नांदेडला ‘समृद्धी’शी जोडणाऱ्या महामार्गासाठी शासन निर्णय जारी

नांदेडला ‘समृद्धी’शी जोडणाऱ्या महामार्गासाठी शासन निर्णय जारी

मुंबई, दि.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाशी नांदेड शहराला जोडण्यासाठी जालनापासून नांदेडपर्यंत द्रुतगती महामार्ग उभारण्याच्या प्रस्तावावर शासन निर्णयाचीही मोहर लागली असून, यामुळे या प्रकल्पाच्या उभारणीला आता अधिक गती प्राप्त होणार आहे.

मुंबई व नागपूरला जोडणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना या दोन जिल्ह्यातून जात आहे. या महामार्गाशी मराठवाड्यातील नांदेड, परभणी व हिंगोली हे जिल्हे देखील जोडले जावेत, या हेतूने सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी जालना ते नांदेड द्रुतगती महामार्गाची संकल्पना मांडली होती. मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने २५ ऑगस्ट रोजी याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली व सोमवारी रात्री यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला.

सार्वजनिक बांधकाम विभागाने काढलेल्या या शासन निर्णयानुसार सदर प्रकल्पासाठी ड्रोन व लिडार सर्वेक्षण करणे, तांत्रिक-अभियांत्रिकी व वित्तीय सुसाध्यतासह सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती करणे, प्रकल्पाची आखणी अंतिम करून भूसंपादन व त्यासाठी अंदाजपत्रकीय तरतूद करून निधी उपलब्ध करून देणे आदी बाबींसाठी मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत या महामार्गाची उभारणी होणार असून, हा प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर नांदेडसह परभणी व हिंगोलीपासून मुंबई तसेच औरंगाबाद पर्यंतच्या प्रवासाच्या कालावधीत मोठी घट होणार आहे. त्याचप्रमाणे बीड व जालना जिल्ह्यातील वाहतुकीलाही त्याचा लाभ मिळेल.

सध्याच्या महामार्गाने जालना ते नांदेड हे अंतर सुमारे २२६ किलोमीटर असून, हे अंतर कापायला साधारणतः ५ तासांचा अवधी लागतो. मात्र, नवीन महामार्गाने नांदेड पासून जालनापर्यंतचे अंतर केवळ २ ते सव्वा दोन तासात पूर्ण करता येईल. या प्रकल्पांतर्गत नांदेड शहरातील हिंगोली गेट – बाफना चौक – देगलूर नाका ते छत्रपती चौक, धनेगाव जंक्शन रस्त्याची सुधारणा, उड्डाण पूल आणि गोदावरी नदीवरील पुलाचेही बांधकाम होणार आहे.

संकल्पना पूर्ततेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊलः अशोक चव्हाण

समृद्धी महामार्गाला जोडणारा जालना-नांदेड द्रुतगती महामार्ग उभारावा, ही संकल्पना मी मांडली होती व काल निघालेला शासन निर्णय हा त्या संकल्पनेच्या पूर्ततेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संकल्पनेला पहिल्या दिवसापासून संपूर्ण सहकार्य केले. त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा आभारी आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, जालना या पाचही जिल्ह्यातील प्रवासी, शेतकरी व उद्योजकांना मोठा फायदा होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *