मुखेडकरांसाठी सेवापुर्ती सन्मान सोहळा हा ऐतिहासिक कार्यक्रम- कर्मवीर किशनराव राठोड

मुखेड – प्रतिनिधी

मी माझ्या आयुष्यात अनेक कार्यक्रम पाहिले पण आज कै. गोविंदराव राठोड स्मृति प्रतिष्ठानने विविध क्षेत्रात अनेक वर्षे सेवा देऊन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा सन्मानपूर्वक केलेला हा सेवापुर्ती सन्मान सोहळा पाहुन भारावुन गेलो.हा सोहळा माझ्यासह आपणा सर्वांसाठी ऐतिहासिक आहे.आमदार डॉ. तुषार राठोड नेहमी जनतेसाठी चांगले कार्यक्रम घेतात. चांगले काम करत आहेत याचा मला मनस्वी आनंद होतो. ज्या शिक्षकांमुळेच समाज घडतो. त्या शिक्षकांना समाजात सन्मान प्राप्त होणे महत्त्वाचे आहे.मी आयुष्यात शेतीला व शिक्षणाला अधिक महत्त्व दिले. मी श्रीमंत माणसाला कधीच घाबरत नाही तर गरीब माणसाला घाबरतो.प्रामाणिक माणसाची कदर करतो. आज आपल्यात गोविंदराव नाहीत याची उणीव जाणवते आहे. पण म्हणतात ना ‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’ याच पद्धतीने या प्रतिष्ठान मुळे त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम केले जात आहे व त्यांची कीर्ती आजरामर ठेवली जात आहे.

मुखेड करांसाठीच नव्हे तर सर्व समाजासाठी हा सेवापुर्ती सन्मान सोहळा ऐतिहासिक आहे असे उदगार माजी आमदार कर्मवीर किशनराव राठोड यांनी ‘कै.गोविंदराव राठोड स्मृति प्रतिष्ठान द्वारा आयोजित ‘सेवापूर्ती सन्मान सोहळा २०२१’या प्रसंगी अध्यक्षीय समारोप करताना आर्य वैश्य मंगल कार्यालय मुखेड येथे केले.
यावेळी बोलताना आ. डॉ. तुषार राठोड म्हणाले की कै. गोविंदराव राठोड स्मृति प्रतिष्ठान नेहमी चांगले उपक्रम घेत आले आहे. मागे मुखेड कंधार मतदार संघातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्यदिव्य सत्कार समारंभ घेण्यात आला होता.त्या नंतर शिक्षक परिषद घेण्यात आली.आज हा कार्यक्रम घेतला जात आहे. माझे वडील गोविंदरावजी राठोड साहेब असताना विमुक्त जाती सेवा समितीच्या वतीने कै.वसंतराव नाईक व्याख्यानमाला व अन्य उपक्रमातून सतत विविध उपक्रम घेतले जात असायचे. परंतु वडिलांच्या जाण्यानंतर या कार्यक्रमांच्या मध्ये खंड पडला. पूर्वीचे कार्यक्रम हे संस्थे पुरते मर्यादित होते त्याला विस्तृत रूप या प्रतिष्ठानच्या माध्यमातून देऊन ती खंडित पडलेली परंपरा पुढे चालू ठेवण्याचे काम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून केले जात आहे.त्यात आज विविध क्षेत्रात ज्यांनी आपल्या आयुष्याचा उभारीचा काळ घालवला त्यांच्याप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.ज्या समाजात आपण काम करतो त्या समाजाने देखील आपल्या कार्याची दखल घ्यावी असी प्रत्येकाच्या अंतकरणांमध्ये सुप्त इच्छा असू शकते.असे समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना यासारख्या कार्यक्रमातून प्रोत्साहन दिले तर निश्चितपणे समाज घडवण्याच्या कामाला अधिक गती प्राप्त होऊ शकते. हा प्रामाणिक उद्येश या कार्यक्रम आयोजना पाठीमागचा आहे. सेवा निवृत्तीनंतर सर्व बंधू-भगिनींनी समाज उन्नतीसाठी सतत कार्यरत रहावे,त्यांना दीर्घायुरारोग्य लाभावे अशी सदिच्छा ही या निमित्ताने त्यांनी व्यक्त केली.


यावेळी ॲड.खुशालराव पाटील उमरदरीकर म्हणाले की सेवानिवृत्तीनंतरचे जीवन हे समाजसेवेसाठी जगावे.तुमच्या आयुष्यात तुमच्या अर्धांगिनीचे ही तितकेच योगदान आहे. आरोग्याकडे लक्ष द्या.सर्वस्वी आपल्याकडचे सगळेच देऊन टाकू नका. काही आर्थिक बाबी स्वताकडे ठेवा. जीवनात इतकी वर्ष शिक्षण क्षेत्रासाठी दिलेत तो अनुभव पुढच्या पिढीलाही देत राहा. शिक्षक हा शेवटच्या श्वासापर्यंत शिक्षक असतो ही जाणीव समाजात वावरताना असू द्या.अन्यथा घरच्यांना व समाजाला असे वाटू नये हे उगीच सेवानिवृत्त झाले. नेहमीच राठोड परिवार चांगले उपक्रम घेत आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे आजचा कार्यक्रम आहे.
रिपाईचे जिल्हाध्यक्ष गौतमभाऊ काळे म्हणाले की राठोड परिवार नेहमीच गोरगरीब, वंचित, दलितांसाठी कार्य करत करतात. आमदार साहेब नेहमी शेवटच्या माणसाच्या विकासाला महत्त्व देतात. डॉ. बाबा साहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे वर्म त्यांच्या लक्षात असल्यामुळे शिक्षण क्षेत्राला मानाचा दर्जा ते नेहमी देत असतात. आजचा कार्यक्रम हा त्याचाच एक भाग आहे.आज या क्षेत्रात काम करणा-या व सेवानिवृत्त झालेल्या लोकांचा सत्कार अत्यंत सन्मानपूर्वक याठिकाणी संपन्न होतोय ही अत्यंत स्तुत्य बाब आहे.
यावेळी तहसीलदार काशिनाथ पाटील यांनीही सेवानिवृत्तांना आरोग्याकडे लक्ष देण्याचा, आर्थिक पुंजी राखून ठेवण्याचा, सकारात्मक विचार ठेवा, ग्रंथ वाचन व आपणास छंद आहे त्या छंदात मन गुंतवा, शरीर ही महत्त्वाची संपत्ती आहे त्याची काळजी घ्या असे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
याशिवाय गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकार, डी.एम.पांडागळे,मुख्याध्यापक विठ्ठल इंगळे, नरसिंग सोनटक्के, सौ. स्नेहलता चव्हाण यांचेही मनोगत व्यक्त झाले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचलन माजी प्राचार्य डॉ. रामकृष्ण बदने यांनी तर आभार थगणारे गुरुजी यांनी मानले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री.वीरभद्र मठपती व त्यांच्या संगीत संचाने देशभक्ती पर गीते सादर केली तसेच स्वागत गीत ही गायले.माता सरस्वती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी व कै. गोविंदराव राठोड यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक मुखेडचे नगराध्यक्ष बाबू सावकार देबडवार यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. नंतर मंचावरील मान्यवरांचा सत्कार संपन्न करण्यात आला. नंतर सेवापुर्ती सन्मान सोहळा २०२१ मधील माजी सैनिक, शिक्षण विस्ताराधिकारी, बससेवा, पोस्ट ऑफिस या व यासारख्या विविध क्षेत्रात सेवा देऊन शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये सेवानिवृत्त झालेल्या ६१ कर्मचारी बंधु भगिनींचा सत्कार सन्मानचिन्ह, जोडआहेर, बुके देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.तसेच नुकतेच पदोन्नतीने मुख्याध्यापक पदावर रुजू झालेल्या मुख्याध्यापकांचा सत्कार ही संपन्न करण्यात आला.


कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष तथा विमुक्त जाती सेवा समितीचे सचिव प्राचार्य गंगाधरराव राठोड, पं.स.सभापती सौ. सविताताई लक्ष्मणराव पाटील,उपसभापती पं.स. प्रतिनिधी मनोज गोंड,न.प. भाजपा गटनेते चंद्रकांत गरूडकर, जि. प. सदस्य संतोषभाऊ राठोड,ग्रामीण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिदास राठोड, मुखेड भाजपा तालुकाध्यक्ष डॉ.वीरभद्र हिमगिरे, गटविकास अधिकारी तुकाराम भालके, पं.स. सदस्य राम पाटील, बालाजी पाटील सकनुर,न. प.सदस्य जगदीश शेठ बियाणी,दीपक मुक्कावार,गोटू पाटील बिल्लाळीकर,भाजपा सरचिटणीस व्यंकटराव जाधव, भाजपा शहराध्यक्ष किशोरसिंह चौहाण, डॉ.शारदाताई हिमगिरे, हेमंत खंकरे, सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, शिक्षण विस्ताराधिकारी व्यंकट माकणे, होनधरने,नीळकंठराव चोंडे, व्यंकट गंदपवाड व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्या. गोविंद चव्हाण,राजेंद्र वर्ताळकर, नरसिंग सोनटक्के, अशोक चव्हाण, प्रा. डॉ. रामकृष्ण बदने, थगणारे सर, सचिन रामदिवार, कराळे गुरुजी, भारत जायभाये, सुधीर चव्हाण व अन्य सहकार्‍यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *