परीक्षेला काय हवे हे विद्यार्थ्यांनी समजून घेणे आवश्यक – सुमित कुमार धोत्रे……▪️स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना यूपीएससी उत्तीर्ण सुमितकुमार याचा सल्ला

नांदेड :- कोणत्याही स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एका बाजूला आत्मविश्वास तर दुसऱ्या बाजुला वाढत्या स्पर्धेमुळे येणारा ताण हा गृहित धरावाच लागतो. स्पर्धा परीक्षा देण्याअगोदर यातून निर्माण होणाऱ्या ताण-तणावांना बाजुला सारून ही स्पर्धा परीक्षा विद्यार्थी म्हणून आपल्याकडून काय अपेक्षित करीत आहे हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. अभ्यासाला शिस्त, मानसिक स्थैर्य, अभ्यासा व्यतिरिक्त इतर बाबींचा त्याग आणि विषयांची खोली समजून घेणे हा स्पर्धा परीक्षेतील यशाचा खरा मार्ग असल्याच्या भावना सुमितकुमार धोत्रे यांनी व्यक्त केल्या.

नांदेड येथील पत्रकार दत्ताहरी धोत्रे यांचा मुलगा सुमितकुमार याने नुकत्याच झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले. या यशाबद्दल जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने त्याचे अभिनंदन करुन बोलते केले तेंव्हा सुमितकुमार याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही मार्गदर्शक बाबी सांगितल्या.

कोविड-19 पूर्वीच्या स्पर्धा परीक्षा आणि दिड वर्षे संपल्यानंतर आताच्या परीक्षा यात कमालीचे अंतर पडले आहे. सोशल मिडिया व डिजिटल शिक्षण प्रणालीमुळे केंद्रीय लोकसेवा आयोग व इतर स्पर्धा परीक्षांकडे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. पूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगासाठी जिथे 6 लाखापर्यंत विद्यार्थ्यांची संख्या होती ती आता 11 लाखाच्या पुढे येऊन ठेपली आहे. ऑनलाईन शिक्षणाची माध्यम वाढली आहेत. मुलांना त्यांच्या गावी यामुळे कोणत्याही महानगरातील क्लासचे शिक्षण घेणे सोपे झाले आहे. यातून मुलांना आत्मविश्वास वाढवत आपण देत असलेल्या परीक्षेची व विषयांची खोली व व्याप्ती लक्षात घेतली पाहिजे. ही परीक्षा सलग एक वर्षे चालणारी आहे. यात पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत असे टप्पे आहेत. प्रत्येक टप्प्यावर आपला कस लागतो. यातून जिद्यीने सावरत नैराश्याला दूर ठेवले पाहिजे, असे सुमितकुमार यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांकडून आता अपेक्षा बदल्या आहेत. घोकमपट्टी याला फारसा वाव राहिला नाही. विषयाचे मूळ आकलन विद्यार्थ्यांना आहे की नाही यावर आता अधिक भर आहे. त्यामुळे निवडलेल्या विषयांचा अभ्यास करतांना केवळ प्रश्नोत्तरांकडे लक्ष न देता हा विषय नेमके काय सांगत आहे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यातूनच एक-एक गुण आपल्या साध्य करता येईल. 2 हजार 25 गुण असलेली ही परीक्षा अशा एक-एक गुणांपासूनच विद्यार्थ्यांना यशापर्यंत घेऊन जाते. स्पर्धा परीक्षा म्हणून असलेले ओझे, दडपण बाजुला ठेऊन अभ्यास केला की गुण संपादनाच्या जवळ जाता येते. विद्यार्थ्यांनी अभ्यासाची व्याप्ती बहुज्ञान शाखेसमवेत वाढवत परीपूर्ण दृष्टिकोनातून ठेवली पाहिजे. याचबरोबर महत्वाचे म्हणजे नैराश्याला झटकून सहनशीलतेचे बळ अंगी बाळगणे आवश्यक असल्याचा सल्ला सुमितकुमार धोत्रे यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *