सर्पदंश प्रतिबंधासाठी शेतकऱ्यांना मोफत गम बुटांचे वाटप…! पुंडे हॉस्पिटल आणि निनाद फाउंडेशनच्या वतीने सर्पदंश व जनजागरण अभियान
मुखेड : (दादाराव आगलावे)
दरवर्षी भारतात ५० हजार लोक सर्पदंशाने मृत्यू पावतात ही अत्यंत भयावह परिस्थिती आहे. सर्पदंश हा आरोग्य सेवेतील दुर्लक्षित भाग आहे आणि तो शेतकरी आणि शेतमजूराचा कालमर्यादित अपघात आहे .एक शेतकरी दगावणे म्हणजे एक कुटुंब दगावणे होय. नांदेड जिल्हा आणि मुखेड तालुका हा डोंगराळ, वाडी-तांडा आणि शेती यामुळे या भागात सर्पदंशाचे प्रमाण जास्त आहे. मागील ३४ वर्षापासून पुंडे हॉस्पिटल तर्फे उपचारासोबतच मोफत जनजागरण अभियान राबविण्यात येते.
आजपर्यंत ७ हजार रुग्णा़ंवर उपचार आणि जवळ जवळ ५ लाख लोकांचे मोफत जनजागरण करण्यात आले. १९८८ चा सर्पदंशमृत्यूदर २५ टक्केच्या आसपास होता तो आज १. १४ वर आहे. या अभियानाचे उद्दिष्ट म्हणजे शून्य मृत्युदर, टीच वन इच वन, सेव्ह द सेव्हियर असून शेतकऱ्यांनी सर्पदंश झाल्यानंतर भोंदू बाबा कडे न जाता जवळच्या रुग्णालयात उपचार घ्यावा, विज्ञानाची कास धरुन अंधश्रद्धेची कात टाकावी असे प्रतिपादन डब्ल्यू. एच.ओ. चे सदस्य तथा मुखेड भूषण डॉ. दिलीप पुंडे यांनी केले.
ते निनाद फाउंडेशन नांदेड व पुंडे हॉस्पिटल यांच्या वतीने मोफत गम बूट वाटपाच्या कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी काशिनाथ महाराज होते तर व्यासपीठावर पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप कामशेट्टे ,सुनील पौळकर, इमा चे अध्यक्ष डॉ. व्यंकट भोसले, डॉ. वीरभद्र हिमगीरे, वैद्यकीय संस्थेचे नूतन अध्यक्ष डॉ. राहूल मुक्कावार, सचिव डॉ. पांडुरंग श्रीरामे, सुप्रभात मित्र मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण पत्तेवार, निनाद फाउंडेशन चे सचिव डॉ. मोहित सोलापूरकर, गजानन लसीतकर, अरुणा बहनजी यांची उपस्थिती होती.
मुखेड भुषण डॉ. दिलीप पुंडे पुढे म्हणाले की, डॉ. निनाद यांच्या मित्र मंडळांनी त्यांच्या स्मरणार्थ केलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि प्रेरणादायी आहे. हा महाराष्ट्रातला एक आगळावेगळा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम रचनात्मक असून शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक काळजी घेतल्यास सर्पदंश टाळता येऊ शकतो व अंधश्रद्धेच्या आहारी न जाता विज्ञानाची कास धरली तर निश्चितच मृत्युदर कमी होऊ शकतो.
निनाद फाउंडेशनचा हा उपक्रम प्रेरणादायी असून असे उपक्रम अनेक भागात राबविले जावेत अशी अपेक्षा डॉ. दिलीप पुंडे यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, सर्पदंश हा भारतीय आरोग्य सेवेतील दुर्लक्षित भाग असून मलेरिया, फायलेरिया, मोतीबिंदू सारखाच सर्पदंशही राष्ट्रीय कृती कार्यक्रमात समाविष्ट होण्याची गरज आहे. शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती फार भयावह असून त्यातच सर्पदंशाचा फास शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती पडतो आहे. लोडशेडींगमुळे अपरात्री त्यांना शेतात पाणी देण्यासाठी जावे लागते, उकाड्यामुळे बाहेर झोपावे लागते. शेतकऱ्याच्या वेदनेची संवेदना समाजाने जोपासली तर निश्चितच सर्पदंशावर विजय मिळवू शकतो. अशा कार्यक्रमांना सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. याप्रसंगी त्यांनी सर्व पत्रकारांना धन्यवाद देत शेतकऱ्यांची वेदना आपल्या लेखनातून शब्दांत यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
या प्रसंगी निनाद फाऊंडेशनचे सचिव मोहित सोलापूरकर म्हणाले की, मित्रांच्या स्मृतीप्रित्यर्थ अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवत आहोत. डॉ. दिलीप पुंडे यांच्या सर्पदंश मुलाखतीतून आम्ही हा कार्यक्रम घेतला आहे आणि दरवर्षी हा कार्यक्रम आम्ही राबविणार आहोत. गजानन लसिदकर यांनी निनाद फाउंडेशनच्या कार्यक्रमाचा लेखाजोखा मांडला. यावेळी डॉ.विरभद्र हिमगीरे म्हणाले की, शेतकऱ्यांना अनेक हालअपेष्टांना सामोरे जावे लागते अनेक शेतकरी सर्पदंश झाल्यानंतर खाजगी इलाज करतात व आपला जीव गमावून बसतात कुठल्याही भूलथापांना बळी न पडता अंधश्रद्धेच्या आहारी न जाता सरळ रुग्णालयात दाखल व्हावे असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप कांमशेट्टे म्हणाले की, मुखेड तालुका दुर्गम डोंगरी भाग व कृषी प्रधान असल्याने शेतकऱ्यांना सर्पदंश होण्याचे प्रमाण अधिक आहे. पारंपारिक शेतीपद्धतीत बदल करावा, सामाजिक बांधलीकातून मोफत गम बूट वाटपाचा कार्यक्रम हा अभिनंदनीय आहे इतर समाजीक संस्थांनी यासाठी पुढाकार घ्यावा. रक्षा बंधनाच्या दिवशी गम बूटांचे वितरण करून शेतकऱ्यांची रक्षा करण्याचा उपक्रम अविस्मरणीय आहे.
अध्यक्षीय समारोप करताना काशिनाथ महाराज म्हणाले की, डॉ. दिलीप पुंडे साहेब म्हणजे या भागातील दैवतच आहेत. त्यांनी आमच्या विभागातील अनेक सर्पदंश रुग्णांना जीवनदान दिले आहे. गोणार येथील सर्पदंश झालेल्या मुलास मृत्युच्या दाढेतून बाहेर काढले. त्यांच्या हातात एक किमयाच आहे. आम्हा शेतकऱ्यांना गम बूट देऊन त्यांनी आम्हाला आधार दिला अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. यावेळी सुनील पौळकर यांनी या कार्यास शुभेच्छा दिल्या व मित्राच्या स्मृती जिवंत ठेवण्याचा अनोखा कार्यक्रम आहे असे प्रतिपादन केले.
अरुणा बहनजी यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सुंदर चित्रीकरण डॉ. शिवानंद स्वामी यांनी करून फेसबुक लाईव्ह व अनेक चॅनलवर प्रदर्शित केले. यावेळी मान्यवर आणि पत्रकार यांच्या हस्ते गम बूटांचे वाटप करण्यात आले. सीमेवर जाऊन सैनिकांना राख्या बांधल्याचे आपल्या ऐकिवात आहे परंतु शेतकऱ्यांना एके ठिकाणी जमून त्यांना राख्या बांधण्याचा हा तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग असावा असे शेतकऱ्यांतून बोलल्या जात होते. अत्यंत भावनिक कार्यक्रम संपन्न झाल्याची चर्चा होत होती.
या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचलन डॉ .पांडुरंग श्रीरामे यांनी केले. या प्रसंगी डॉ. आर. जी. स्वामी, डॉ. कैलास पाटील चांडोळकर, मनोज जाजू, उत्तम अण्णा चौधरी, नारायणराव बिलोलीकर, पत्रकार दादाराव आगलावे, शिवाजी कोनापुरे, आशिष कुलकर्णी, मेहताब शेख, किशोर संगेवार, शिवकांत मठपती, भास्कर पवार, संपादक नामदेव यलकटवार, बबलू शेख, मिलींद कांबळे, किशन इंगोले, गजानन बंडे, एस.पी. कपाळे, बालाजी डोणगावे, व्यंकट शिंदे, राम जाधव, सरवर मनियार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
यावेळी पुंडे हॉस्पिटल व हिमगीरे हास्पिटलच्या सर्व कर्मचार्यांनी अथक परिश्रम घेतले. प्रारंभी शहीद सुधाकर शिंदे यांना दोन मिनिटे श्रद्धांजली वाहून,दीप प्रज्वलन आणि धन्वंतरी पूजन, डॉ निनाद यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तर अरुणा बहनजी यांच्या रक्षाबंधनाने कार्यक्रमाची सांगता झाली.