मुखेड वार्ताहार- मुखेड तालुक्यातील ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय,वसंतनगर (कोटग्याळ) ता. मुखेड जि. नांदेड, प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने दरवर्षी रांगोळी स्पर्धा घेण्यात येते, या वर्षी ही स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचा वर्धापन दिन व मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधुन ही स्पर्धा अतिशय आनंददायी वातावरणात पार पडली.
प्राचार्य डॉ. हरिदास राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रा. डॉ. महेश पेंटेवार यांच्या संकल्पनेतून वरील ऑनलाइन रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, गोवा व उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, कर्नाटक व आंध्रप्रदेश या राज्यातून एकुण 132 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता.
रांगोळी स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी
हमिंग बर्ड, किंगफिशर बर्ड, वायलेट सेल्फ, मोर, इंडियन पित्ता, राजहंस, घुबड, पोपट, ब्लू फ्लाय कॅचर, माळढोक, लव बर्ड्स इत्यादी पक्षांच्या विविध रंगांचा वापर करून रांगोळी साकारल्या होत्या.
प्रमुख्याने जैवविविधतेत निसर्गातील दृश्य स्वरूपातील सगळ्या घटकांचा समावेश होतो. मानव, पशुपक्षी, वनस्पती इत्यादी.
पक्षी हा घटक जैवविविधते मधील सगळ्यात महत्वाचा घटक समजला जातो. जगभरातील पक्ष्यांच्या प्रजातीचा विचार केला तर जवळपास ५००० प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजाती आहेत. जैवविविधतेमध्ये असलेल्या सगळ्यात मोठी परिसंस्था अबाधित ठेवण्याचे काम हे पक्षी करतात. झाडावर राहणारे पक्षी तसेच पाण्यावर राहणारे पक्षी हे पृथ्वीवरील अन्नसाखळी आणि जैवविविधता संपन्न ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत.
सुतार, धनेश आणि तांबट हे पक्षी विविध वृक्षांची फळे खातात व त्यांच्या विष्टेद्वारे सुलभ बीज आवरण करतात. त्याचा उपयोग हा वनस्पती उगवण्यास तसेच वने वाढण्यासाठी होतो. तसेच सूर्यपक्षी, शिंजीर, फुलते चष्मेवाला हे पक्षी एका फुलावरून दुसऱ्या फुलावर मध प्राषण करीत उडणारे छोटे पक्षी आहेत.
सुतार पक्षी हा तर विविध झाडाला लागलेली वाळवी, झाडाच्या सावलीखाली वाढणारी कीड खातात आणि वृक्षाचे आयुष्य वाढवतात. पाण्यातील जैविक साखळी अबाधित ठेवण्याचे काम हे पाणथळीत चरणारे पक्षी, मासे, खेकडे, शिदोळ हे किटक आणि पक्षी पाण्यातील कीटक खाऊन करतात.
तसेच गिधाड, कावळे, घार इत्यादी पक्षी हे मरून पडलेल्या प्राण्यांचे मांस, त्वचा आणि आतडे असे सर्व अवयव खाऊन परिसर स्वच्छ करतात. उंदीर हा छोटा प्राणी शेतकऱ्यांच्या धान्याचे तीस टक्के नुकसान दरवर्षी करीत असतात.
या उंदरांना मारून खाण्याचे काम हे घुबड आणि गरुडाच्या काही प्रजाती करतात. तसेच गाय बगळे व इतर तत्सम पक्षी पाळीव प्राण्यांसोबत चरतात. हे पक्षी गाय, म्हशी व इतर पाळीव प्राणी जसे की मेंढ्या, बकऱ्या त्यांच्या त्वचेवर आढळणारे कीटक, गोचीड खाण्याचे काम करतात.
जमिनीतील किंवा पाण्यातील कीटकांची संख्या नियंत्रित करण्याचे काम हे फक्त पक्षी करतात. पृथ्वीवरची जंगले ही पक्षाद्वारे पसरलेली आहेत. जंगलातील वनस्पतींची वृक्षांची झुडपांची विविधताही विविध पक्षांच्या बीजारोपण यामुळे शक्य झाले आहे.
या स्पर्धेच्या आयोजनाचा प्रमुख उद्देश हा होता की विद्यार्थी जो विषय शिकतो याबद्दलची जागृकता निर्माण व्हावी व याबरोबरच पक्षांची ओळख त्यांचे महत्त्व व संगोपन कसे करावे याबद्दलची ही जाणीव त्यांच्या मनामध्ये रुजविण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले होते. कारण पक्षी परिसंस्थेमध्ये खूप महत्त्वाचे कार्य करतात. त्यांचे योगदान खूप मोठे असते, परंतु लोकांची धारणा अशी आहे की शेती, फळे, फुले व बगीचा यांची ते नासधूस करतात, परंतु तसे न होता पक्षी हे जैवविविधता परिसंस्था वाढीसाठी खूप महत्त्वाचे कार्य करत असतात.
म्हणूनच उपरोक्त ऑनलाइन रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु. रुपाली संतुकराव कनसटवाड श्री शिवाजी कॉलेज परभणी हिने पटकावला तर द्वितीय क्रमांक शाहीर अण्णाभाऊ साठे महाविद्यालय मुखेड ची विद्यार्थिनी कु. रेणुका उमाकांत मगडवार हिने पटकावला, तर तृतीय क्रमांक शासकिय कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय उत्तर गोव्याची विद्यार्थीनी कु. श्रेया चंद्रकांत गावडे हिने पटकावला.
या स्पर्धेतील गुणवंताना संस्थेचे अध्यक्ष मा.आ.कर्मवीर किशनरावजी राठोड, सचिव प्राचार्य गंगाधररावजी राठोड, मुखेड-कंधार विधानसभेचे लोकप्रिय आमदार डॉ. तुषारजी राठोड, जि.प.सदस्य मा. संतोषजी राठोड, प्राचार्य डॉ. हरिदास राठोड, उपप्राचार्य अरुणकुमार थोरवे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा. बळीराम राठोड व प्रसिद्धी प्रमुख प्रो.डॉ.रामकृष्ण बदने यांनी शुभेच्छा दिल्या.
प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.श्रीनिवास पवार, संयोजक प्रा.डॉ.महेश पेंटेवार, परिक्षक प्रा.डॉ .गुरुनाथ कल्याण , श्री.नागेश सोनकांबळे व श्री.शौकत शेख यांच्या मुळे रांगोळी स्पर्धा यशस्वीपणे पार पडली.