पुस्तक वाचनाने विचारांच्या कक्षा रुंदावतात – संतोष अंबुलगेकर जवळ्यात डॉ. कलाम जयंती व हात धुणे दिवस साजरा


नांदेड – पुस्तक हे संस्कृतीचे मस्तक आहे असे म्हटले जाते. भारतीय संस्कृतीत ग्रंथ हेच गुरु मानल्या जाते. वाचनाने माणसाच्या वैचारिक कक्षा रुंदावतात, असे प्रतिपादन येथील महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा विषयशिक्षक संतोष अंबुलगेकर यांनी केले.

ते जवळा देशमुख येथील डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या वाचन प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंती निमित्त जवळ्यात विविध उपक्रम राबविण्यात आले.

डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस शाळाशाळांमध्ये वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रशासनाच्या सूचनेनुसार जवळा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत डॉ. कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच मुख्याध्यापक ढवळे जी. एस. यांनी धूपपूजन केले. यावेळी सहशिक्षक संतोष घटकार यांची उपस्थिती होती. 


             शालेय बालवाचनालयातील पुस्तकांचे यावेळी प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्यात विविध प्रकारची पुस्तके ठेवण्यात आले होते. सद्या शाळा सुरु नसल्याने विद्यार्थ्यी शाळेत येत नाहीत. त्यामुळे अवांतर पुस्तक वाचनाकरिता उपलब्ध करून देण्यात आले होते. आॅनलाईन पद्धतीने शिक्षण चालू असले तरी दिवसभरात कोणत्याही विद्यार्थ्यांना सवडीनुसार शाळेत येऊन आवडीनुसार कोणतेही पुस्तक घेऊन वाचन करण्याची मुभा देण्यात आली होती.

यावेळी बोलताना अंबुलगेकर म्हणाले की, वाचन संस्कृती वाढीस लागण्याकरिता शिक्षक व पालकांनी जबाबदारी घेतली पाहिजे. पुस्तक वाचनाने बुद्धी‌ व मन यांचा विकास होतो. त्यासाठी कथा, कादंबरी, ऐतिहासिक वा वैचारिक पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. त्यानंतर जागतिक हात धुणे दिवसानिमित्त हात धुण्याच्या विहित पद्धतीने कसे हात धुवावे याबाबत प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.

वाचन प्रेरणा दिन आणि जागतिक हात धुणे दिवस या दोन्ही कार्यक्रमांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *