जिल्हा प्रशासनाला सतर्कतेची सूचना: अशोक चव्हाण

नांदेड, दि. ७ सप्टेंबर २०२१:

संततधार पावसाने नांदेड जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, मी सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात आहे. संकटात फसलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी महसूल, आरोग्य, वीज, सार्वजनिक बांधकाम, पोलीस आदी विभागांसह संपूर्ण जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

नांदेड जिल्ह्यात सोमवार सायंकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, संततधार पावसामुळे नदी, नाले तुडूंब भरून वाहत असून, अनेक तालुक्यांमध्ये पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी शेतीत व लोकवस्तीत पाणी घुसल्याची माहिती मिळते आहे. पुरामुळे नागरिक अडकून पडल्याच्याही घटना समोर येत आहेत. रस्ते खचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. प्रामुख्याने गोदावरीच्या काठावरील गावांमध्ये परिस्थिती गंभीर आहे. संततधार पाऊस आणि येवा वाढल्याने विष्णुपुरी प्रकल्पाचे ११ दरवाजे उघडण्यात आले आहेत. या पार्श्वभूमिवर संकटग्रस्तांना तातडीने मदत करण्यासाठी कृतीदल स्थापन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

संकटात फसलेल्या नागरिकांना मदत करण्याला पहिले प्राधान्य आहे. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर व पाणी ओसल्यानंतर जिल्ह्यातील नुकसानाचे नेमके चित्र स्पष्ट होईल, असेही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती आणखी काही तास अशीच राहणार असल्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *