“श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे”
असा हा श्रावण फार फसवा असतो. ऊन पडले आहे म्हणता-म्हणता पावसाच्या सरी कोसळू लागतात. परंतु हा श्रावण पक्ष्यांचा राजा मोर यास डौलदार पिसारा फुलवून नृत्य करण्यास आव्हान करतो. श्रावणात वेली वनस्पतींना पालवी फुटलेली असते. त्यामुळे जसे काही धरणीने नववधूचा वेष धारण केला आहे असे वाटते. सगळीकडेच या महिन्यात हिरवेगार दिसते. याच महिन्यात आपल्या या भारतीय संस्कृतीत साजरे केले जाणारे बरेच सण असतात. श्रावण महिन्याला सणांचा महिना असेही म्हणतात. श्रावण महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमी हा सण का साजरा केला जातो याची
पुराणांमध्ये एक कथा आहे. तक्षक नागाने केलेल्या अपराधाबद्दल सजा म्हणून राजा जनमेजयान सर्पयज्ञ सुरू केला. या सर्पयज्ञात त्याने सर्व सर्पांच्या आहुती देणे सुरू केले. तक्षक नाग मग स्वत:चा जीव वाचवण्यासाठी देवराज इंद्राच्या आश्रयाला गेला.
राजा जनमेजयान मग
इंद्राय स्वाहा: तक्षकाय स्वाहा: ।’ असे म्हणत इंद्राचीही आहुती तक्षक नागाबरोबरच देऊन टाकली. आपल्या या कृतीतून राजा जनमेजयान अपराध्याइतकाच अपराध्याला रक्षण देणाराही तितकाच अपराधी हे दाखवून दिले. आस्तिकऋषींनी राजा जनमेजयाला तप करून प्रसन्न करून घेतले. जनमेजयान आस्तिकऋषींना
वर मागा’असे म्हटले आणि मग आस्तिकऋषींनी सर्पयज्ञ थांबवावा, असा वर मागितला. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. म्हणून या दिवशी नागपंचमी हा सण येतो.
अजून एक
श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमी हा होता. या दिवशी हळदीने किंवा रक्तचंदनाने पाटावर नवनागांच्या आकृत्या काढतात. त्यांना हळदकुंकू वाहून पूजा करतात. नंतर दूध- लाह्यांचा नैवेद्य दाखवतात. श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. कालानुरुप समाजाने अनेक विधी, घटना कालबाह्य, थोतांड ठरवल्या. नागपंचमीच्या दिवशी सर्पाला मिळणारे अवास्तव महत्व जाणुन गारुडी लोकांनी त्याचा गैरफायदा घ्यायला सुरुवात केली. सर्प दुध पितच नाही, किंबहुन पित असला तरी दारोदारी येणारी सापांची तोंड शिवलेली असतात त्यामुळे नैवेद्य म्हणुन दिलेले दुध हे त्यांना मिळतच नाही आणि काही दिवसांनी हे साप मृत्युमुखी पडतात. ह्यासाठीच सरकारने नागपंचमीच्या दिवशी ’नागोबाला दुध’ म्हणत फिरणार्या लोकांवर बंदी घातली. सर्पमित्रांनी अश्या अनेक सापांची गारूड्यांच्या तावडीतुन सुटका केली आणि त्यांना परत अरण्यात सोडुन दिले. अर्थात खरे सर्प उपलब्ध नसले तरी बहुतेक ठिकाणी नागदेवतेच्या प्रतिमेची पुजा केली जाते. दुध, भाजलेले चणे, भात, लाह्या वगैरेंचा नैवेद्य दाखवला जातो.
याचबरोबर आपण आपल्या लहानपणापासूनच ऐकले आहे आणि आपल्याला शिकवण्यात आले आहे की साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे. आपल्या या शेतकरी बांधवाच्या शेतीच्या कार्यामध्ये सापाचा महत्वाचा वाटा आहे. शेतातील उंदीर आणि अन्य हानिकारक प्राणी खाऊन तो शेतीची निगा राखतो. म्हणूनच सापाला क्षेत्रपाल असेही म्हणतात.
आजच्या आधुनिक काळात अशाप्रकारे नागपंचमी साजरी करण्यापेक्षा त्यांचे रक्षण करून त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न
करून नागपंचमी साजरी करावी.
१)आपल्याला जर कुठे सर्प आढळून आला तर सर्पमित्रांच्या मदतीने त्याला अभयारण्यात किंवा झाडाझुडपांच्या ठिकाणी सोडावे किंवा जिथे लोकवस्ती नसेल अशा ठिकाणी सोडावे.
२)गारुड्यांकडून सुटका करून सर्पांना अभयारण्यात सोडावे.
३)प्रवास करत असताना रस्त्यामध्ये सर्प आपल्या गाडीखाली येणार नाही याची काळजी घ्यावी. म्हणजेच आपल्या शेतकरी मित्राचे प्राण वाचतील.
सर्पांचा मृत्यू याच कारणाने जास्त होत असल्यामुळे सर्पमित्रांकडून हळहळ व्यक्त करण्यात येते. त्यासाठी हे सर्व सर्पमित्र एकत्र येऊन ते शाळां, महाविद्यालयमध्ये तसेच काही सार्वजनिक ठिकाणी जाऊन जनजागृतीचे कार्यक्रम घेतात, आणि सापांविषयी योग्य अशी माहिती सांगून सर्पमित्र त्यांना वाचवण्यास सांगतात.
सौ.रूचिरा बेटकर नांदेड
9970774211