मुखेड -ग्रामीण { कला वाणिज्य व विज्ञान }महाविद्यालय वसंतनगर ता. मुखेड जि. नांदेड येथील माजी प्राचार्य डॉ. रामकृष्ण बदने यांना मातोश्री भागाबाई डोंगरे प्रतिष्ठान बितनाळ ता. उमरी येथील प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘ राज्यस्तरीय माऊली रत्न पुरस्कार 2020’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
प्रा. डॉ.रामकृष्ण बदने यांना यापूर्वी तीसहून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.एक महिन्यापूर्वीच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचा उत्कृष्ट शिक्षक ( ग्रामीण) हा पुरस्कारही जाहीर झाला आहे.
प्रा. डॉ. बदने हे मागील दोन तपासून आई या विषयावर महाराष्ट्रभर सतत व्याख्यानाच्या व लेखनाच्या माध्यमातून प्रबोधन करीत असतात. प्रवचन व कीर्तन यातूनही त्यांनी हा विषय सर्व गाव पातळीपर्यंत पोहोचवला असून अनेक मुलं व आईवडिल यांच्यात प्रबोधनाच्या माध्यमातून सौहार्दाचे वातावरण निर्माण केले आहे.
ते सध्याच्या काळात अत्यंत नाजूक बनलेल्या या विषयावरती सतत लेखन व व्याख्यानाच्या माध्यमातून प्रबोधन करतात.जवळजवळ त्यांनी या एकाच विषयावर महाराष्ट्रभर 1000 पेक्षा अधिक व्याख्याने दिली असून या विषयावर विपुल लेखन विविध वृत्तपत्रांतुन व ग्रंथांतून केले आहे. तसेच या विषयावरील त्यांचा एक ग्रंथ ही प्रकाशनाच्या मार्गावर आहे.
त्यांचे या क्षेत्रातील भरीव कार्य पाहून मातोश्री भागाबाई विठ्ठलराव डोंगरे प्रतिष्ठानने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. हा पुरस्कार नुकताच त्यांना तैवानचे भंते श्रद्धा रख्खिता यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य जाधव ए.एस. हे होते तर उद्घाटक म्हणून सायलू म्हेसेकर, स्वागताध्यक्ष नगरसेवक ईश्वर सवई, नगरसेवक सोनू वाघमारे, सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्य महासचिव पांडुरंग कोकुलवार, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक बी.एस.सरोदे,सा.ना.भालेराव,भारतीय बौद्ध महासभेचे उमरी तालुका अध्यक्ष भीमराव वाघमारे,
साहित्यिक व समीक्षक गंगाधर ढवळे,प्रोफे.डॉ गंगाधर तोगरे, दत्ताहरी कदम, प्रतिष्ठानचे सचिव नागोराव डोंगरे, बितनाळचे सरपंच मारुती वाघमारे, उपसरपंच देविदास अक्कलवाड, चेअरमन मारुती उमाटे, पोलीस पाटील संतराम डोंगरे, श्रावण तुरेराव,बारकाजी डोंगरे, साहेबराव तुरेराव,कवी एन.सी.भंडारे, आदी मान्यवर उपस्थित होते.
हा पुरस्कार स्वीकारताना प्रा. डॉ. रामकृष्ण बदने म्हणाले की माझ्या आईने माझ्यावर केलेल्या संस्काराचा हा परिपाक आहे. तिने खाल्लेल्या खस्ता पाहुन शिक्षणाशिवाय आपला उध्दार नाही हे आम्हाला कळाले व शिक्षणाची दिशा मिळाली. त्यामुळे या पुरस्कारावर माझ्यापेक्षा माझ्या आईचाच अधिक अधिकार असल्यामुळे मी तिच्या सोबत येऊन हा पुरस्कार स्वीकारतो आहे.
आज या पुरस्कारासाठी माझी आई उपस्थित झाल्यामुळे मला गगनात मावेनासा आनंद होतो आहे.
त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.