भावनाविवश होऊन तुझ्यापुढे
भावनांचा कल्लोळ केला,
न जाणता असा कोणता मी गुन्हा केला…
तशी वेळ यायला नको होती ती
पण, तरीही
तोच अपराध मी पुन्हा पुन्हा केला…
आयुष्याने बांधलेली दुहेरी खूणगाठ सोडवणं तेवढं सोपं नसतं.
“गिव्ह अँड टेक” ह्याच तत्वावर प्रत्येकाचे जीवन
आधारित असते. तुम्ही एखाद्या भावनीक गोष्टीची किती किंमत मोजता त्यावर तुमच्या सुखाचा आणि दुःखाचाही दर्जा ठरवला जातो. इथे प्रत्येक भावनिक गोष्टीची अशी एक किंमत आधीच ठरलेली आहे. कधी ती आपण स्वखुशीने मोजतो तर कधी मनाविरुद्ध आपल्याला ती मोजून फेडावी लागते …. इथे “मोफत” असं काहीच नसतं.
जिथं किंमत मोजावी लागेल तिथे मात्र
भावनाशुन्य होऊनच जगावं लागतं
भावनिक दुष्टचक्रात अडकल्यानंतर त्यातून सुटका सहसा होत नाही. मग हेच आपलं प्राक्तन म्हणत इथेच आयुष्याची संध्याकाळ व्यतीत करावी लागते. भावनिक रित्या गुंतलेल्या
ह्या लौकिक जगाचा मोह इतका असतो की गोष्टींची व्यर्थता लक्षात येऊनही ह्या मायेतून सुटावं असं मात्र वाटत नाही.
जे सगळ्यांना मिळतं ते मलाही मिळायला हवं
ह्या सार्वजनिक सुखात आपण स्वतःला सुरक्षित समजू लागतो. ह्या भुरळ पाडणाऱ्या गोष्टी मुळे आपण खऱ्या सुखापासून वंचित होतं राहतो.. आणि मग त्याची खूप मोठी किंमत आपल्याला मोजली लागती ह्याची जाणीव अंतिम काही श्वास उरले असताना होते.
ज्याच्यासाठी आलो होतो त्या दिशेने एकाही श्वासाचा प्रवास न करता आपण निघून जातोय हे लक्षात येत पण वेळ निघून गेलेली असते . ह्या भावनिक मायेची मगरमिठी इतकी घट्ट की हे अर्थशून्य धुकं डोळ्यासमोरून कधी दूर सारलं जातच नाही…
त्यामुळे भावनिक सुखापासून स्वतःला वंचित ठेवून काही निर्भिड पावलं उचलावीत…मग काय
कुणाला कशात सुख लाभेल हे आपण सांगू शकत नाही म्हणूनच एखाद्या गोष्टीसाठी मोजलेली किंमत आपण ठरवू शकत नाही. आपल्या दृष्टिकोनातून मौल्यवान असलेली गोष्ट साधू संतांच्या दृष्टीने मात्र मातीमोलाची असू शकते …….
खरंय ना..!
सौ.रूचिरा बेटकर, नांदेड
9970774211