आपट्याची पानं आणि होणारं नुकसान

आता आपण व्हॉट्सएपवर आपट्याचं सोनं फॉरवर्ड करतो. तरीही दसऱ्याला एकमेकांना आपट्याची पानं दिल्या घेतल्याशिवाय दसरा साजरा होत नाही. पण ते अनेकदा आपट्याचं पान नसतंच. मुळात शमीला ऑप्शन म्हणून आपटा आलाय. आता सोनं वाटण्याच्या या प्रथेलाच ऑप्शन शोधावा लागणार आहे.


वर्षभराच्या कॅलेंडरवरचा दसरा एक मोठा सण. सण जितका मोठा तितके त्याचे रितीरिवाज जास्त. दसऱ्याच्या दिवशी सरस्वतीची पूजा आहे आणि हत्यारांचीही पूजा आहे. एकीकडे देवीचं विसर्जन करायचंय आणि रावणालाही जाळायचंय. दसऱ्याचाच दिवस सीमोल्लंघनाचा म्हणून सैनिकांसाठी महत्त्वाचा. तसंच अपराजिता नावाच्या देवीचं पूजनही देशभर केलं जातं. याच दिवशी कुष्मांड दशमीचं व्रतही केलं जातं.
अश्या विविध रितीभाती घेऊन हा सण येतो.


आता राजेरजवाडे नाहीत. त्यामुळे कुणाला दुसऱ्या राज्यावर स्वारी करण्याची गरज उरलेली नाही. त्यामुळे सीमोल्लंघनाचा प्रश्न उरत नाही. आपल्याकडे ढाली तलवारी नाहीत. त्यामुळे ती पुजण्यालाही अर्थ उरलेला नाही. त्यामुळे घरातल्या चाकूसुऱ्यांना, मिक्सर, वॉशिंग मशीनना हळदीकुंकू लावून पुजण्यात आपण समाधान मानतो. ऑफिसात कम्प्युटर, लॅपटॉप हत्यारांच्या जागी पुजले जातात. आता पाटीही नाही.

त्यामुळे पाटीवर सरस्वती काढून पाटीपूजन करण्याचंही नव्या पिढीला माहीत नाही. कोहळीची फुलं मिळत नसल्यामुळे कुष्मांड दशमीचं व्रतही आऊटडेटेड झालंय. त्यामुळे घराघरात करण्यासाठी दसऱ्याची एकच गोष्ट उरलीय, ती म्हणजे सोनं वाटणं त्याला पर्याय म्हणून वापरण्यात येते ती आपट्याची पानं
आपट्याच्या पानांविषयी परंपरा नेमकं काय ते ,

दसऱ्याच्या निमित्ताने नातलगांनी, स्नेहीमंडळींनी एकत्र येऊन सामूहिकरीतीने आपट्याचे सोने लुटण्याचा उपक्रम आसपासच्या देवळांमधून आणि आपल्या परिसरातील एखाद्या मैदानावर आयोजित करावा. मात्र त्यात कुठलाही उच्छृंखलपणा येणार नाही, याची दक्षता घ्यावी. पूर्वी मंडळी आवर्जून एकमेकांच्या घरी जाऊन आपट्याचे सोने देत घेत असत.


पौराणिक कथांमधे दसरा शोधतानाअज्ञातवासात असताना पांडवांनी आपली शस्त्रं शमी वृक्षावर लपवून ठेवली होती, अशी कथा महाभारतात आहे. त्यामधून दसऱ्याला शमी वृक्षाखाली शस्त्रपूजा करण्याची प्रथा सुरू झाली. कौत्साने वरतंतु ऋषींसाठी गुरुदक्षिणा म्हणून कुबेराकडून सुवर्णमुद्रा मिळवल्या. त्यापैकी गुरुदक्षिणा घेऊन उरलेल्या सुवर्णमुद्रा कौत्साने शमीच्या वृक्षाखाली आणून ठेवल्या. तो दिवसही विजयादशमीचाच होता. त्याची आठवण म्हणून आजही आपण दसऱ्याला एकमेकांना आपट्याची पाने सोने म्हणून देतो.


शमीच्या जागी आपटा आला
या सगळ्या पुराणांतल्या गोष्टींत शमीच्या झाडाचाच उल्लेख आहे. मग त्यात आपटा कसा आला. तर शमी वृक्ष सर्वत्र उपलब्ध होऊ शकेलच याची कल्पना असल्यामुळे शमी वृक्ष नसल्यास आपट्याच्या वृक्षाची पूजा करावी, असा धर्मशास्त्रीय संकेत आहे. परिणामी आपट्याच्या पानांचं सोनं एकमेकांना देण्याची गोड प्रथा सुरू झाली. मुळात शमी वृक्षाच्या समिधा यज्ञकर्मात अग्नी प्रदीप्त करण्यासाठी होत असल्याने त्याच्या संवर्धनाची गरज लक्षात घेऊन आपल्या पूर्वजांनी धर्मकार्याशी त्याची सांगड घालून हे वृक्ष वाचवण्याचं फार मोठं कार्य केलं.


शमी शमयते पापं, असं सांगितलं जातं. त्यामुळे पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी धार्मिक कर्मकांडांमधे याचा मुबलक वापर होतो. बाभूळ वर्गातलं हे झाड औषधी आहे. त्याचा आयुर्वेदात उल्लेख आहे. राजस्थानात या झाडाला जेखडी असं म्हणतात. तो राजस्थानाचा राज्यवृक्ष आहे.


हा शमी सगळीकडे नसल्यामुळे आता त्याची जागा आपट्याने घेतली आहे. पण आता आपटा तरी कुठे सगळीकडे मिळतो. त्यामुळे शहरांमधेच नाही तर गावांमधेही तो सर्रास विकत घेतला जातो.


आपट्याविषयी आपल्याला हे ही थोडं माहीत हवं की,
आपटा हे अस्सल भारतीय झाड आहे. ते आपटा हे फॅबेसी कुळातील बहुहिनिया जातीतील शेंगा देणारं, भरपूर लोंबत्या फांद्याचं, वेडंवाकडं वाढणारं झाड आहे. ते भारताबरोबरच श्रीलंका आणि चीनमधल्या पानझडी जंगलांमधे आढळतं.


संस्कृतमधे आपट्याला अनेक नावं आहेत. संस्कृतमध्ये वनराज म्हणून गौरवला गेलेला हा वृक्ष शततारका नक्षत्राचा आणि कुंभ राशीचा आराध्यवृक्ष मानला गेलाय. आपट्याचे तक हे नाव दोन अर्थांनी महत्त्वाचं आहे. अश्‍मंतक म्हणजे दगडाचा, खडकाचा नाश करणारा. त्याची मुळे जमिनीत खोलवर जातात. खडकाच्या फटीत शिरून वाढतात. कालांतराने फटी मोठ्या होऊन खडक दुभंगतात. अक्षरशः फुटतात. त्यामुळे खडकाळ, मुरमाड, उघड्या, बोडक्‍या टेकड्यांवर आणि माळांवर वनीकरणासाठी हे एक आदर्श झाड आहे. अश्‍मंतक याचा दुसरा अर्थ मुतखडा म्हणजे किडनी स्टोन होऊ न देणारा किंवा तो मुत्रावाटे बाहेर काढण्यास मदत करणारा होय.'

आपट्याचं लाकूड मजबूत आणि टिकाऊ असतं. पण झाडं लहान आणि वेडीवाकडी वाढणारी असल्यामुळे त्याचा उपयोग फक्त शेतीची अवजारं, हत्यारांचे दांडे वगैरे तयार करण्यासाठी होतो. त्याचं उष्मांक मूल्य म्हणजे कॅलरिक वॅल्यू भरपूर असल्यामुळे सरपण, इंधन म्हणून ते फारच चांगलं असतं. त्याच्या राखेमध्ये लोह, चुना, पोटॅश, मॅग्नेशियम, गंधक, सोडियम आणि स्फुरद अशी संयुगं असतात. त्यामुळे ती खत म्हणून वापरण्यास चांगली असते.


जनावरांना, विशेषतः शेळ्यांना याचा पाला पौष्टिक चारा म्हणून उपयोगी पडतो. तंतुमय सालीपासून आणि टिकाऊ दारे बनवतात.पानांचा उपयोग तेंदुपत्तीप्रमाणे विड्या तयार करण्यासाठीही करतात. गावाच्या सीमेवर आणि शेताच्या .बांधावर ही झाडे लावावीत, असं जुन्या ग्रंथात सांगितलं आहे. ही झाडं खूप वर्षे जगणारी, तोडली तरी पुन्हा फुटणारी, मुळं खोल जाणारी असल्यामुळे हद्दी निश्‍चित राहतात. या छोटेखानी झाडांमुळे पिकांना सावलीचा त्रास तर होत नाहीच, उलट जमिनीचा कस वाढविण्यास त्यांचा उपयोग होतो.`


वर्षभर आपट्याच्या झाडांना कुणीही विचारत नाही. पण दसऱ्याच्या एकाच दिवशी त्याचं मार्केट अचानक फोफावतं. पण बाजारात जी पाने आपट्याची म्हणून विकली जातात ती सगळीच आपट्याची पानं नसतात. बोहिनिया प्रकाराच्या सगळ्याच झाडांची पानं सारखीच दिसतात. विशेषतः कांचनच्या विविध जातींची पान आपट्यासारखीच दिसतात.

त्यामुळे आपटा समजून कांचनाच्या झाडाचा बळी जातो. पण बारकाईने पाहिलं तर या दोन झाडांच्या पानांमधला फरक समजू शकतो. कांचनची पानं ही आपट्यापेक्षा आकारानं मोठी, पातळ आणि विशेष म्हणजे चमकदार असतात. आपट्याची पानं कोरडी असतात. ती हिरवीगार दिसत नाहीत.


आपट्याच्या झाडाचं रक्षण व्हावं म्हणून दसऱ्याला आपट्याशी जोडलं असावं. पण आता दसऱ्याला आपट्याच्या अनेक झाडांचा बळी जात असावा. असंच चालू राहिलं तर आपटा लुटायलाच नाही, तर बघायलाही सापडणार नाही. नाशिक महापालिकेने गेल्या वर्षी त्यांच्या हद्दीतल्या झाडांची मोजणी केली होती. त्यात फक्त १५३ आपट्याची झाडं सापडली होती. त्यामुळे वनस्पती शास्त्रज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्ते आपटा वाचवण्याचं आवाहन करत आहेत. दसऱ्याला आपटा वाटण्याऐवजी आपट्याचं झाड लावावं.


याची आणखी एक वाईट बाजू सांगता येईल, या झाडाची पाने जनावरे दुसऱ्या दिवशी खात नाहीत, म्हणजे त्या पानांचा मोठया प्रमाणात कचराच होतो. बाजारात सर्वसाधारण असे चित्र दिसते कि विक्रेते भरमसाठ पाने तोडून आणतात, त्यातील आर्धी विकली जातात, उरलेली पाने तिथेच टाकून हे विक्रेते संध्याकाळी पैशाचा गल्ला घेऊन आपल्या घरी निघून जातात.


अश्या तऱ्हेने कळत- नकळत बाजारात कचरा करण्यास आपणच कारणीभूत होतो. याची आपल्यासारख्या सुजाण, सुसंकृत, शिक्षित, लोकांनी विचार करण्याची व अमलात आणण्याची वेळ आली आहे.


प्रथा बंद करणे कठीण असते, पण कधीतरी तो बदल घडणे जरुरी आहे. मी व माझ्यासारख्या विचारांनी प्रेरित झालेल्या अनेक सुजाण नागरिकांनी मागील काही वर्षापासून सोने म्हणून आपट्याची पाने देणे-घेणे बंद केले आहे. चला या दसऱ्यापासूनच तुम्ही पण त्याची सुरवात करा व एक आदर्श विचार समाजात पसरवण्याचा प्रयत्न करा.


सर्वांना दसरा च्या हार्दिक शुभेच्छा

रूचिरा बेटकर नांदेड
9970774211

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *