फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
कंधार तालुक्यातील फुलवळ येथे वर्ग श्रेणी १ चा पशुवैद्यकीय दवाखाना असून या दवाखान्याअंतर्गत फुलवळ सह एकूण १० गावांना पशु वैद्यकीय सेवा पुरवली जाते खरे परंतु जुलै २०१९ पासून येथील पशुवैद्यकीय अधिकारी पद हे रिक्तच असल्याने पशु व पशुपालक वैद्यकीय सेवेअभावी पार वैतागले होते , पशुपालकांनी वरिष्ठांना निवेदन ही अनेकवेळा दिले. तेंव्हा नुकतेच येथील पशुवैद्यकीय अधिकारी रिक्त पदासाठी तब्बल २६ महिन्यानंतर डॉ. दिनेश रामपुरे यांचा रुजू आदेश आल्याचे सांगण्यात आले असून एक दोन दवसात ते फुलवळ येथे रुजू होणार आहेत , त्यामुळे आपल्या पाठपुराव्याला यश आले असून आता येथे पूर्णवेळ पशुवैद्यकीय अधिकारी मिळाले असल्याने गावकरी व पशुपालक यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
फुलवळ येथे श्रेणी १ चा पशु वैद्यकीय दवाखाना असूनही येथे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी नसल्याने हा दवाखाना असून वळंबा अन नसून खोळंबा असेच म्हणण्याची वेळ आली होती. कारण या दवाखान्या अंतर्गत फुलवळ सह कंधारेवाडी , बिजेवाडी , जंगमवाडी , मुंडेवाडी , वाखरड , वाखरडवाडी , सोमासवाडी , महादेव तांडा , केवळा नाईक तांडा आदी गावातील पशूंना वैद्यकीय सेवा देणे बंधनकारक आहे , परंतु गेल्या २६ महिन्यापासून येथील येथील पट्टी बंधक व्ही एस गुट्टे यांच्यावरच येथील सेवेचा भार होता , तो त्यांनी कसरतीने संभाळलाही आणि सेवाही पुरवली.
पण जुलै २०१९ ला येथील तत्कालीन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एस पी उदगीरे यांची येथून बदली झाली आणि तेंव्हापासून येथील पशुवैद्यकीय अधिकारी पद हे रिक्तच होते , सदर पद तात्काळ भरावे यासाठी अनेकवेळा ग्रामस्थ व पशुपालकांच्या वतीने संबंधित वरिष्ठांना लेखी निवेदन ही देण्यात आले होते . एवढेच नाही तर तसे येथे नियमाने तीन कर्मचारी पदे मंजूर आहेत . त्यात एक पशुवैद्यकीय अधिकारी , दुसरा पट्टी बंधक आणि तिसरे सेवक . तरीपण या सर्व पदांचा भार एकट्या पट्टी बंधकने सांभाळला , आता नवीन पशुवैद्यकीय अधिकारी तर मिळाले परंतु येथील सेवकाचे पद अजूनही किती दिवस असेच रिक्त राहणार याबद्दल शंकाच आहे.