अहमदपूर ( प्रतिनिधी प्रा,भगवान आमलापुरे )
व्यसन का लागते ? हा प्रश्न उपस्थित करून, सुखद संवेदनेमुळं व्यसन लागते. तर महात्मा गौतम बुद्धाच्या ध्यानमार्गाने दुखद संवेदनेपासून मुक्ती मिळवता येते. व्यसनावर विजय मिळवता येतो. असे प्रतिपादन ग्रामीण रूग्णालय अहमदपूर येथील डॉ मधुसूदन चेरेकर यांनी केले.
येथील कराड नगर स्थित राजर्षी शाहू महाराज सेवाभावी संस्थेतर्फे राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दि ०२ ते ०९ आक्टो २१ दरम्यान स्वच्छता आणि व्यसनमुक्ती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून डॉ चेरेकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ गांधीवादी विचारवंत मच्छिंद्र गोजमे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त विस्तार अधिकारी एन डी राठोड सर आणि अण्णाराव सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे एन डी राठोड यांनी स्वच्छता अभियानाचा इतिहास सांगितला. संत गाडगेबाबा आणि आर. आर आबांचे ऋण व्यक्त करून त्यांनी स्वतः पदावर कार्यरत असतांना हाडोळती हे गाव स्वच्छता अभियान मोहिमेत राज्यात प्रथम कसं आलं ? हा अनुभव त्यांनी सविस्तरपणे सांगितला. अध्यक्षीय भाषणात जेष्ठ गांधीवादी विचारवंत मच्छिंद्र गोजमे सरांनी आपण महात्म्यांच्या जयंती निमित्त, पुण्यतिथी निमित्त त्यांचे स्मरण करतो.
पण आपण त्यांना समजून आणि जाणून घेत नाही. ही खंत व्यक्त केली. मला महात्मा गांधी का भावतात ? यावरही त्यांनी विस्तृत विवेचन केले. महात्मा गांधीनी त्या काळात स्वतःची स्वच्छता स्वतः सुरु केली.आता माणसांच्या मनामनातील ,जाती – जातीतील, धर्माधर्मातील द्वेष स्वच्छ करण्याची जबाबदारी, कार्यक्रमाचे आयोजक सुभाष साबळे यांच्यावर आहे. असेही ते म्हणाले.
प्रास्ताविक अध्यक्ष, राजर्षी शाहू महाराज सेवाभावी संस्था तथा कार्यक्रमाचे आयोजक शाहीर सुभाष साबळे यांनी केले.धनश्री भ आमलापुरेने स्वागतगीत तर नवोदित कवी विजय पवार यांनी आभार मानले.