशुराम शिंदे व क्रीडा विभाग प्रमुख प्रा. सुभाष देठे यांच्या नेतृत्वात महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून विद्यापीठ नियमाप्रमाणे कार्यक्रम स्थळापर्यंत पथसंचलनाने मिरवणुकीने सर्वांचे पदार्पण झाले.तदनंतर स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न करण्यात आले. प्रा. डॉ. गुरुनाथ कल्याण व प्रा. डॉ.महेश पेंटेवार यांनी विद्यापीठ गीत सादर केले. मान्यवरांचा सत्कार तदनंतर संपन्न झाला. मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर विज्ञान,वाणिज्य व कला शाखेतील विद्यार्थ्यांना पदवी वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्टाॅफ सेक्रेटरी प्रा.डॉ. व्यंकट चव्हाण यांनी केले तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. गुरुनाथ कल्याण यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर पुन्हा पथसंचलन आणि मिरवणुकीद्वारे मुख्य प्रवेशद्वारापर्यंत सर्वजण येऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमास संस्थेचे सदस्य मुख्या.गोविंद पवार,महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य,सिनेट सदस्य, अभ्यास मंडळ सदस्य,आयोजन समिती सदस्य,पत्रकार, संस्थेतील विविध शाखांचे शाखाप्रमुख, पदवी स्वीकारणारे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.