कंधार -कंधार पंचायत समितीचे माजी सभापती, कलंबर विभाग सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माधवराव पांडागळे यांचे तीव्र ह्दयविकाराने आज दि.16 रोजी निधन झाले. मृत्यू समयी ते 74 वर्षाचे होते. उद्या दि.17 रोजी सकाळी 10 वाजता शिराढोण ता.कंधार येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
कंधार तालुक्यातील शिराढोण गावाला प्रगतीपथावर नेण्यासाठी त्यांनी 1975 साली ग्रामपंचायतच्या निवडणुकीतून सक्रीय राजकारणात प्रवेश केला. अनेक वर्ष शिराढोण ग्रामपंचायतचे ते सरपंच होते. 1992 साली त्यांनी उस्माननगर जिल्हा परिषद सर्कलमधून काँग्रेस पक्षातर्फे निवडणुक लढवून विजयी झाले. त्याच काळात त्यांनी कंधार पंचायत समितीच्या सभापती पदाचा बहुमान मिळविला. माजी केंद्रीय गृहमंत्री डॉ.शंकरराव चव्हाण व पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे ते विश्वासू सहकारी होते. 1995 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातर्फे त्यांनी कंधार विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढविली होती.
कलंबर विभाग सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी कांही काळ काम पाहिले. काँग्रेस कमिटीचे जिल्हाउपाध्यक्ष व कंधार तालुकाध्यक्षपदाची त्यांच्यावर जवाबदारी देण्यात आली होती. डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या सहवासात राजकीय जडणघडण झालेले माधवराव पांडागळे यांची स्वच्छ प्रतिमेचा मनमिळावू नेता म्हणून सर्वत्र ओळख होती. दि. 7 रोजी नांदेड येथे एका खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर एंजोप्लास्टी करण्यात आली होती. तबियतीमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना घरीच विश्रांतीचा सल्ला दिला होता. आज सकाळी 10 वाजता शिराढोण येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांना पुन्हा एकदा ह्दयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, चार मुले, तीन मुली व जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. कंधार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बालाजीराव पांडागळे यांचे ते वडील होते.
त्यांच्या निधनाबद्दल पालकमंत्री अशोकराव चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष आ.अमरनाथ राजुरकर, माजी पालकमंत्री डी.पी.सावंत यांच्यासह अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे. उद्या दि.17 रोजी सकाळी 10 वाजता शिराढोण येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे अशी माहिती पांडागळे कुटूंबियांच्या वतीने देण्यात आली.