मितभाषी व्यक्तिमत्त्व : कै. विनायकरावजी फड

(आज दि.२१ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ६.वाजून ४२ मिनीटांनी माजी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक मा.विनायकरावजी फड साहेब यांचे दुःखद निधन झाले आहे.या निमित्त त्यांच्या कार्याप्रती वाहीलेली ही शब्दांजली.)


मानवी जीवनात मृत्यू ही अटळ बाब आहे.जो जन्मला तो मरणारच आहे परंतु जन्म व मरण यातील जगणे ज्यांना खर्‍या अर्थाने जगता आले ते खरे धन्य. केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी तर सगळेच जगतात पण स्वतःबरोबर इतरांचा विचार करत जगणारे महत्त्वाचे असतात तसेच गोरगरिबांचे कैवारी आमच्या गावचे सुपुत्र माजी पोलिस निरीक्षक कै. विनायकरावजी फड साहेब होत.


कुठल्याही गावाची ओळख त्या गावातील चांगल्या माणसांवरून होते. विशेषत्वाने आमच्या गावाची ओळख मागील काही वर्षांपासून कै.शंकररावजी गुट्टे साहेब, किशोरजी फड साहेब, त्रंबकआबा गुट्टे व कै. विनायकरावजी फड साहेब यांच्या मुळे झाली.

अलीकडच्या काळात आणखीन काही व्यक्तिमत्त्व गावाचा नावलौकिक करत आहेत पण मागच्या पिढीतील महत्त्वपूर्ण व्यक्तीमत्व म्हणजे वरील मान्यवर होत. मा.त्र्यंबकअबा गुट्टे सोडले तर बाकीचे तिघेही पोलीस खात्यात उच्च पदावर कार्यरत होते.

पंचक्रोशीत,जिल्ह्यात तथा जिल्ह्याबाहेर गावाचे नाव सांगितले की यांचा उल्लेख केला जातो. पोलीस खात्यात असूनही ही सगळी मंडळी वारकरी संप्रदायावर जीवापाड प्रेम करणारी.
कै. विनायकरावजी फड साहेबांनी मुंबई शहरातच जवळपास संपूर्ण नोकरीच्या कालावधी घालवला.साहेब वर्षात एकदा या दोनदा गावाकडे यायचे.आम्ही त्यावेळी लहान होतो. पण त्यांचा नावलौकिक ऐकुण त्यांना पाहायची उत्सूकता असायची.

त्यांना पाहिले की आपल्या गावातील एवढे मोठे व्यक्तिमत्त्व आहे याचा अभिमान वाटायचा.त्यांच्याजवळ मी शिक्षण संपेपर्यंत कधी गेल्याचे आठवत नाही कारण त्यांचे नैतीक वजनच मनावर इतके होते की एवढ्या मोठ्या माणसा जवळ कसे जावे?कसे बोलावे ?असे वाटायचे पण सेवानिवृत्तीनंतर मात्र त्यांचा गावाशी संपर्क वाढला व ते नेहमी आमची व परिवाराची चौकशी करत असत व बिकट परिस्थितीतून आम्ही पुढे गेलो आहोत याचे त्यांना समाधान वाटत असे.

त्यांचा स्वभाव कमी बोलण्याचा होता जर बोललेच तर मितभाषित्व त्यांच्या बोलण्यात जाणवत असे. त्यांनी सांप्रदायिक कुठलाच कार्यक्रम सोडला नाही. कुठल्याही महाराजांनी सार्वजनिक कामासाठी आणि विशेषत्वाने देवाच्या कामासाठी आवाहन केले तर ते अशा कामी अग्रस्थानी असत.

आज अहमदपूर अंबाजोगाई रोडवर देवकरा पाटीजवळ जी गावची कमान आहे ती त्यांनीच स्वखर्चातून उभी केली आहे. पदाचा,पैशाचा गर्व त्यांच्याकडे कधीच जाणवला नाही.पोलिसी खाक्या दाखवने म्हणतो तसेही कधी घडले नाही. गरिबांना न्याय देण्याचे काम त्यांचे सासरे कै.बाबजी गुट्टे व त्यांचे व्याही कै.नारायणराव गुट्टे (न्यायपंच) हे करायचे त्यांना त्यांचा पाठिंबा होता. वरील चार ही व्यक्ती एकमेकाच्या अत्यंत जवळचे नातेवाईक होते पण त्यांनी कधीही एकत्र येऊन गरिबांवर अन्याय केला नाही.


साहेबांना एक मुलगा व तीन मुली असा परिवार. त्या सर्वांना अत्यंत सुसंस्कारित केले.मुलींना चांगल्या परिवारात देण्याचे काम त्यांनी केले.आज सून, जावई,नातू,पणतू असा त्यांचा मोठा परिवार आहे. शून्यातून विश्व निर्माण करणारे व्यक्ती त्यांना आवडत असत. आपल्या मातृभूमीवर त्यांचे जीवापाड प्रेम होते. म्हणून त्यांनी गावात भला मोठा वाडा बांधला. एवढेच नाही तर नंतर किनगाव ता. अहमदपूर येथे स्थायिक झाल्यावर येथे गावातील प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात व सुखदुःखात ते सहभागी होत असत.प्रत्यक्ष कीर्तन प्रवचन करत नसले तरी अशा व्यक्ती बद्दलचा आदर त्यांच्या अंतकरणात होता.

त्यांनी आपल्या पदाच्या व पैशाच्या जोरावर गावात दहशत निर्माण केल्याचे आठवत नाही. अत्यंत संयमी व शांत स्वभाव असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. मोजकेच व महत्त्वाचे तेवढेच ते बोलत असत. त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत पदावर असल्यागत अत्यंत संयमी जीवन जगले.आपल्या मातृभूमीच्या प्रेमापोटी मुंबईसारख्या ठिकाणी घर असतानाही तिथे स्थायिक न होता गावाकडे स्थायिक झाले.

आपल्या मुलालाही मुंबईला मंत्रालयात चांगल्या पदावरती नोकरी होती ती सोडायला लावून मातृ भूमिकडे ते घेऊन आले. यावरूनच त्यांचे मातृभूमीवर किती प्रेम होते हे लक्षात येते. अहंकाररहीत वागण्यातला मोठेपणा त्यांनी कधीही जाऊ दिला नाही म्हणून ते आमच्या सारख्या नवशिक्षितांसाठी आदर्श होते. त्यांचाच वारसा आज आमच्यासारखी पुढची पिढी चालवते आहे.अलीकडच्या पीढीत जो उथळपणा दिसतो आहे तसा उथळपणा त्यांच्याकडे नव्हता. श्रीमंतीचा देखावा करणे त्यांना कधी जमलेच नाही.त्यामुळे ते अनेकांच्या प्रेरणास्थानी राहिले.
त्यांच्याकडे किशन नावाचा एक नोकर होता.

त्यांनी साहेबांच्या परिवाराची जिवापाड सेवा केली. त्याचे लग्न झालेले नव्हते तो एकटाच होता.तर त्याला त्याच्या वृद्धापकाळात उघड्यावर पडू न देता साहेबांनी त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याला बंधुगत प्रेम दिले व त्याचे सर्वच विधी पार पडले. असे उपकार करणा-यावर उपकार करणारे होते. कृतघ्नता त्यांच्याकडे नव्हती तर कृतज्ञता त्यांच्याकडे होती. हे यावरून लक्षात येते.


मागील काही दिवसांपूर्वी श्री संत मोतीराम महाराजांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात त्यांची भेट झाली होती. मला त्यांनी सोबत घेऊन जेवण केले.विद्यापीठाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांनी माझे अभिनंदन केले. तदनंतर मात्र त्यांची तब्येत बिघडल्याचे समजले. वाटले साहेबांची भेट घ्यावी.आठ दिवसांपूर्वी त्यांना भेटण्यासाठी मी व बंधु भागवत गेलोत.

त्यांनी माझ्याकडे बघून बसण्याचा इशारा केला. पण त्याच वेळी जाणवले की साहेब आता आपले काही दिवसाचेच सोबती आहेत.आणि आज अचानक बातमी धडकली की साहेब गेले.मन विषन्न झाले. तरी ही वाटले की साहेबांनी आयुष्यभर जी मुल्य घेऊन जीवन जगत राहीले तीच मुल्य आपणही आपल्या जीवनात उतरावीत व आपल्या परीने अहंकार न बाळगता जीवन जगत राहावे.हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे.

         प्रा. डॉ.रामकृष्ण बदने
   देवकरा ता.अहमदपुर जि.लातुर
     भ्रमणध्वनी -९४२३४३७२१५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page