नांदेड : पावसाळी अधिवेशनासाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर दिल्लीत होते. आपला वाढदिवस साजरा करण्यासाठीहि ते नांदेडमध्ये उपस्थित नव्हते. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांचे आणि जनतेच्या भावना जाणून घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे आज सकाळी साडेनऊ वाजता नांदेड विमानतळावर आगमन होताच असंख्य कार्यकर्त्यानी, पदाधिकाऱ्यांनी, हितचिंतकांनी त्यांचे जंगी स्वागत केले .यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसह महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतही भाष्य केले.
खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. जिल्हाभरात साजरा करण्यात आलेल्या वाढदिवसासाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे उपस्थित नव्हते . महाराष्ट्रात निर्माण झालेली पूर परिस्थिती , त्यातून झालेली वित्त आणि जीवीत हानी. देशभरात पसरलेला कोरोना अशा परिस्थितीत आपला वाढदिवस साजरा न करता दुःखीताच्या दुःखात सहभागी होता आले पाहिजे , यादृष्टीने खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपला वाढदिवस साजरा न करता पावसाळी अधिवेशनासाठी दिल्लीत उपस्थित लावली. संसदेत जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आणि संसदेच्या कामकाजात उपस्थित राहण्यासाठी दिल्लीत असलेले खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे आज सकाळी विमानाने नांदेड येथे पोहोचले. नांदेडच्या विमानतळावर सकाळी साडेनऊ वाजता खासदार प्रतापराव चिखलीकर यांचे आगमन होताच कार्यकर्ते ,पदाधिकारी आणि हितचिंतकांनी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे जंगी स्वागत केले.
नांदेड विमानतळावर आगमन झाल्यानंतर खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी माध्यमांशी संवाद साधला . ते माध्यमांशी बोलताना म्हणाले की, जागतिक कीर्तीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वैयक्तिक भेट घेण्याचा योग माझ्यासह आमच्या कुटुंबियांना आला तो क्षण अविस्मरणीय असाच होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक भेटीतही नांदेड जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. नांदेडच्या औद्योगिक वाढीसाठी नांदेड येथे एखादा मोठा उद्योग सुरू करता येईल का या अनुषंगानेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आपली चर्चा झाली .शिवाय नांदेड – बिदर रेल्वे मार्गाच्या कामाला तात्काळ सुरुवात करावी, बोधन – मुखेड – लातूर रोड आणि नांदेड – लोहा – लातूर नवीन रेल्वेमार्गाला मंजुरी द्यावी अशी चर्चाही या बैठकीत या भेटीत करण्यात आली असे सांगून मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने संसदेत उपस्थित केलेल्या शून्य प्रहाराच्या वेळी आपण केंद्र सरकारकडे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या अनुषंगाने विनंती केली व महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळू शकले नाही हे ही नमूद केले. मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यादृष्टीने काम केले . मराठा आरक्षणाची सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणाऱ्या वकीलास मराठा आरक्षणाच्या संबंधित असणारी माहिती, दस्तावेज, पुरावे भाषांतरित करून देण्यात आली नाहीत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राची नाचक्की झाली. महाविकास आघाडीचे दळभद्री सरकार जबाबदार आहे. असा पुनरुच्चार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यावेळी केला.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे नांदेड जिल्ह्याच्या भेटीवर आले असता पालकमंत्र्यांनी त्यांचे स्वागत करणे अपेक्षित होते. नव्हे तसा राजशिष्टाचार आहे. परंतु नांदेडच्या पालकमंत्र्यांनी हा तोडला असून पक्षीय राजकारण करत राज्यपालांचे स्वागत करण्यासाठी ते गेले नाहीत ही खेदाची बाब आहे. एवढेच नाही तर मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष यांनी राज्यातील सर्वपक्षीय खासदारांना जे पत्र दिले आहे त्या पत्रातील मजकुरावरून त्यांचे अज्ञानच जास्त दिसून आले अशी कोपरखळीही खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मारली. स्वर्गीय विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना अकोल्याचे तत्कालीन पालकमंत्री रणजित कांबळे हे तत्कालीन राज्यपाल यांच्या स्वागतासाठी गेले नव्हते . रणजित कांबळे यांनी प्रोटोकॉल पाळला नाही म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांनी रणजित कांबळे यांचे पालकमंत्री पद काढून घेतले होते . याची जाणीव किमान काँग्रेसच्या नेत्यांनी ठेवायला हवी असा उपरोधिक सल्लाही खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिला.
शनिवार आणि रविवार असे दोन दिवस आपण नांदेड शहर आणि जिल्ह्यात असून या दोन दिवसात कार्यकर्ते पदाधिकारी आणि जनतेच्या गाठीभेटी घेणार आहोत .जनतेच्या अडीअडचणी समजून घेणार आहोत. त्यानंतर सोमवारी सकाळी दिल्ली येथे जाऊन संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी आपण उपस्थित राहणार आहोत .असेही खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले.