मा. मोतिराम राठोड हे माझे गुरूजी….
त्यांनी शालेय जीवनात शिकविलेल्या ज्ञानभाषेच्या जोरावरच मला इथपर्यंत येता आलं…
गुरूजींनी दिलेली “शिकवणी”च माझ्या जीवनात “परिवर्तन” घडवू शकली. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच अनेक बाबींचा “गुढा” उकलला. “चिन्हांकित यादीतल्या माणसांना” मुखर करता आले…
त्यांची कथासंग्रहावरील ही प्रतिक्रिया….
गुरूजींचे विद्यार्थ्याप्रति असणारे प्रेम आणि जिव्हाळा याची साक्षच…
वाचावे असे हे भाष्य.
अंतःकरणपूर्वक आभार सर.
चिन्हांकित यादीतली माणसं : ग्रामीण कथा : एक सुंदर मेवा
राठोड मोतीराम रुपसिंग
“गोमती सावली ” काळेश्वरनगर, विष्णुपूरी, नांदेड-६
९९२२६५२४०७
.अलिकडेच सायन प्रकाशकाने माधव जाधव लिखीत “चिन्हांकित यादितली माणसं ” हा प्रकाशीत केलेला कथासंग्रह हातात पडला . पुस्तकाचं बोलकं मुखपृष्ठ पाहूनच हे पुस्तक पक्कच खेडूताचं वर्णन करणारं आहे . हे मनाला पटलं . खेडेगावातील सामाजिक , आर्थिक , राजकीय , धार्मिक , कौटुंबिक जीवन व इतर अनेक समस्या या कथासंग्रहाच्या केंद्रस्थानी दिसतात. खेडूतांचं दुःख दारिद्रय, सध्याला ते भोगत असलेले जीवन याचे सुंदर चित्रण पुस्तकात आहे . मुखपृष्ठावरील चित्र पाहिले की रांगडेपण व गावराण बेरकीपणा लक्षात येतो . तसेच आजही गावत निरागस चेहरा घेवून फिरणारी माणसं आहेत हेही दिसून येते.
लेखकांनी ग्रामीण भागात वसत असलेल्या अनेक महत्चाच्या समस्यांचा या कथासंग्रहात अतिशय सहजरित्या उहापोह केल्याचे दिसून येते . खेडेगावत शिक्षणाचा प्रचार व प्रसार बऱ्यापैकी झालेला आहे हे सांगताना लेखक ग्रामीण भागातील बेकारीवर अलगद बोट ठेवताना दिसून येतो . “शिकवणी ” या कथेत डिएड करूनही नोकरी मिळत नाही . नोकरीसाठी भरमसाठ पैसा ओतावा लागतो त्यामुळे गरिब खेडूत आजही नोकरी पासून कोसो दूर आहे .
गावतील भोळी भांबडी माणसं पोरगा शिकला म्हणजे नोकरी लागेल या आशेवर जगतात . याचे चित्रण येते. नामदेव सारखं पोरगं डीएड होवूनही नोकरीला लागत नाही हे पाहून त्याच्या आईला खूप वाईट वाटते . तिच्या स्वप्नाचा चकाचूर होतो . पण तो नामा नोकरीच्या मागे न लागता कोचिंग क्लास मध्ये काम करून स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करतो . हा ग्रामीण भागातील मुलांना प्रेरणा देणारा प्रसंग लेखकाने आगदी उत्कृष्टपणे पुस्तकात उतरविला आहे . .
ग्रामीण भागात मुख्य व्यवसाय शेती . शेती शिवाय पर्याय नाही . पण आजकालची खेडूत मुले दहावी शिकली की काम सोडतात . बारावी शिकली की गाव सोडतात व त्यापुढे शिकली की तालुका जिल्हा सोडून पुणे मुंबई सारख्या शहरी कामाला जातात ; पण शेत नको . शेतात काम नको .
आजकाल शेतात मजूरही मिळत नाही . मिळाले तर मजूरी परवडत नाही . त्यामुळे शेतकऱ्याचे कसे हाल होत आहेत . जूनी पिढी औषध फवारून जमीनाचा कस उतरणार नाही यासाठी रसायनाला विरोध तर अधुनिक पिढी तननाशक वापरण्यास तयार याचं व्दंद लेखकांनी चांगलच रंगवले. पूर्वी केवळ भाकरीसाठी शेतात राबणारी माणसं भेटायची पण आता जमाना बदलला आहे. शहरात मजूरी भरपूर वाढली आहे .
लेखक तळमळीने शेतकऱ्यांना सांगतो पूर्वीचे सर्व सोडा अधुनिकतेची कास धरा व शेती करा . काळाप्रमाणे बदलायला शिका . रमेश आणि नाना पाटील हे नव्या जुन्याचे प्रतिनिधित्व करतात . रमेश जरी पदवीधर झाला तरी तो शेती कसण्यासाठी तयार होतो . यावरून हेच दिसून येते की खेड्यातील मुलांनी नोकरी नाही म्हणून चावडीवर गप्पा मारत बसण्यापेक्षा शेतीकडे लक्ष द्या व स्वालंबी बना . हेच लेखकाला पटवून द्यावयाचे आहे .
खेडेगावत घराघरात कुटुंबात भांड्याला भांडे लागतातच पण घरातल्या गोष्टी घरातच कशा मिटल्या जातात . घरातलं घरपण कसं टिकावं यासाठी सादू , दादू व त्यांच्या पत्नींनी मादूला कशी वागणूक दिली . त्याला सुधारण्यासाठी कसे प्रयत्न केले . याचं छान चित्रण लेखकांनी केलेले आहे आणि हे फक्त खेडेगावतच घडू शकते हे निश्चित .
खेडूत म्हटले की श्रद्धे पेक्षा अंधश्रद्धा जादा बाळगणारे . . धार्मिक भावाना जोपासणारे .थोडं काही दुःखायला लागले तरी सतराशे साठ देवानां नवस बोलणारे व करणारे आशा ग्रामीण माणसंविषयी समजूत आहे पण” तिचा विश्वास ” या कथेत . जुनी पिढी देवावर विश्वास ठेवणारी तर अधुनिक पिढी कर्मावर .
मुक्ताची आई आणि आजी धार्मिक तर मुक्ता ही मुक्त विचारांची हे आजही खेडेगावत दिसून येते . शिक्षण घेतल्यानंतर मनुष्य विचारांने कणखर बनतो हे निश्चित . खेडेगावात आजही जातीची उतरंड रचली जाते पण स्वजातीत सुद्धा सोयरिक होत नाही . रोटीबेटी व्यवहार चालत नाही म्हणून विश्वास व मुक्ताला होणारा त्रास आजही खेडेगावाचं चित्र तिचा विश्वा ही कथा डोळ्यासमोर उभं करते .
“गुढा ” या कथेत शिकलेली सिमा नावाची मुलगी अधुनिक पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करते पण हे आईवडीलाच्या व गावकऱ्यांचा पचणी पडत नाही . मुलीला जादा शिकवू नका .मुलीला शिकवून काय फायदा या नकारात्मक खेडूत वृतीचे दर्शन होते . आजही खेडेगावात नवऱ्या मुलाने वधू मुलीला प्रश्न विचारावे पण वधू मुलीने वर मुलाला प्रश्न विचारू नये असेच वाटते .
सिमा सारख्या असंख्य मुली आजही वागत नाहीत . सिमा नोकरीवाल्या पेक्षा गरिब पण होतकरु चारित्र्यवान वर पाहिजे असे ठनकावून सांगते . खेडेगावात असा बदल झाला पाहिजेच. खेडेगावातील मुलीच्या मनातील “गुढा ” कायमचं निघायला पाहिजे . असी लेखकाची तळमळ आहे .
खेडेगाव म्हणलं की बेरकी राजकारण आलंच.
ग्रामीण राजकारणात कोणी संधीचा फायदा तर कोणी संधीचा गैरफायदा घेताना दिसतात . अन हे नेहमी घडतेच “हिसका ” मध्ये गोविंदा तर बेरकी आहेच पण “चिन्हांकित यादीतील माणसं”या कथेचे कथानक तर हूबेहूब ग्रामीण राजकारण नव्हे राज्यचं,देशाचं राजकारण कोणत्या दिसेला जात आहे याचं चित्र उभं करतय . विजय आणि विलास हे पात्र गावातील राजकारणाचा “विजय व विकास” कसा होतो हे लेखकाने छान पटवून दिलंय . विजय व विलास हे राजकाराणात मुरब्बी आहेत बेरकी आहेत पण मतदाता त्यांचा पेक्षाही कसे भारी आहेत हे दिसून येते . राजकारणात पैशाचा महापूर येतो व सतत वहात राहतो हेही लेखकांने चपखलपणे सांगितलेलं आहे . विजय व विलास पैसे वसूल करणासाठी जातात तेव्हा मतदार किती हुशार झाले आहेत हे ही दिसून येते .
पैसे वसूलीच्या वेळी रंगाने विजय व विलासला दिलेले उत्तर वाचून निश्चित वाचकास अश्चर्याचा धक्काच बसतो . वाचक येथे गारदच होतो . “इलाज “या कथेत राजकारणात पडून ग्रामीण तरुण नशेच्या अहारी जात आहेत हेही लेखकांने उत्तमरित्या वाचकास पटवून देण्याचा प्रयास केलेला आहे तर “तोडगा ” या कथेत नशापाणी करून आजचा तरुण सध्या कसे वागत आहेत . आईबाबाना कशी वागणूक देत आहेत यांचं वास्तव रूपाचं दर्शन घडविलेले आहे .
“विचारी बिचारी “या कथे मधून लेखकांनी ग्रामीण गरिब ,लाचार मेंढपाळ याचं चित्र उभं केलेलं आहे . सालोंसाल गावकडे न जाणारे हे मेंढपाळ कष्टाचं जीवन कसं जगतात हे वाचून वाचक भावूक होऊन जातो . मेंढपाळ हा मालक नाहीच तो कुणाची तरी चाकरी करतो व मालक आनंद साजरा करतो व चैन लुटतो हे वाचताना वाचकाच्या मनात कालवा कालव झाल्याशिवाय राहत नाही .
यशवंत सारखं पोरंग आज शेतीचं अर्थशास्त्र मांडताना दिसतेय. गावात “परिवर्तन ” होईल आशी आपेक्षा लेखक करत आहे . तर “पटपडताळणी “व “दावेकर गुरुजी ” या कथेतून आजची संस्था , संस्था चालक व गुरुजी यांची धावपळ, हालआपेष्ठा दाखवून शिक्षणात शिरलेल्या वाईट प्रवृतीवर लेखकांने बोट ठेवलेलं आहे .
“नामा आज्या” हा आपल्याला प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी भेटणारं पात्र आहे .फक्त नाव बदल असेल यवढंचं . पण प्रत्येक ठिकाणी तो भेटतो . आपणास हासवतो प्रेम देतो,प्रेम घेतो .
लेखकाने एका नवीन समस्येवरही छान प्रकाश टाकलेलं आहे . ते म्हणजे एका श्रीमंत घरी दिलेली मुलगी जेव्हा भावाबरोबरीचा हिस्सा मागते . कायद्याने सर्वच बाईलेकी हुशार झालेत असे नाही पण एकूलती एक मुलगी म्हणून बाप तन मन धनाने मुलीचं लग्न लावून देतो .
पण तीच मुलगी सासरचं ऐकूण जेव्हा माहेरची महामार्गात गेलेल्या जमीनाचा मावेजा बापकडून मागते तेव्हा बाप लेकीचं नातं चुलीत जळाल्या सारखं वाटते . बाप नावाच्या प्राण्याची हाल पाहून वाईट वाटते . पण सरपंचाची आडीच घराची चाल पाहून आनंदही होतो . मदत करणे हा खेडूतांचा स्वभाव गुणधर्म आहे .
थोडक्यात सांगयचं म्हणजे हा कथासंग्रह वाचनीय झालेला आहे . मुखपृष्ठ सुंदर बोलकं आहे तर पाठराखण आदरणीय माजी कुलगुरु नागनाथराव कोत्तापले सरांनी केलेली आहे .
सगळ्यात मजेदार व वैशिष्टयपूर्ण गोष्ट म्हणजे या पुस्तकातील भाषा . लेखकांने विदर्भ व मराठवाडी भाषेचे सुंदर मिश्रण केलेले दिसून येते . “मुव्ह तुव्ह “असे शब्द लक्ष वेधून घेतात . भाषेच्या दृष्टीकोणातून हा कथासंग्रह वैशिष्टयपूर्ण ठरणार आहे . खेड्याचं वर्णन खेड्याची भाषा वापरून लेखकाने ग्रामीण भागातील प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे .
वाचक या पुस्ताकाचं निश्चितच भरभरून स्वागत करतील यात शंकाच नाही .
पुस्तकाचे नाव : चिन्हांकित यादीतली माणसं
प्रकाशन : सायन .
लेखक : .माधव रा.जाधव
पुस्तकातील एकूण पृष्ठ : १४८
पुस्तकाची किंमत : रु २००