माध्यमिक आश्रम शाळा वसंतनगर ता. मुखेड जि. नांदेड, गावापासून दूर, शहरापासून दूर माळरानावर वसलेली. शाळेच्या अंगणात त्याकाळी फक्त एक मोठे हिळ्याचे (बेहडा) झाड होते. बाकी सगळं भकास रान. आजुबाजूला अर्धा कि मी एक कि मी वर पाच दहा घर असलेली तीन तांडे होती. पावसाळ्यात आजूबाजूच्या शेती हिरवगार शालू नेसून डौलदार पणे हवेच्या तालावार डोलत, नाचत राहायच्या. पिक कापणी झाली की मग सगळं रान ओसाड सताड उघड पडून राहायचं. पावसाळ्यात पक्ष्यांचा चालणारा किलबिलाट, चिवचिवाट बंद व्हायचं. सगळीकडे रानात सूनं सुनं वाटत राहायचं. शाळेजवळून वाहणाऱ्या लहान लहान लवणं कोरड्या ठाक पडायच्या. पाझर तलावही पाझरून पाझरून कोरडं रूप धारण करायच. शाळेत बाहेरचे साहेब लोक फारसे कधी आल्याचे आठवत नाही. अधिकारी आले असतील तर ते विद्यार्थी वर्गाला कळत नसे. त्याकाळी शाळेची कसल्याच प्रकारची तपासणी होत नव्हती असे नाही पण वार्षिक तपासणी मात्र मी शाळेत असे पर्यंत एकदाच झालाचे आठवते.
बहुतेक ते १९७४ चं साल असेल. मी आठव्या वर्गात होतो. त्याकाळी तपासणीला अतिशय महत्व होते. शाळेत शाळा तपासणी पूर्वी किमान आठ दिवस मोठ्या गुरुजींनी (मुख्याध्यापक) सूचना काढली होती. त्यात सर्व शिक्षक, वर्ग शिक्षक व विद्यार्थ्याना सूचना दिलेल्या होत्या. विषय शिक्षकांनी आपआपल्या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण करावा. तर वर्ग शिक्षकांनी आपआपल्या वर्गाची उपस्थिती शंभर टक्के ठेवावी. हे काम सगळ्यांनी अगदी काळजीपूर्वक पार पाडावे. हयगय, निष्काळजीपणा चालणार नाही. विद्यार्थ्यांकडून झालेल्या अभ्यासक्रमावर प्रश्नोत्तरे घ्यावे. भरपूर सराव करून घ्यावा. वगैर वगैरे सूचना दिल्या होत्या.
आश्रम शाळेची वार्षिक तपासणी करण्यासाठी नाजर का नादर साहेब येणार होते. सर्व शिक्षक वर्ग तापसणी चांगली झाली पाहिजे यासाठी मनलावून कामाला लागले होते. शाळा सुटल्या नंतर शालेय परिसर स्वच्छ करून घेतले. तपासणी होईपर्यंत शालेय परिसर चकाचक करून घेतले होते. हॉस्टेल मधील मुलांना कपडे धुवून स्वच्छ ठेण्याच्या सुचना व्यवस्थापकांना मोठ्या गुरूजींनी दिलेल्या होत्या. त्यानुसार व्यवस्थापकांनी सर्व विद्यार्थ्यांना चांदनी बार या साबनाचे छोटे छोटे तुकडे करून विद्यार्थ्यांना वाटले होते. शाळेजवळ व शाळेत पाण्याची व्यवस्था नव्हती. स्नांनासाठी, कपडे धुण्यासाठी रुई, शिरूर (द.), कोटग्याळ या गावाला जावे लागे. फक्त पिण्याचे पाणी बैलगाडीवर आणायचे.
तपासणीचा दिवस जवळ जवळ येत होतं. तसं तसं सर्वांची धाकधूक वाढत होती. दररोज विदयार्थी उपस्थिती वाढत होती. न येणाऱ्यांना ही शाळेतील सेवकामार्फत बोलावून आणत होते. गुरुजी आपआपल्या विषयांचा अभ्यासक्रम पूर्ण करून प्रश्नोत्तरांचा सराव घेत होते. अभ्यास न करणाऱ्यास छडीचा प्रसाद मिळत होता. हात चोळत डोळे पुसत वर्गातील विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या कूवतीनुसार अभ्यास करत होते. पण सर्वच विद्यार्थी सारखे नसतात. अभ्यासात कमीजास्त असतातच.
आमच्या वर्गात एक विद्यार्थी होता. त्याचे नाव भिमराव लखू राठोड. तो आमच्या वर्गात सगळ्यात उंच होता. किडमीडित शरीराचा होता. डोळे बारीक खोल गेलेले होते. गालांची थोडी खोबनी झालेली होती. सरळ नाक गोल चेहऱ्याचा भिमराव हा अभ्यासात कच्चा होता. भिमरावला अक्षर ओळख होती; पण निट वाचता येत नव्हते. बाकी प्रश्नोत्तर त्यासाठी दिव्य होतं. सगळ्या बरोबर भिमरावला गुरुजी प्रश्न विचारायचे तो उत्तर देत नसे. गुरुजी त्याला तळ हातावर मारायचे. मग तो म्हणायचा गुरुजी माझे हात तुटलेले आहेत. गुरुजी त्याला हातच्या कोपरा वर मारायचे मग तो म्हणायचा माझं कोपर तुटले. मग गुरुजी पाठीत मारायचे तो म्हणायचा पाठ तुटली. मग गुरुजी डोक्यावर मारायचे तर तो डोकं फुटलं म्हणायचा. गुरुजी दंडावर मारायचे तो दंड तुटला म्हणायचा. थोडक्यात ज्या भागावर गुरुजी मारायचे तो भाग त्याचा तुटलेला असायचा. असे चार पाच दिवस झाले. भिमराव अभ्यासाला कंठाळला होता. गुरुजीच्या माराचा आता त्यालाही वीट आला होता. तो गुरुजीला म्हणाला, “गुरुजी तुमालाच काई येईनान जाईना उगचं मारूलालाव मारुलालव आता म्या उद्यापासुन शाळेत येणारच नाही.” त्यावेळी वर्गातील मुलांना व गुरुजीला त्याच बोलणं खरं वाटलं नाही. पण भिमराव त्या दिवसापासून शाळेत कधीच आला नाही.
काय साहेबाचा थाट होतं. एवढं रुबाब मी कोण्यात्याही साहेबात पाहिलेले नाही. साहेबाला ऊन लागू नये म्हणून साहेबांवर छत्री धरली होती. तरी साहेबाला घाम आलेला होता. हातरुमालाने ते चेहरा वारंवार पुसत होते. साहेबांची स्वारी एकदा शाळेत दाखल झाली. शाळेत साहेब येईपर्यंत आमच्या वर्गशिक्षकांनी आम्हाला वेगवेगळ्या सूचना दिल्या होत्या. हुशार मुलांना एकत्र न बसवता प्रत्येक बेंचवर बसवले होते. आमच्या छातीचा भाता भलताच हालत होतं. साहेब म्हणजे लई मोठे. ते कोठे राहत असतील? काय खात असतील? ते आपल्या गुरुजी पेक्षाही लई मोठे असतील? ते लई हुशार असतील? ते काय काय विचारतील? असे अनेक प्रश्नांची एक झालरच मनात लटकत होती. खरचं साहेबाचं रुबाब काही औरचं होतं. ते आमच्या गुरुजी पेक्षा म्हातारे दिसत होते. चेहऱ्यावर तेज होतं. चमकदार डोळे होते. साहेब आमच्या वर्गात आले. सुरुवातीला गुरुजीलाचा कायीबायी विचारले. फळ्याकडे पाहिले. त्यावर लिहिले वाचले. काहीतरी त्यांच्या कागदावर टिपून घेतले.
आता साहेबांचा मोर्चा आमच्या कडे वळला. साहेबांनी प्रश्न विचारले की सर्व बेंचवरची मुले हातवर करत होती. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होती. साहेबांनी शेवटचा प्रश्न विचारला. तुमच्या मोठ्या गुरुजीचे नाव काय? सर्वच मुलांनी हातवर केलं व एकाच सुरात उत्तर दिलोत “चव्हाण गुरुजी…..” साहेब म्हणाले ” सामुहिक उत्तर नको. कोणीतरी एकानेच उत्तर द्या. मी मोठ्या गुरुजीचं नाव विचारलोय म्हणजे गुरुजीचं पूर्ण नाव सांगा.” आता मात्र कोणाचेच हात वर गेले नाही. मला गुरुजीचं नाव माहित होतं. मी हात वर केलो. साहेब म्हणाले “सांग”, मी उत्तर दिलो, “नामदेव सोमसिंग चव्हाण”. साहेब माझ्याकडे थोडं वेगळ्या नजरेने पाहिले व म्हणाले, “छान, पण मोठ्या माणसांचे नाव घेताना नावासमोर “राव” लावावं बरं का. मी हो साहेब म्हणालो व पुन्हा उत्तर दिलो, “नामदेवराव सोमसिंगराव चव्हाणराव” या उत्तरावर साहेबांची थोडीशी धांदल उडाली. ते खळखळून हसले. अखा वर्गही हास्यात बुडाला. मी मात्र गोंधळून गेलो. कावऱ्या बावऱ्या नजरेने कधी वर्गातील मुलांकडे कधी तर कधी गुरुजी कडे तर कधी साहेबांकडे पाहात थांबलो. तेवढ्यात साहेब म्हणाले, “बाळा आडनावाला “राव” लावत नसतात”. पण त्यावेळी माझ्या बाल मनाला (आजच्या मुलांप्रमाणे त्यावेळची मुले हुशार नव्हती) वाटलं होतं मोठ्या माणसाच्या पूर्ण नावा समोर “राव” लावावेच लागते.
आजचे नाजर का नादर का शिक्षण विस्तार अधिकारी शाळेत कधी जातात व कधी येतात याचा पत्ताही लागत नाही. पूर्वी सारखं या पदाला महत्व उरलं नाही. याच एक कारण असे ही असू शकेल…… पूर्वी या पदाची संख्या कमी होती. आता पदाची संख्या वाढली. तपासणी संख्या वाढली. भेटीची संख्या वाढली म्हणून पूर्वीचं रुबाब आज राहीलं नसेल. अति परिचयात……
राठोड मोतीराम रुपसिंग
“गोमती सावली” काळेश्वरनगर, विष्णुपूरी, नांदेड -६
९९२२६५२४०७