नांदेड, दि. ६ सप्टेंबर:
नांदेड येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या नियोजित विविध विकासकामांच्या बांधकामासाठी राज्य शासनाने ७ कोटी ८२ लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवेला बळकटी मिळणार आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील अनेक विकासकामांचा पाठपुरावा करून या कामांच्या बांधकामासाठी निधीची तरतूद करून घेतली होती. त्यानुसार सदरहू निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीतून महाविद्यालयाची इमारत, संलग्नित रूग्णालय, वसतीगृह आदींसाठी बांधकाम केले जाणार आहे.
राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेल्या निधीमध्ये महाविद्यालयाशी संलग्नित रूग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील रूग्णांच्या वॉर्डासाठी १ कोटी ९७ लाख रूपये, महाविद्यालयाच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी १ कोटी ९७ लाख रूपये, पदव्युत्तर मुलांच्या वसतिगृहाच्या पहिल्या मजल्याच्या बांधकामासाठी १ कोटी ८० लाख रूपये, महाविद्यालयाच्या इमारतीची दुरूस्ती व नुतनीकरणासाठी १ कोटी ३१ लाख रूपये, अधिष्ठाता व निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी ६५ लाख ६७ हजार रूपये, महाविद्यालयाच्या मागील बाजुच्या आवारातील भिंतीच्या बांधकामासाठी ५ लाख ५२ हजार रूपये, पदव्युत्तर विद्यार्थांसाठीच्या वसतीगृहाच्या आवार भिंतीच्या बांधकामासाठी ५ लाख ४२ हजार रूपये आदींचा समावेश आहे.