कंधार : प्रतिनिधी
पत्रकारांनी माझा सन्मान करुन जी कौतुकाची थाप दिली, ती माझी खरी उर्जा असून यामुळे मी पुढे अधिक जोमाने काम करीन असे प्रतिपादन श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा माजी जि.प.सदस्य प्रा.डॉ.पुरुषोत्तम धोंडगे यांनी केले.
गेल्या १२८ दिवसांपासून अविरत "भाऊचा डब्बा " नावाने कंधार व लोहा येथील कोविड सेंटर व ग्रामीण रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पौष्टिक जेवण पुरवल्या जात आहे.आणि ते अविरतपणे चालु आहे. कंधार, लोहा येथील कोवीडच्या काळात ज्या कुटुंबाचे पालकत्व हिरावले आहे, अशा कुटुंबातील एक हजार पाल्यांच्या शिक्षणाची जबाबदारी संस्थेच्या वतीने प्रा.डॉ.पुरुषोत्तम धोंडगे यांनी घेतली आहे.
त्यांच्या या कार्याची दखल घेत कंधार तालुका पत्रकार संघाच्या वतीने, शाल, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, पुष्पहार व सन्मानपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.यावेळी बोलताना ते म्हणाले, आतापर्यंत माझा अनेकदा सत्कार झाला पण पत्रकारांच्या वतीने पहिल्यांदाच सत्कार होत असून ही कौतुकाची थाप मला कायम उर्जा देणारी ठरेल.
यावेळी ते काही क्षण भाऊक झाले होते.ते पुढे म्हणाले,आपले सामाजिक दायित्व ओळखून आम्ही संस्थेच्या वतीने हा उपक्रम चालू केला असला तरी याकामी आम्हाला अनेकांनी भरभरुन सहकार्य केले आहे. ज्या कोविड काळात कोणी एकमेकांजवळ यायला तयार नव्हते, त्यावेळी अनेकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवून काम केले आहे.त्यामुळे मी एकटा या सन्मानाचा धनी नसून यात काम करणारे सर्वजण हक्कदार आहेत.माझे वडील माजी खासदार व आमदार भाई डॉ.केशवराव धोंडगे यांनी त्यांच्या काळात सतत गोरगरीबांची सेवा केली आणि आजही ते आम्हाला सतत वाडी - तांड्यावरील लोकांच्या सेवेसाठी प्रेरीत करतात.
तसेच माजी आ.भाई गुरुनाथराव कुरुडे यांचेही आम्हाला वारंवार वडिलांसारखे मार्गदर्शन लाभते. यापुढेही कोणत्याही सामाजिक कामांसाठी पत्रकारांनी ही आम्हाला सूचना करावी.आम्ही त्याचे निश्चित पालन करु अशी ग्वाही दिली.
यावेळी पत्रकार डॉ.दिनकर जायभाये,डॉ. प्रा.गंगाधर तोगरे, जमीर बेग, संघपाल वाघमारे, प्रा. सुभाष वाघमारे, मुरलीधर थोटे, एस.पी.केंद्रे, सय्यद हबिब, ए.एल.सरवरी, नितीन मोरे,अदिसह उपस्थित होते.