नांदेड, दि. ८ ऑगस्ट २०२१:
धर्माबादचे सुपुत्र आणि जपानमधील उद्योजक चैतन्य भंडारे यांनी टोक्यो ऑलिपिंकमध्ये भारतीय संघाचे मुख्य स्वयंसेवक म्हणून जबाबदारी सांभाळल्याबद्दल पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांनी त्यांचे कौतुक केले असून, त्यांचा संघर्ष आणि मायदेशासाठी दिलेले योगदान प्रेरणादायी असल्याचे म्हटले आहे.
रविवारी सायंकाळी पालकमंत्री चव्हाण यांनी ट्वीट करून चैतन्य भंडारे यांचे अभिनंदन केले. “टोक्यो ऑलिंपिकमध्ये नांदेड जिल्ह्यातील धर्माबादचे सुपुत्र व जपानमध्ये स्थायिक झालेले उद्योजक चैतन्य भंडारे यांनी भारतीय संघासाठी मुख्य स्वयंसेवकाची भूमिका सक्षमपणे सांभाळल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. एक नांदेडकर म्हणून आम्हाला चैतन्यचा अभिमान आहे.
प्रतिकूल परिस्थितीशी झगडत चैतन्य भंडारेंचे जपानपर्यंत पोहोचणे आणि संधी मिळेल तेव्हा तिथेही मायदेशासाठी योगदान देणे, अतिशय प्रेरणादायी आहे. त्यांची कहाणी ऐकल्यानंतर साहिर लुधियानवींचे शब्द आठवतात… हज़ार बर्क़ गिरे लाख आँधियाँ उट्ठें… वो फूल खिल के रहेंगे जो खिलने वाले हैं…” असे ना. चव्हाण यांनी ट्वीटमध्ये नमूद केले आहे.