शांतता पेरत जाणारा आवाज निमाला

संपादकीय …

ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे  हृदयविकाराच्या झटक्याने निधन


गेली आठ दशके भारतीय अभिजात संगितात मेवाती घराण्याची संगीत शैली रसिकप्रिय करणारा आणि आपल्या प्रतिभावान संगिताने भारावून टाकणारा ख्यातनाम गायक,  शास्त्रीय संगीताच्या अवकाशात स्वयंतेजाने व स्वयंप्रज्ञेने दीर्घकाळ तळपणारा संगीतसूर्य सोमवारी मावळला. मेवाती घराण्याचा वारसा आपल्यात मुरवत तो वारसा रसाळपणे अधिक समृद्ध करणारे ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे  हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. भारतीय शास्त्रीय संगीताची स्वरपालखी भारतासह जगभरातील अनेक देशांत मोठ्या दिमाखात पोहोचवणारा व असंख्य शिष्यांना त्या पालखीत सहभागी करून घेणारा भारताचा स्वरदूत हरपला, अशी शोकभावना पंडित जसराज यांच्या निधनामुळे व्यक्त होत आहे. 

तो मनाला भिडणारा स्वर…डोळे बंद केले की शांतता पेरत जाणारा आवाज आता निमाला त्यामुळे संगीतक्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. सुमधुर आवाजाची देणगी मिळालेले पंडित जसराज यांनी भारतीय संगीतासाठी आपलं संपूर्ण जीवन वाहून घेतले होते. भारतीय संगीत आणि पंडित जसराज हे जणू समीकरणच झाले होते. पंडित जसराज यांच्या निधनाने शास्त्रीय संगीतातला तारा निखळला आहे. संघर्ष, मेहनत आणि रियाझ यातून भारतीय संगीत सृष्टीला त्यांनी योगदान दिले. आपल्या गायनातून श्रोत्यांना ईश्वर अनुभूती देणारे, देश-विदेशातल्या विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने शिक्षण देणारे पंडितजी हे संगीत क्षेत्रातले गान गुरु होते. शास्त्रीय गायनासाठी त्यांना आजपर्यंत अनेक सन्मान, पुरस्कार मिळाले असून केंद्र शासनाने पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रात भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.


पं. जसराज हे मेवाती घराण्याचे गायक होते. त्यांच्या घराण्यात संगीताचा वारसा चार पिढ्यांपासून होता. त्यांनी आपल्या संगीत शिक्षणाची सुरुवात वडील पं. मोतीराम यांच्याकडे केली. वडिलांच्या निधनानंतर वयाच्या तिसऱ्या वर्षी त्यांनी वडिल भाऊ पं. मणिराम यांच्याकडे संगीत शिक्षणाचे धडे गिरवायला सुरुवात केली. त्या धड्यांना स्वयंप्रज्ञेची जोड देत त्यांनी स्वतःचे संगीत अतिशय उंचावर नेऊन  ठेवले. परंपरांचे पालन करताना त्यांनी केलेले काही प्रयोग विलक्षण ठरले. जसरंगी जुगलबंदी हा त्यातील एक महत्त्वाचा प्रयोग. स्त्री व पुरुष अशा दोघांनी वेगवेगळे राग एकाचवेळी सादर करण्याचा हा प्रयोग प्रतिभा व प्रायोगिकता या दोहोंच्या समसमान संयोगातून उद्भवलेला होता. श्री वल्लभाचार्यजी द्वारा रचित ‘मधुराष्टकम्’ ही कृष्णस्तुति पंडितजींमुळे असंख्य घरांत सुस्वरांत पोहोचली व तिने संगीतरसिकांच्या हृदयात कायमचे स्थान केले. जागतिक स्तरावर हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत लोकप्रिय व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

युवा कलाकारांना प्रोत्साहन देणे, संगीत क्षेत्रातील गरजू लोकांना मदत यासाठी त्यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न केले. त्यांनी बालपणी स्वतः हलाखीचे दिवस पाहिल्याने ही संवेदनशीलता त्यांच्यामध्ये जागृत होती.पं. जसराज यांनी सुमारे ३०० हून अधिक बंदिश रचल्या आहेत. त्यांनी अनेक संतांनी केलेल्या संस्कृतातील रचनांना हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतामध्ये स्थान दिले आणि लोकप्रिय केले. शास्त्रीय संगीतामध्ये यामुळे एक नवे पर्व आले. हवेली संगीतामध्येही त्यांनी संशोधन केले आहे. यामुळे भक्तीसंगीतातील नव्या वाटा खुल्या झाल्या.

त्यांचे गायन अभूतपूर्व तर होतेच पण त्यांनी उत्तम गायकही घडवले. ते एक महान गुरू देखील होते पंडित जसराज यांनी शास्त्रीय संगीताचे तब्बल आठ दशकं सेवा केली. आत्मानुभव देणाऱ्या संगीताने त्यांनी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केले. ज्यांनी पंडितजींचे गाणे प्रत्यक्षपणे ऐकले होते. त्यांनी जणू पृथ्वीवर स्वर्गच अवतीर्ण झाला याची अनुभूती घेतली. त्यांच्या गायकीने, संगितानं निर्माण झालेलं चैतन्य श्रोत्यांच्या रोमारोमांत पेरलं गेलं आहे. पंडितजी हे भारतीयांना सतत प्रेरणा देत राहतील अशी त्यांनी संगिताची सेवा केली. त्यांच्या शिष्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार पं. जसराज बुद्धिमान, रसिले, सुरीले कलाकार होते. भावप्रधान गायकी, चांगला आवाज, गाण्यातील संवेदनशीलता जपणारे ते कलाकार होते. त्यांच्या गायकीमध्ये शास्त्र आणि कला यांचा सुंदर मिलाप होता. काही गायक केवळ शास्त्र म्हणून गातात. केवळ शास्त्र म्हणून गायले की ते विरस गाणे होते. मात्र शास्त्राला मागे ठेवून कला म्हणून संगीत पुढे मांडायचे हे फार कमी लोकांना जमते. त्यापैकी ते होते.

संगीत क्षेत्रामध्ये त्यांनी नवी वाट शोधली. खरे तर मेवाती घराणे हे त्यांच्यामुळे समोर आले. आपली गायकी लोकांपर्यंत पोहोचवली, लोकप्रिय केली. त्यांनी भजनाच्या माध्यमातून शास्त्रीय संगीत लोकांपर्यंत पोहोचवले. नवीन प्रयोग करायची इच्छा असणारे कलाकार कमी असतात. संगीतात नवे प्रयोग करणे आणि ते लोकांसमोर मांडणे यासाठी धारिष्ट्य लागते. ते त्यांच्यामध्ये होते. ते विचार करून गायचे. शास्त्रीय गायकांमध्ये सरगम गाणारे कमी आहेत. आलाप आणि तान सर्वच गातात मात्र सरगम गाणाऱ्या कलाकारांमध्ये पं. जसराज यांचेच नाव महत्त्वाचे आहे. त्यांच्याकडे दुसऱ्याचे कौतुक करण्याचाही मोठेपणा होता. दुसऱ्यांच्या सरगमचेही त्यांनी अनेक ठिकाणी कौतुक केले.

ते वेळप्रसंगी त्याबद्दल लिहित असत. ते इतरांची स्तुती करीत आणि प्रोत्साहन देत असत. पद्मविभूषण पंडित जसराज यांचं नाव मंगळ आणि गुरु या दोन ग्रहांदरम्यान असलेल्या व्हीपी नावाने ओळखल्या जाणाऱ्या ग्रहाला 2006 मध्ये देण्यात आले. असा सन्मान मिळणारे पंडित जसराज हे एकमेवर भारतीय संगीत कलाकार आहेत. पं. जसराज यांनी पंडित प्रसाद दुसाने, पंडित संजीव अभ्यंकर, तृप्ती मुखर्जी, पंडित रतन मोहन शर्मा, अंकिता जोशी आणि श्वेता जव्हेरी यांना शास्त्रीय संगीताचे शिक्षण दिले. अनेकांना त्यांनी घडवले. नवोदितांना प्रोत्साहन‌ दिले.‌ 

पं. जसराज यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या तिन्ही पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. संगीत नाटक अकादमी पुरस्कार, संगीत मार्तंड पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार असे पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत. एवढेच नव्हे तर काही आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. असा मनस्वी, प्रेमळ, संगीत सौंदर्याचे भान असलेला कलावंत, ऋषीतुल्य आणि विशालहृदयी असलेला महान शास्रीय संगीत सेवक कोरोनाकाळात गायक कलाकार, संगीतकारांच्या होत असलेल्या हालअपेष्टांबाबत पुढे आला.‌ कोरोनामुळे जगभरातील जनजीवन विस्कळित झाले असताना कलेची सेवा करणारे कलाकारदेखील या काळात अनेक समस्यांचा सामना करीत आहेत.

या पार्श्वभूमीवर इंडियन क्लासिकल म्युजिक अँड आर्ट्‌‌स’ या संस्थेतर्फे देशातील २५ कलाकारांना अर्थिक मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने ‘आयसोलेटेड येट टुगेदर’ ही छोटी मैफलीची मालिका सुरू करण्यात आली होती. संगीतमार्तंड पं. जसराज यांनी फेसबुक व युट्यूब या समाजमाध्यमांवर या ऑनलाइन उपक्रमाची सुरुवात केली होती. कोणत्याही कलाकाराची उपजीविका ही तो करीत असलेल्या कार्यक्रमांवर अवलंबून असते. मात्र, करोनाच्या काळात सध्या सर्वच सार्वजनिक कार्यक्रम बंद आहेत. अशा कलाकारांना छोटीशी मदत करण्याबरोबरच त्यांना ‘आर्टिस्ट अॅप्रिसिएशन अॅवॉर्ड’ म्हणून या प्रत्येक कलाकाराला २५ हजार रुपयांची एक मदत म्हणून पुरस्कार देण्याच्या हेतूने या उपक्रमाला सुरुवात केली गेली. परिस्थितीचे भान ठेवून एवढ्या मोठ्या गायकाने अशा उपक्रमांत सहभाग घेऊन आयोजकांना प्रोत्साहित केले. ज्याप्रमाणे दिव्याने दिवा पेटतो आणि आसमंत उजळत असतो, तद्वतच मैफिलीतला शेवटचा ‘जय हो’ म्हणणारे पं. जसराज आता शरीराने नसतील पण त्यांचा स्वर कायम निनादत राहील.#yugsakshilive.in

गंगाधर ढवळे,नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *