मुखेड: शिक्षण म्हणजे अविरत चालणारी प्रक्रिया आहे.माझी मुखेड पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी पदावर नियुक्ती झाली असली तरी गट शिक्षण अधिकारी हा तालुक्याचा पहिला शिक्षक असतो हे मी कदापि विसरणार नाही,असे प्रतिपादन नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी व्यंकट माकणे यांनी केले.
उपक्रमशील शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकट माकणे यांना मुखेड पंचायत समितीचा नुकतीच गट शिक्षणाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली त्यानंतर मुखेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष एड. संदीप कामशेटे, सचिव मेहताब शेख, ज्येष्ठ पत्रकार दादाराव आगलावे, सुशिल पत्की, राजेश बंडे, एड. आशिष कुलकर्णी,शिवकांत मठपती, दत्तात्रय कांबळे, भास्कर पवार यांची उपस्थिती होती. माकणे सर पुढे म्हणाले की, मी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रारंभी शिक्षक म्हणून रुजू झालो.
एक शिक्षकी शाळेत मी अनेक वर्षे काम केले. मी घड्याळाकडे पाहून कधीही काम केलेलं नाही सकाळी आठ वाजता शाळेत जाऊन सायंकाळी आठ वाजता घरी यायचा. माझ्या हातून अनेक अधिकारी,संस्थाचालक झालेले आहेत. सायंकाळी विद्यार्थ्यांना माझ्या घरी बोलावून त्यांचा अभ्यास घेत असत व सकाळी अभ्यासाला उठवत असत. गरिबीची जाण असल्यामुळे मी शैक्षणिक बाबीकडे कटाक्षाने लक्ष दिलेला आहे.माझा कार्यकाल अत्यंत कमी जरी असला तरी माझ्या कार्यकाळात पारदर्शकता ठेवण्याचा मी आटोकाट प्रयत्न करणार असून यासाठी मला तुम्हा पत्रकार बांधवाच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार दादाराव आगलावे म्हणाले की, व्यंकट माकणे सरांचा विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून नावलौकिक राहिलेला आहे.
कुठल्याही पुरस्कारापासून व प्रसिद्धी पासून ते अलिप्त राहिलेले आहेत. मुळातच त्यांना प्रशिद्धीची बिलकुल हाव नव्हती. त्यांनी आपल्या कार्यकालात अधिकारी म्हणून कोणावरही अन्याय केलेला नसून अत्यंत हशी-खेळीच्या वातावरणात त्यांनी शिक्षकाकडून काम करून घेतण्यात ते तरबेज आहेत. यापुढेही ते सर्वांना समजून घेऊनच काम करतील यात दुमत नाही.
पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप कामशेटे म्हणाले की, माकणे सरांचा कार्यकाल जरी कमी असला तरी त्यांच्या हातून अनेक उत्तम शैक्षणिक कार्य होतील असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षण क्षेत्रातील अनेकांची उपस्थिती होती.