नांदेड ; प्रतिनिधी
कायापालट सारखे उपक्रम राबवून धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी समाजसेवेची अत्युच्च पातळी गाठली असल्याचे प्रतिपादन ॲड. सी.बी. दागडिया यांनी केले असून कायापालटच्या चौथा महिन्यात 32 निराधार , मतिमंद इसमांची कटिंग दाढी केल्यानंतर स्नान घालून नवीन कपडे व शंभर रुपये बक्षीस आणि चहा फराळाची व्यवस्था करण्यात आली.
भाजपा नांदेड महानगर व लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रलच्या वतीने दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी संयोजक दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कायापलट उपक्रम राबविण्यात येतो. चौथ्या सत्राचा शुभारंभ ज्येष्ठ समाजसेवक ॲड. सी.बी. दागडिया यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सचिव अरुणकुमार काबरा, सहसचिव सुरेश शर्मा, कोषाध्यक्ष सुरेश निल्लावार, माजी अध्यक्ष संजय अग्रवाल, शनी मंदिरचे सोनू महाराज यांनी शहरातील विविध भागात फिरून भणंग अवस्थेत फिरत असलेल्या नागरिकांना वाहनात बसून आणले. बजरंग वाघमारे यांनी सर्वांची दाढी कटिंग केली. बालाजी मंदिराचे महंत कैलास महाराज वैष्णव यांच्या सहकार्याने सर्वांच्या स्नानाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना नवीन कपडे देण्यात आले.
कायापालट उपक्रम पाहण्यासाठी हैदराबाद येथून स्नेहलता जयस्वाल ह्या मुद्दामून उपस्थित झाल्या होत्या. याप्रसंगी डॉ. दीपक हजारी,सुनील गट्टानी, राव , ओमप्रकाश बंग, डॉ. देशमुख, डॉ. मुखेडकर हे उपस्थित होते. कायापालट उपक्रम यशस्वी करण्यासाठी हरीश वैष्णव, अशोक राठोड, शेख सत्तार शेख इब्राहिम यांनी परिश्रम घेतले. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी हा उपक्रम अविरत सुरू राहणार असल्यामुळे
रस्त्यावरील वेडसर निराधार,बेघर,अपंग, भ्रमिष्ट व्यक्तीं ची माहिती द्यावी असे असे आवाहन संयोजक दिलीप ठाकूर यांनी केले आहे.