विलोभनीय भावमुद्रा असलेल्या ५०० दुर्मिळ गणेशमूर्तीचे धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या निवासस्थानी गणेशभक्तासाठी भरवले प्रदर्शन

नांदेड ; प्रतिनिधी

प्रथम पूजनीय असलेल्या गणेशाची विविध कलाकारांनी अतिशय वैविध्यपूर्ण साकारले असून कलाकारांच्या प्रतिभेला गणरायांनी नेहमीच वैविध्यतेचे खाद्य पुरवले आहे. सायकल रिक्षात बसलेल्या ” , , ते लॅपटॉप चालवणा-या आधुनिक रूपातील
गणपतीपर्यंत या एकट्या देवतेची सुमारे 500 हून जास्त भावमुद्राची विविध आकर्षक रूपे पाहावयाची असल्यास नांदेड शहरातील कट्टर गणेशभक्त धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या निवासस्थानी गणेशभक्तांनी आणि कलाप्रेमींनी आवर्जून भेट द्यावी.अनेक विलोभनीय भावमुद्रा असलेल्या दुर्मिळ गणेशमूर्ती आपल्या डोळ्यांचे पारणे नक्कीच फेडतील.

आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे गणराय. प्रत्येक घरात अतिशय भक्तिभावाने पूजले जाणारे दैवत म्हणजे गणराय. आपल्या भारतीय संस्कृतीत कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात होते तीच मुळी गणेश पूजनाने.
समाजसेवेचा अविरत वसा घेतलेल्या दिलीप ठाकूर यांच्याकडील गणेशाच्या विविध मूर्तींचा हा संग्रह गेल्या तीन दशकांचा आकर्षक मूर्तींचा येथे खजिनाच आहे. दोन गणेश मूर्तींपासून सुरू झालेला हा भक्तिमय प्रवास आज पाचशेपेक्षा जास्त मूर्तीपर्यंत पोहोचला आहे.
गेल्या 32 वर्षांत त्यांनी देश-विदेशांतून वैशिष्ट्यपूर्ण अशा गणेशमूर्ती गोळा केल्या आहेत. आपल्या या वैविध्यपूर्ण ठेव्याची लोकांना माहिती व्हावी आणि त्या विविध भावमुद्रा असलेल्या गणपती बाप्पांचे गणेशोत्सव काळात दर्शन व्हावे यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.


श्रद्धा व भक्तीचा अपूर्व संगम या निमित्तम्हणाला आहे . पावित्र्य आणि प्रेरणा देणारा हा अप्रतिम खजिना दिलीपभाऊंनी जपला आहे. गणेशमूर्ती जमवण्याचा ध्यास घेतल्यानंतर भारतातील विविध गावे, दुकाने, प्रदर्शनातून त्यांनी गणेशाच्या मूर्तींचे संकलन सुरु केले. मूर्तींची निवड करताना कटाक्षाने वेगळेपणा आणि सर्वसाधारणपणे आपल्या पाहण्यात नसलेल्या मूर्तींचा संग्रह करण्यास त्यांनी प्राधान्य दिले.या दुर्मिळ मूर्ती संकलनकामी त्यांना कुटुंबीयांची खूप मोठी मदत झाली आहे.


दिलीप ठाकूर यांचा पर्यटन हा व्यवसाय असल्यामुळे त्यांनी देश-विदेशातील अनेक ठिकाणांहून मूर्ती आणलेल्या आहेत. या संग्रहातील गणेशमूर्तींचे म्हणजे संग्रहातील कोणतीच मूर्ती एकसारखी नाही. प्रत्येक मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळी असावी
यावर कटाक्षाने त्यांनी लक्ष दिले आहे.
दगड, टेराकोटा, तांबे, पितळ, फायबर, शिसम, संगमरवर, व्हाइट मेटल, काच ,मिश्रधातू, गनमेटल, बोनचायना, चांदी, चंदनाचे लाकूड, ब्राँझधातू
श्रीफळ, सुपारी, लाकूड, दोरी,अशा विविध वस्तूंचा वापर करत गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या आहेत.
नटराज गणेश, वाद्यवृंदरूपी, रुद्राक्षरूपी,
भगवान विष्णू रूपातील गणेश, कृष्णरूपी, हनुमानरूपी, नारदरूपी, भगवान शंकररूपी, मुषकारूढ, अन्य वाहनांवरील गणेश, रथारूढ शेषारूढ, रामरूप, बटूवेशातील गणराय अशा विविध मुद्रा व वेगवेगळ्या प्रकारातील “वक्रतुंड” मनाला सहज भावतात. काही मूर्त्या तर त्यांनी वर्णनानुसार खास कलाकारांकडून तयार करवून घेतल्या आहेत.


घरातील आगळावेगळा हा गणेश दरबार त्यांनी अगदी व्यवस्थितरीत्या जपून ठेवला आहे. अनेकांना संग्रहाची माहिती असल्याने नागरिक आणि नातेवाईक पाहण्यासाठी नित्य येत असतात. दिलीपभाऊंनी जोपासलेल्या या गणेशमूर्तींचे वैशिष्ट्य समाजाला कळावे यासाठी त्यांनी या आगळ्यावेगळ्या संग्रहाचे प्रदर्शन सुरू केले आहे . आतापर्यंत त्यांनी सात वेळा अशा प्रदर्शनांचे यशस्वी आयोजन केले आहे.कलेची सामाजिक दृष्टी असलेल्या दिलीपभाऊंनी कलेचे आणि कलाकारांचेही अनेक प्रकारे संवर्धन केले आहे. गणेशमूर्तींचे हे संग्रहालय म्हणजे दिलीपभाऊंमधील कलात्मकतेचे आणि भक्तीचे अप्रतिम दर्शन आहे. गणेशमूर्तींच्या या संग्रहातील उभा, आडवा, बसलेला, नृत्य करणारा असे अनेक गणेश आपले मन मोहून घेतात. याशिवाय काही दुर्मिळ प्राचीन नाण्यांमधील बाप्पांच्या विलोभनीय वैविध्यपूर्ण भावमुद्राही मंत्रमुग्ध करतात. चौदा विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असलेल्या विघ्नहर्त्या गणेशाची महती केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात आहे. जगभरात गणरायाचे भक्त आणि त्याची स्थाने आढळतात. विघ्नहर्त्या गणरायाच्या कीर्तीचा महिमा अगाध आहे. त्याचे दर्शन ठिकठिकाणच्या मूर्तींच्या आकारातून प्रकट होते.स्फटिक , पोवळे ,नीलमणी, हिरवे मीनावर्क डिझाइन, दशावतारी, तुळशी वृंदावन, फुलदाण्या, काळया उभ्या दगडाचा मोठा गणपती, ,उंदरावर उभा अष्टभूज, हस्तिदंतातून कोरलेला, चंदनातील उभा, चारही दिशांना तोंड असलेला छत्रीधारी, मंदारवृक्षाच्या मुळाचा , सुपारीवर कोरलेला, उभा राहून नृत्य करणारा,  बासरीवादक, डफवादक, पाय पसरून रुसून बसलेला, शेषशायी नागारूढ, वीणावादक,कालियामर्दन, दुतोंडी नेपाळी नाचाच्या वेशात , एकाच पायावर नाचणारा, मडक्यावरील गणपती,  वाजंत्रीवाला, तीन तोंडाचा, भरतनाट्यममुद्रा, विविध वाद्य वाजवणारे गणपती, सुटाबुटातील गणपती, मोबाईल धारक गणपती,  लॅपटॉप चालणारा गणपती, फोन करणारा गणपती, घसरगुंडी खेळणारा गणपती, लहान   उंदीराला पायावर घेऊन झोके देणारा गणपती, बाहुल्यांचा गणपती, धान्या पासून बनवलेला गणपती, रुचकीच्या झाडापासून बनविलेला गणपती, बसलेला गणपती, उभा असलेला गणपती, झोपलेला गणपती, गल्ल्यावर  बसलेला गणपती, दो-यापासून बनवलेला गणपती, गणेश मुखी दुर्मिळ रुद्राक्ष, नारळात कोरलेला गणपती असे अनेक गणपती यात आहेत. दिलीपभाऊंच्या संग्रहातील ही अफाट विविधता डोळे दिपवणारी आहे.
नेपाळ ,चीन, जपान, इंडोनेशिया, मलेशिया, कंबोडिया, आफ्रिका, श्रीलंका, भूतान, सुदान आणि इतर ठिकाणच्या देखण्या मूर्तीही या संग्रहात आहेत. त्यांनी अनेक मूर्ती त्यांच्या हितचिंतकांना भेटीदाखलही दिल्या आहेत. त्या दिल्या नसत्या, तर हा संग्रह कितीतरी मोठा झाला असता. आपल्या पश्चात या मूर्ती सांभाळल्या जाव्यात अशी दिलीपभाऊंची इच्छा आहे.

आपल्या या आगळ्यावेगळ्या  छंदाबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिलीप ठाकूर यांनी अतिशय हृदयस्पर्शी अशी माहिती दिली. 1989 पर्यंत ठाकूर हे अंधश्रद्धा चळवळीचे श्याम मानव व दाभोळकर यांचे अनुयायी होते.  गणेशोत्सवातील एका प्रसंगाने त्यांचे जीवन बदलून गेले. त्यांच्या आईचे सतत डोके दुखत असल्यामुळे नांदेडच्या डॉक्टरांच्या सल्यानुसार हैदराबाद येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये आईचे डोळे तपासण्यासाठी नेले होते. डोळ्यांची एक चाचणी केल्यानंतर आईला दिसेनासे झाले. त्यावेळी आईसोबत एकटेच असल्याने त्यांना काहीच सुचत नव्हते.  घाबरलेल्या मनःस्थितीत दिलीप ठाकूर यांनी अपोलो हॉस्पिटलमध्ये असलेल्या  गणेशमूर्तीला नवस केला , जर आईला पूर्ववत दिसू लागले तर  एस.टी. महामंडळाच्या गणपती उत्सवासाठी मूर्ती देईन. चमत्कार म्हणा किंवा आणखी काही म्हणा,थोड्याच वेळात आईला पूर्वीसारखे दिसू लागले. तेव्हापासून नास्तिक भाऊंचे कट्टर गणेशभक्तात रूपांतर झाले.या आराध्य देवतेच्या भक्तीपोटी मूर्ती संकलन करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.एक वर्षाचा नवस असतांनाही तब्बल 32 वर्षापासून नांदेडच्या एस.टी.कर्मचारी गणेश मंडळाला ठाकूर हे आवर्जून गणेशमूर्ती देत आहेत. दरवर्षी वेगळी मूर्ती द्यावी या उद्देशाने त्यांनी मूर्तिकाराला दाखवण्यासाठी जमा केलेल्या मुर्त्यांचे आता विशाल  संग्रहात रूपांतर झाले आहे.


सुरुवातीला 51 गणेशमूर्तींचा संग्रह करण्याचा संकल्प त्यांनी केला होता, पण पुढे हा आकडा वाढत गेला. त्यांच्या संग्रहातील एक मूर्ती अष्टविनायकासह अनेक नामवंत मंदिरातील मुख्य मूर्तींना स्पर्श  करून आणलेली आहे. या मूर्ती समोर दिलीपभाऊ दररोज गणपती स्तोत्राचे पठण करून पूजा करतात. सत्य गणपती येथे दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला दिलीप ठाकूर यांच्या संयोजनाखाली 151पदयात्रा संपन्न झाल्या आहेत. नांदेड शहरातील गणेश भक्तांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी गणेशोत्सव काळात गणेशदर्शन स्पर्धेचे आयोजनदेखील करतात.ठाकूर यांची गणेशभक्ती माहीत असल्यामुळे अनेक परिचित त्यांना आढळलेली नाविन्यपूर्ण  मूर्ती आणून देतात. त्यामुळे नेहमी अद्ययावत होत असलेले
हे संग्रहालय गणेशभक्तांनी आणि कलाप्रेमींनीही आवर्जून पाहावे असेच आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *