फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
कंधार तालुक्यातील फुलवळ हे गाव तसे सदन , सुशिक्षित आणि सर्वगुणसंपन्न असलेले जाणकार लोकवस्तीचे जि. प. गटाचे जवळपास सहा हजार लोकसंख्या असलेले, राजकारणात तरबेज आणि चौकटीला स्वयंघोषित नेता असलेले गाव. ” गाव तस चांगलं पण अनेक समस्यांनी यंगल ” असेच काहीसं चित्र येथे पहायला मिळत आहे. डेंग्यू सदृश्य परिस्थितीत असतानाही गावातील मुख्य रस्ते मात्र चिखलमय आणि घाणीने माखल्यामुळे येणाऱ्या काळात जनमानसाचे आरोग्य नक्कीच धोक्यात येऊ शकते अशी भीती असतानाही ग्राम पंचायत चा हलगर्जीपणा कायम असून काही केल्या जागरुकपणा जागा व्हायला तयार नाही.
सध्या पावसाळ्याचे दिवस असून नेहमीच पावसाळ्यात अनेक रोगराई तोंड बाहेर काढत असते हे तर आपणास माहितीच आहे त्यातल्या त्यात आजघडीला तर सर्वत्र डेंग्यू , कोरोना , सर्दी ,ताप , खोकला असे अनेक गंभीर व विविध साथीचे आजार मान डोकावून तोंड बाहेर काढत तुमची – आमची शिकार करण्यासाठी टपुनच बसले असून सध्याच्या परिस्थितीतही फुलवळ सह परिसरात ताप , सर्दी , खोकला अश्या विविध आजाराने अनेक रुग्ण फनफनत आहेत.
आरोग्य प्रशासन सांगतेय की प्रत्येकाने आपापल्या घरी ड्राय दे पाळावा आणि डासमुक्त व रोगराई मुक्त कुटुंब ठेवावे. परंतु घरातच कोरडा दिवस पाळून काय उपयोग , घराबाहेर पडताच गावातील रस्ते मात्र चिखल , घाणीने माखलेले असून रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी घाण व गवत वाढलेले पाहायला मिळते. तेंव्हा याच रस्त्यावरील घाणीने पुन्हा डासांचा शिरकाव वाढतच जातोय त्यामुळे चालू असलेल्या विविध साथीच्या रोगावर कसे नियंत्रण ठेवणार ? हा प्रश्न गंभीर आहे.
त्यासाठी पहिल्यांदा गावातील नाल्या , रस्ते साफसफाई करून त्यावर डासमुक्त धुराच्या फवारण्या ग्राम पंचायत ने करणे गरजेचे आहे. तसेच पाणीपुरवठा योजना सुरू असलेल्या जलकुंभात ब्लिचिंग पावडर चा वापर करणेही तेवढेच महत्वाचे आहे. पण हे सर्व ग्राम पंचायत करणार कधी ? असा प्रश्न ही गावकऱ्यातून समोर येत आहे. एवढेच नाही तर छोटा , मोठा पाऊस झाला तरी रस्त्यावरील चिखलामुळे नीट चालन्यासाठी माणसांची चांगलीच दमछाक होत आहे.
नात्यागोत्यांच्या राजकणात ग्राम पंचायत च राजकारण गुरफटल्यामुळे इथे जनमाणसांच्या साधारण समस्याही नेमक्या कोणाकडे मांडाव्यात हाही प्रश्नच गावकऱ्यासमोर ठाण मांडून आहे .
कारण ग्राम पंचायत निवडणूक असतांना वॉर्डनिहाय निवडणूक लढवलेले व निवडून आलेले उमेदवार आणि सध्याचे ग्राम पंचायत सदस्य निवडणूक काळात मात्र खूप मोठ मोठी आश्वासनांची खैरात घालत मतदानाची भीक घाला अशी विनवणी करत होते , तेच उमेदवार आज निवडून आल्यानंतर मात्र आपापलं साट्यालोट्याच राजकारण करत आपापली पोळी भाजून घेण्यात गर्क आहेत की काय अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. कारण जनतेचे प्रश्न , समस्या घेऊन त्या सोडवण्यासाठी तर कोणता ग्राम पंचायत पुढाकार घेऊन समोर किंवा ग्राम पंचायत च्या सभागृहात आवाज उठवताना दिसत नाही. कारण प्रत्येक सदस्यांनी जर आपल्याला वॉर्डात विकासात्मक कामांचा अजेंडा हाती घेऊन जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ दिला आणि गाव स्वच्छता अभियान राबविण्यासाठी पुढाकार घेतला तर नक्कीच जनतेला रोगराई , आजारपण यापासून आपण वाचवू शकतो यात शंकाच नाही.